नॉरिश, रॉनल्ड जॉर्ज ऱ्हेफोर्ड : (९ नोव्हेंबर १८९७ – ). ब्रिटीश भौतिक रसायनशास्त्रज्ञ. १९६७ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल परितोषिकाचे सहविजेते. प्रकाशरसायनशास्त्र (प्रारणांचा–ऊर्जायुक्त तरंगाचा–रासायनिक परिणाम किंवा रासायनिक बदलाने प्रारणांची सरळ निर्मिती होणे यासंबंधीचे शास्त्र) व अतिशय जलद होणाऱ्या रासायनिक विक्रिया यांविषयी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म व शिक्षण केंब्रिज (इंग्लंड) येथे झाले. १९१५ मध्ये केंब्रिज येथील एमॅन्यूएल कॉलेजमध्ये त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. पहिल्या महायुद्धात त्यांनी फ्रान्समध्ये रॉयल फील्ड आर्टिलरीमध्ये काम केले. १९२१ मध्ये त्यांनी केंब्रीज येथेच पदवी घेतली. १९२४ मध्ये ते पीएच्. डी. झाले व त्याच वर्षी त्यांना एमॅन्यूएल कॉलेजची फेलोशिप मिळाली. १९२६ मध्ये त्यांची भौतिक रसायनशास्त्राचे विद्यापीठ प्रयोगनिर्देशक म्हणून व १९३० मध्ये तेथेच ‘हंफ्री ओवेन जोन्स व्याख्याता’ म्हणून नेमणूक झाली. १९३६ मध्ये त्यांना एस्‌सी. डी. ही पदवी मिळाली व ते रॉयल सोसायटीवर निवडून आले. १९३७ मध्ये ते केंब्रिज विद्यापीठात भौतिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक व पुढे संचालक झाले आणि त्याच पदावरून १९६५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

प्रथम त्यांनी नायट्रोजन पेरॉक्साइड, आल्डिहाइडे, कीटोने, कीटिने, डाय-ॲझोमिथेन इ. साध्या संयुगाच्या प्रकाशरासायनिक विक्रियांचा अभ्यास केला. कार्बोनिल संयुगांचे दोन प्रकारांनी प्रकाशविश्लेषण (प्रकाश शोषला जाऊन रेणूचे लहान तुकडे होण्याची क्रिया) कसे होते, हे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्थापित केले. त्या वेळेपासून वरील सयुंगे मुक्त मूलकांच्या (विक्रियेत तसेच राहणाऱ्या पण सामान्यत: वेगळे अस्तित्व नसलेल्या अणूंच्या गटांच्या) अभ्यासासाठी व ज्वलन व बहुवारिकीकरण (एकापेक्षा जास्त रेणू एकत्र येऊन मोठा जटिल रेणू बनण्याची क्रिया) यांतील शृंखला विक्रियांच्या अभ्यासासाठीवापरण्यात येत आहेत.प्रकाशविश्लेषणाच्या त्यांच्या शोधावरून त्यांनी आणि सी. एच्. बॅम्फोर्ड यांनी‘फ्रँक-राबिनोव्हिचपरिणाम’(विरघळलेल्या द्रव्याच्या रेणूच्या प्रकाशविश्लेषणाने बनलेली व विरघळविणाऱ्या द्रव्याच्या रेणूंनी बंदिस्त असलेली दोन मुक्त मूलके निसटून जाण्यापूर्वी परत संयुक्त होण्याची दाट शक्यता असलेला परिणाम) सप्रयोग सिद्ध करून दाखविला. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी प्रकाशरासायनिक व स्फोटक विक्रिया यांच्या अभ्यासास सुरुवात केली. नॉरिश, जी. पोर्टर व त्यांचे सहकारी यांनी शोधून काढलेल्या चमक प्रकाशविश्लेषण (प्रकाशाच्या लोळामुळे वा चमकेमुळे होणाऱ्या रासायनिक विघटनातील घटकांचे वर्णपटीय परीक्षण) व गत्यात्मक वर्णपटविज्ञान ह्या पद्धतींमुळे ज्यांचा काळ मिलीसेकंदात मोजावा लागतो अशा अतिशीघ्र गतीच्या विक्रीयांचा अभ्यास करणे शक्य झाले. याबद्दलच त्यांना व ⇨ जॉर्ज पोर्टर यांना मिळून अर्धे व ⇨ मानफ्रेट आयगेन यांना अर्धे असे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.

नॉरिश हे विविध शास्त्रीय संस्थांचे सभासद आहेत. लीड्स व शेफिल्ड विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या आहेत. त्यांना १९५८ मध्ये रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक, १९६४ मध्ये कंबशन इन्स्टिट्यूटचे लेविस पदक व १९६५ मध्ये केमिकल सोसायटीचे फॅराडे पदक मिळाले आहे.

कानिटकर, बा. मो.