बायटोनाइट : खनिज लॅब्रॅडोराइट व ॲनॉर्थाइट यांच्यामधील प्लॅजिओक्लेजाचा प्रकार. अल्बाइट व ॲनॉर्थाइट या समाकृतिक (सारखे रा.सं. स्फटिकांचे समान असणाऱ्या) खनिजांच्या मालेतील ३॰ ते १॰% अल्बाइट रेणू (NaA1Si3O8) व ७॰ ते ९॰% ॲनॉर्थाइट रेणू (CaA12Si2O8) असे याचे संघटन असते. याचे स्फटिक त्रिनताक्ष [ ⟶ स्फटिकविज्ञान] असून ते क्वचित सापडतात. सामान्यत: हे हिरवट पांढऱ्या, करड्या वा निळसर पुंजक्यांच्या रूपात आढळते व त्याची संरचना ⇨अल्बाइटासारखी असते. कठिनता ६. वि.गु. २.६९. हे विरळाच व काही ठराविक अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या) पातालिक (भूपृष्ठामध्ये पुष्कळ खोलीवर थंड झालेल्या उदा., गॅब्रो) व ज्वालामुखी खडकांमध्ये लॅब्रॅडोराइटाच्या बरोबर आढळते. हे ⇨ॲनॉर्थाइटाचा प्रमुख घटक असून ॲनॉर्थाइट व क्वॉर्ट्झ यांच्या मिश्रणातही हे आढळते. याचा वर्णविलास दर्शविणारा (फिरविले असता विविध रंग दाखविणारा) प्रकार दागदागिन्यांत वापरतात. ओटावा (कॅनडा) येथे आढळलेल्या याच्या नमुन्याचे प्रथम वर्णन करण्यात आल्याने त्या गावाच्या जुन्या ‘बायटाऊन’ या नावावरून बायटोनाइट हे नाव पडले आहे.

पहा : फेल्स्पार गट.

ठाकूर, अ. ना.