बारी : इटलीमधील याच नावाच्या प्रांताचे आणि पूल्या (आप्यूल्या) प्रदेशाचे मुख्य ठिकाण व प्रमुख बंदर. लोकसंख्या ३,८६,७१९ (१९७७). हे ब्रिंडिसी शहराच्या वायव्येस सु. ११० किमी. एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. इ. स. पू. १५०० पासून येथे लोकवस्ती असावी. येथे प्रथम ग्रीकांचा व नंतर रोमनांचा अंमल होता. रोमनांच्या काळात हे ‘बॅरीअम’ या नावाने ओळखले जात असे. याच काळात येथील बंदराचा व मत्स्योद्योगाचा विकास झाला. अनेक सत्तांतरांनंतर येथे ख्रिस्ती धर्मगुरूंचा प्रभाव वाढू लागला. इ. स. १०९६ मध्ये सेंट पीटर याने धर्मयुद्धाचा (क्रूसेड) पहिला उपदेश येथेच केला. ११५६ मध्ये हे सिसिलीच्या सैन्याकडून उद्ध्वस्त झाले. दुसऱ्या फ्रीड्रिखच्या कारकीर्दीत (१२२०-५० ) बारीचे महत्त्व पुन्हा वाढले. १५५८ मध्ये याचा नेपल्समध्ये व १८६० पासून इटलीत समावेश झाला.

बारी शहर समृद्ध शेतीच्या प्रदेशात वसलेले आहे. औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या हे शहर महत्त्वाचे आहे. अन्न प्रक्रिया, तेल शुद्धीकरण, रसायने, यंत्रे व कापडनिर्मिती, छपाई, ॲल्युमिनियम, लोखंड, तंबाखू इ. चे कारखाने येथे आहेत. येथून दारू, ऑलिव्ह तेल, धान्य, साबण व अंजिरांची निर्यात होते. १९३० पासून दरवर्षी येथे ‘फिएरा देल लेव्हांते’ या नावाने ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावा भरत असतो. येथील रोमनेस्क कॅथीड्रल (बारावे शतक), नॉर्मन किल्ला, सेंट निकोलसचे स्मारक, बारी विद्यापीठ (१९२४), प्रादेसिक चित्रवीथी, पुरावस्तुसंग्रहालय इ. वास्तू उल्लेखनीय आहेत.

खांडवे, म. अ.