बायो(ब्यो),झां.बातीस्त : (२१ एप्रिल १७७४-३फेब्रुवारी १८६२). फ्रेंच भौतिकीविज्ञ. गणित, ज्योतिशास्त्र, विज्ञानाचा इतिहास, प्रकाशविज्ञान, ध्वनिविज्ञान अशा बहुविध क्षेत्रांत त्यांनी संशोधनकार्य केले. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांनी तेथील कॉलेज ल्वी-ल-ग्रां येथे शिक्षण घेतले. १७९२ मध्ये शिक्षण मधेच सोडून फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी लष्करातील तोफखाना दलात ते दाखल झाले. तथापि १७९४ मध्ये एकोल पॉलिटेक्निक मध्ये त्यांनी पुन्हा शिक्षणास प्रारंभ केला. १७९७ साली पदवी मिळविल्यानंतर बोव्हे येथील एकोल सेंट्रल या संस्थेत ते गणिताचे प्राध्यापक झाले. पुढे पॅरिस येथील कॉलेज द फ्रान्समध्ये १८०० साली गणितीय भौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पी. एस्. एम्. लाप्लास यांच्या शिफारसीमुळे १८०६ मध्ये ब्युरो द लाँजिट्यूड्स या संस्थेत ते साहाय्यक ज्योतिर्विद झाले. १८०८ मध्ये नेपोलियन यांनी पॅरिस विद्यापीठाची स्थापना केल्यावर त्याच्या पॅरिस येथील विज्ञानशाखेत ज्योतिशास्त्राचे प्राध्यायापक म्हणून बायो यांची नेमणूक झाली. १८१६-२६ या काळात त्यांनी भौतिकीचेही अध्यपन केले. १८४० पासून १८४९ सेवानिवृत्त होईपर्यंत ते विद्यापीठाच्या विज्ञानशाखेचे अधिष्ठाते होते.

जे. एल्. गे-ल्युसॅक यांच्या बरोबर १८०४ मध्ये बायो यांनी केवळ वैज्ञानिक संशोधनाकरिता बलूनमधून सु. ४,००० मी. उंची पर्यंत उड्डाण केले. डी. एफ्. ॲरागो यांच्याबरोबर त्यांनी निरनिराळ्या वायूंच्या प्रणमना संबंधीच्या (प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून शिरताना त्यांच्या दिशेत होणाऱ्या बदलासंबंधीच्या) गुणधर्माविषयी संशोधन केले. १८०६ मध्ये या दोघांनी स्पेनमध्ये बार्सोलोना ते बॅलिॲरिक बेटे यांमधील रेखांशाच्या भागाची मोजणी करून रेखांशाच्या एका अंशाचे मापन केले. त्यानंतरच्या काळातही या दोघांनी वॉर्दो (बोर्डो), डंकर्क, स्कॉटलंड, शेटलंड बेटे व पुन्हा स्पेन येथे भूगणितीय मापने [⟶ भूगणित] घेऊन त्यासंबंधीचा वृत्तांत १८२१ मध्ये प्रसिद्ध केला. प्रकाशविज्ञानामध्ये त्यांनी प्रकाशीय दृष्ट्या क्रियाशील असलेल्या पदार्थांनी केलेल्या ध्रुवण प्रतलाच्या घूर्णनासंबंधीचे मूलभूत नियम मांडले [⟶ ध्रुवणमिति]. हे घूर्णन मोजण्यासाठी त्यांनी एक उपकरणही तयार केले होते. त्यांनी केलेल्या शर्करांच्या ध्रुवणमितीय विश्लेषणामुळे शर्करामितीच्या आधुनिक तंत्राचा पाया घातला गेला. फेलीक्स साव्हार यांच्याबरोबर त्यांनी विद्युत् प्रवाह वाहणाऱ्या संवाहकामुळे एखाद्या बिंदूपाशी निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रवर्तनाचे मूल्य देणारा नियम मांडला [⟶ चुंबकत्व]. तो ‘बायो-साव्हार नियम’ म्हणून ओळखला जातो.

फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या गणित विभागाचे सदस्य म्हणून १८०३ मध्ये त्यांची निवड झाली. १८३५ साली ते ॲकॅडेमीचे उपाध्यक्ष झाले. त्यांनी प्राचीन ईजिप्शियन, बॅबिलोनियम व चिनी ज्योतिषशास्त्रावर संशोधनपूर्वक कित्येक ग्रंथ व निबंध लिहिले. यांशिवाय त्यांनी भौतिकी व ज्योतिषशास्त्र या विषयांवर महत्त्वाची पाठ्यपुस्तके लिहिली. लंडनच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून १८१५ मध्ये त्यांची निवड झाली व शर्करामितीवरील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना सोसायटीच्या रम्फर्ड पदकाचा १८४० मध्ये बहुमान मिळाला. १८५६ मध्ये त्यांना फ्रेंच ॲकॅडेमीचे सदस्य करण्यात आले. लिजन ऑफ ऑनरच्या शेव्हालिअर(१८१४),ऑफिसर (१८२३)व कमांडर(१८४९) या पदांचाही त्यांना सन्मान मिळाला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.