बॉर्थालोम्यू कुटुंब : स्कॉटलंडमधील एडिंबरो येथील नकाशांची निर्मिती करणारे प्रसिद्ध कुटुंब. जॉन बॉर्थालोम्यू (१८३१-१८९३)ह्या स्कॉटिश नकाशाकाराने काही काळ ऑगस्ट पीटरमन या जर्मन भूगोलज्ञाचा साहाय्यक म्हणून काम केले. १८५६ पासून मात्र त्याने आपल्या वडिलांच्या नकाशानिर्मितीच्या व प्रकाशन संस्थेच्या व्यवस्थापनाचे कार्य हाती घेतले. तेथील त्याचे महत्वाचे कार्य म्हणजे त्याने प्रकाशित केलेली ग्रेट ब्रिटनची नकाशामालिका. जॉन बॉर्थालोम्यूचे हे नकाशे म्हणजे शासकीय नकाशांची छोटी आवृत्ती असून ते अर्धा इंच आणि पाव इंचास एक मैल या प्रमाणांवर काढलेले आहेत.

जॉन जॉर्ज बॉर्थालोम्यू (२२ मार्च १८६०-१३ एप्रिल १९२०) हा जॉन बॉर्थालोम्यूचा ज्येष्ठ मुलगासुद्धा नकाशाकार आणि नकाशांचा प्रकाशक म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा जन्म व शिक्षण एडिंबरो येथेच झाले. त्याने ब्रिटिश नकाशाविद्येचा दर्जा वाढविला. १८८९ पासून आपल्या वडिलांच्या संस्थेतच त्याने काम केले. रॉयल स्कॉटिश जिऑग्राफिकल सोसायटीचा (१८८४) तो संस्थापक होता. त्याचप्रमाणे १९१३ पासून अधिकृत शाही नकाशाकार म्हणूनही त्याने काम केले. त्याने प्रसिद्ध केलेल्या स्कॉटलंड (१८९५), इंग्लंड व वेल्स (१९०३) या नकाशासंग्रहांतून भौगोलिक व सांख्यिकीय स्वरूपाची विपुल माहिती आढळते. त्याने एका मोठ्या प्राकृतिक नकाशासंग्रहाचे काम हाती घेतले होते. तथापि त्याचे ॲटलास ऑफ मीटिअरॉलॉजी (१८९९) व ॲटलास ऑफ झूजिऑग्रफी (१९११) हे दोनच खंड प्रसिद्ध झाले. नकाशा आरेखनात व छपाईत अनेक तांत्रिक सुधारणा केल्या. त्यांपैकी विशेष महत्वाचे कार्य म्हणजे स्थलवर्णनात्मक नकाशांत उठाव दाखविण्यासाठी त्याने स्तरीय छायांकनाचा आणि समोच्चरेषांचा पद्धतशीर वापर केला. द टाइम्स सर्व्हे ॲटलास ऑफ द वर्ल्ड ह्या नकाशासंग्रहाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पोर्तुगालमधील सिंत्रा येथे त्याचे निधन झाले.

जॉन जॉर्जच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जॉन बॉर्थालोम्यू (१९०८-१९६२) याने आपल्या वडिलांचे हे अपूर्ण काम १९२१ मध्ये पूर्ण केले व द टाइम्स ॲटलास ऑफ द वर्ल्ड हा नकाशासंग्रह संपादित केला (१९५५). तदनंतरच्या पिढीनेहि बॉर्थालोम्यू घराण्याची नकाशा छपाई व प्रकाशन व्यवसायातील परंपरा कायम राखून काही अंशी तीत भरही घातली आहे. ‘प्रवासी मार्गदर्शक नकाशे’ हे एक त्यांचे अलीकडचे उल्लेखनीय प्रकाशन आहे.

चौधरी, वसंत