बाल्ख : अफगाणिस्तानातील त्याच नावाच्या प्रांतातील एक प्राचीन शहर. लोकसंख्या १५,००० (१९६७). बाल्ख प्रांताची राजधानी मझर-इ-शरीफच्या पश्चिमेस २१ किमी.वर बाल्ख नदीकाठी हे वसले आहे. जगातील प्राचीन शहरांत याची गणना होते. त्यामुळे अरब भूगोलतज्ञांनी याचा ‘शहरांची जननी’ असा उल्लेख केलेला आढळतो. प्राचीन काळी ⇒ बाल्हीक या नावानेही याचा निर्देश केल्याचे आढळते. अलेक्झांडर द ग्रेट याने इ. स. पू.३३० मध्ये येथे ग्रीक वसाहत-बॅक्ट्रा-स्थापन केली, असा अंदाज आहे. हे शहर ग्रेको-बॅक्ट्रियन साम्राज्याची राजधानी होती. ‘बझीराबाद’ या नावानेही ते संबोधिले जाते. इ. स. च्या सुरुवातीच्या शतकात हे बौद्ध धर्माचे प्रमुख ठिकाण होते. त्याच काळात येथे अनेक बौद्ध मठांची स्थापना झाली. इ. स. ६५३ मध्ये अरबांनी बाल्खवर ताबा मिळविला. तदनंतर येथे बांधल्या गेलेल्या मशिदी व राजवाडे यांमुळे शहराचा विस्तार वाढत जाऊन ते सुशोभित बनले. तथापि १२२१ मध्ये चंगीझखानाने हे शहर पूर्णत: उद्ध्वस्त केले. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात तैमूरलंग याने शहराची पुनर्बांधणी केली. येथे प्राचीन बौद्ध मठ, मशिदी आणि ख्वाजा अबू नासर महंमद पारसा (पंधरावे शतक) याच्या थडग्याचे अवशेष आढळतात. जग्थुश्त्र याचे हे जन्मगाव असावे अशी दंतकथा आहे.

चौधरी, वसंत