बालकवी

बालकवि : (१३ ऑगस्ट १८९०-५ मे १९१८).एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी. पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे. बालकवींच्या वडिलांची पोलीस खात्यातील नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. एरंडोल, यावल, जामनेर, बेटावद अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. श्रीसमर्थभक्त शंकरराव देव ह्यांचे धुळे येथील प्रिपरेटरी स्कूल आणि अहमदनगर येथील अमेरिकन मिशन हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले. तेही सलगपणे नव्हे. देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना, तसेच त्यांच्या वडिलांना, इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. बराचसा अभ्यास घरीच झाला. बालकवींची वडील बहीण जिजी हिने त्यांना संस्कृताचे आरंभीचे पाठ दिले कवितेची गोडीही तिनेच लाविली. संस्कृत भाषेवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्यांच्या कवितेतील शब्दयोजना ह्याची साक्ष पटवते. पंडिती कविता आणि शाहिरी कविता ह्यांचा त्यांनी समरस होऊन व्यासंग केला होता. इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले, तरी इंग्रजी कवितेची त्यांची समज उत्तम होती. अहमदनगरच्या मिशन स्कूलमध्ये, तसेच महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या एका शाळेत काही काळ ते अध्यापक होते.

वयाच्या तेराव्या वर्षी, नवापूर येथे असताना, त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेले नव्हते (तथापि बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल.पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असे नाव दिलेले आहे). कवितेच्या लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या पहिल्या कवितेत बीजरूपाने जाणवतात. पुढे तीन-चार वर्षांत त्यांची कविता अधिकाधिक विकसत गेली आणि जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला ‘बालकवी’ हे नावही रूढ झाले.

 बालकवींची विशेष ख्याती आहे ती निसर्गकवी म्हणून. किंबहुना त्यांच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती आहे. त्यांच्या काही नामांकित कवितांची शीर्षकेच पाहा : ‘निर्झरास’,‘फुलराणी’,‘संध्या-रजनी’,‘अरुण’.पण रूढ अर्थाने निसर्गसौंदर्याचे वर्णन हा अशा कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्‌गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही. किंवा अचेतन वस्तूंवर चेतनारोप नाही.‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजुक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे.‘अरुण’मध्ये पहाट फुटते या घटने भोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तेथे सजीव होतात इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्यशी एकरूप होतो. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या जाणिवेतून अपूर्णजगातील पूर्णतेचा आणि पृथ्वी व स्वर्ग यांच्यातील बंधाचा साक्षात्कार होतो. लौकिक सौंदर्याला अनेकदा त्यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो साध्या वर्णनात प्रतीकाची गहिरी सूचना लपलेली असते. ‘औदुंबर’ ही त्यांची छोटीशी कविता बहुचर्चित ठरली, ती ह्यामुळेच (आलोचना मासिक फेब्रु. १९८०).

विषयाशी असे तादात्म्य ज्या संवेदनाशक्तीमुळे बालकवींना साध्य होऊ शकले ती आधुनिक मराठी कवितेत काहीशी अनोखी होती. पुढे बा.सी.मर्ढेकर यांनी तिच्याकडे आवर्जून लक्ष वेधले. मर्ढेकरांच्या स्वतःच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या आरंभीच्या कवितेवर तो स्पष्टपणे दिसतोच. पण त्यांनी नंतर लिहिलेल्य आणि वरवर फार वेगळ्या वाटणाऱ्या, त्यांच्या नवकवितेतही सूक्ष्म दृष्टीला त्याचा आढळ होईल.अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहू वेगळ्या प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा भाग जाणवेल. किंबहुना विशुद्ध कवितेचा गेल्या तीसपस्तीस, वर्षांत जो कमीअधिक आविष्कार निरनिराळ्या कवींत दिसला त्याच्याशी बालकवींचा अन्वय, दुरून किंवा जवळून, लावता येईल. अर्थात नादमाधुर्य, निसर्गातील कोमल तपशिलांचे नाजुक वर्णन इ. बालकवींच्या प्रसिद्ध वैशिष्ट्यांचे पुष्कळ अनुकरण झाले पण असे कवी अनुकरणापार गेले नाहीत. त्यांची संवेदना तेवढी तरल आणि समृद्ध नव्हती.

 बालकवींना केशवसुतांच्या परंपरेत बसवले जाते, पण ते तारतम्याने करायला हवे. केशवसुतांचे संस्कार त्या कालखंडातील इतर बहुतेक प्रमुख कवींप्रमाणे बालकवींवरही झाले होतेच.‘धर्मवीर’सारख्या त्यांच्या काही कवितांचे विषय आणि त्यांतील विचार, केशवसुती वळणाचे होते. पण या कविता त्यांच्या उत्तम कवितांपैकी नव्हेत. बालकवींचा पिंडच निराळा होता.

पण बालकवी म्हणजे केवळ ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून’ घेण्याचा ध्यास लागलेले स्वप्नाळू, निरागस बालवृत्तीचे कवी नव्हेत. त्यांच्या उत्तर आयुष्यातील काही कवितांचा सूर अगदी निराळा आहे. बालभावाने बांधलेली आणि जोपासलेली स्वप्नसृष्टी काजळत आणि कोलमडत आहे या दुःखाची तडफड ‘कविबाळे’ ह्या कवितेत आहे. सृष्टीची  खिन्न, उजाड रुपे त्यांच्या मनाला घेरताना दिसतात. ‘काय बोचते ते समजेना, हृदयाच्या अंतर्हृदयाला’ अशी जीवघेणी अस्वस्थता त्यांना विफल करते कोठे मृत्यूची सावली तरळत असते. ‘ आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे’ म्हणून बागडणाऱ्या बालकवींइतकेच हे -त्यांच्या ‘पारव्या’ प्रमाणे खिन्न, नीरस एकांतगीत गाणारे-बालकवी खरे आहेत.

 बालकवींनी काही बालगीतेही लिहिली त्यांतील गीतगुण सहजसुंदर आहे आणि बालवृत्तीही. त्यांतील पक्ष्यांविषयीची गीते विशेष सुंदर आहेत. बालकवींच्या सर्वच कवितांच्या रचनेतील नादमयता आणि चित्रगुण अकृत्रिम आणि असामान्य आहेत.

 जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून बालकवींना मरण आले.

 संदर्भ : १. पाटणकर, भा. ल. संपा. बालकवीची समग्र कविता, मुंबई,१९६२.  

            २. मराठे, कृ. बा. बालकवि, मुंबई,१९६२ 

            ३. सरदेशमुख, त्र्यं. वि. अंधारयात्रा, मुंबई,१९६८.

राजाध्यक्ष, विजया