टेटम, एडवर्ड लॉरी : (१४ डिसेंबर १९०९–५ नोव्हेंबर १९७५). अमेरिकन जीववैज्ञानिक, जीवरसायनशास्त्रज्ञ व आनुवंशिकीविज्ञ (आनुवंशिक गुणधर्मांच्या अभ्यासासंबंधीच्या शास्त्रातील तज्ञ). आनुवंशिकीतील कार्याबद्दल त्यांना १९५८ चे वैद्यक किंवा शरीर क्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक जी. डब्ल्यू. बिडल व जे. लेडरबर्ग यांच्याबरोबर विभागून मिळाले.
त्यांचा जन्म बोल्डर (कोलोरॅडो) येथे झाला. त्यांचे शिक्षण शिकागो व विस्कॉन्सिन या विद्यापीठांत झाले. १९३१ मध्ये त्यांनी रसायनशास्त्राची ए.बी. व १९३२ मध्ये सूक्ष्मजीवविज्ञानाची एम्.एस्. या पदव्या मिळविल्या. सूक्ष्मजीवांचे पोषण व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) या विषयांवर १९३४ मध्ये प्रबंध लिहून त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. त्यानंतर हॉलंडमधील उत्रेक्त विद्यापीठात त्यांनी काही काळ संशोधन केले. हॉलंडहून परत आल्यावर त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या जीवविज्ञान, वनस्पतिविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान व जीवरसायनशास्त्र या विभागांत काम केल्यानंतर (१९३७–४५), येल विद्यापीठात प्रथम वनस्पतिविज्ञानाचे साहाय्यक प्राध्यापक व नंतर सूक्ष्मजीवविज्ञानाचे प्राध्यापक (१९४५–४८) म्हणून त्यांनी काम केले. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठात पुन्हा जीवविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून परत आले (१९४८–५७) व १९५७ सालापासून त्यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेत काम केले.
टेटम यांनी सूक्ष्मजंतू, यीस्ट व बुरशी यांच्या पोषण गरजांवर अनुहरित (एका पिढीतून पुढच्या पिढीत उतरलेल्या) उत्परिवर्तनांच्या (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणाऱ्या एकाएकी बदलांच्या) होणाऱ्या परिणामांसंबंधी मूलभूत संशोधन करून रेणवीय आनुवंशिकी या जीवविज्ञानाच्या शाखेचा पाया घालण्यास मदत केली. स्टॅनफर्ड विद्यापीठात काम करीत असताना टेटम व बिडल यांनी प्रथम ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फळमाशीवर व नंतर न्यूरोस्पोरा क्रासा या पावावरील बुरशीवर संशोधन केले. त्यावरून सर्व जीवरासायनिक प्रक्रिया शेवटी जनुकांच्या (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांवरील म्हणजे गुणसूत्रांवरील आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या एककांच्या) द्वारे नियंत्रित होतात, या सर्व प्रक्रिया रासायनिक विक्रियामालांच्या स्वरूपात मांडता येतात, प्रत्येक विक्रिया फक्त एकाच जनुकाद्वारे नियंत्रित होते व एकाच जनुकातील उत्परिवर्तनामुळे कोशिकेच्या (पेशीच्या) फक्त एकाच रासायनिक विक्रिया घडवून आणण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, हे महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी काढले. न्यूरोस्पोरा क्रासा या बुरशीवरील संशोधनाद्वारे टेटम व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे प्रस्थापित केले की, जेव्हा एखाद्या जननिक उत्परिवर्तनामुळे एखाद्या विशिष्ट रासायनिक विक्रियेवर परिणाम होतो तेव्हा ती विक्रिया घडवून आणणारे एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारा प्रथिनयुक्त पदार्थ) बदललेले असते किंवा नाहीसे झालेले असते. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक जनुक कोणत्या तरी एका विशिष्ट एंझाइमाची संरचना निर्धारित करते असे दाखविले व जीवरासायनिक आनुवंशिकीचा पाया घातला. साध्या अकार्बनी द्रव्यात या बुरशीची वाढ करण्यासाठी बायोटीन आवश्यक असते, हाही शोध त्यांनी लावला. येल येथे असताना टेटम यांनी पूर्वी न्यूरोस्पोराच्या बाबतीत वापरलेल्या उत्परिवर्तन प्रवर्तित करण्याच्या व जीवरासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करण्याच्या पद्धतींचा सूक्ष्मजंतूंकरिताही उपयोग केला. लेडरबर्ग यांच्याबरोबर त्यांनी एश्चेरिकिया कोलाय या सूक्ष्मजंतूच्या के–१२ या प्रकाराच्या बाबतीत जननिक पुनःसंयोजनाचा [⟶ आनुवंशिकी] शोध लावला. उत्परिवर्तने घडवून आणण्यासाठी टेटम यांनी क्ष-किरणांचा उपयोग केला.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना १९५३ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटीचा रॅमसेन पुरस्कार तसेच विस्कॉन्सिन, यशीव्ह व रटगर्स या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळाले. त्यांनी जर्नल ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्री, सायन्स व बायोकेमिका एट बायोफिजिका ॲक्टा या नियतकालिकांच्या संपादक मंडळांवर काम केले. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.