भव्य बुद्धमूर्ती, बामियान

बामियान : मध्य अफगाणिस्तानातील प्राचीन अवशेषांसाठी विशेषत: बुद्धमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ. त्याला कल सर्करी असेही म्हणतात. ते काबूल प्रांतात काबूलच्या वायव्येस सु.१३॰ किमी. अंतरावर समुद्रसपाटीपासून सु. २,५९॰ मी. उंचीवर कुंडुझ नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या ४७,८२७ (१९७१). प्राचीन काळापासून ते व्यापारासाठी प्रसिद्ध असून हिंदुकुश पर्वतरांगातील बामियान किंवा हाजिखाक या एकमेव खिंडीतूनच रहदारी शक्य होती. सम्राट कनिष्क (सु. पहिले शतक) याने येथे अनेक बौद्ध स्तूप बांधले.

या स्थळाला फाहियान व ह्यूएनत्संग या चिनी प्रवाशांनी अनुक्रमे इ.स.४॰॰ ते ६३२ मध्ये भेट दिली होती. तसेच कोरियन भिक्षू ह्युई चाओ याने इ.स. ७२७ च्या अखेरीस या स्थळाला भेट दिली होती. चंगीझखानाने १२२१ मध्ये हे गाव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी घुल्गुलेह या जुन्या भागातील थडगी त्याने उद्ध्वस्त केली. पहिले इंग्रज-अफगाण युद्ध (१८४॰) या खोऱ्यातच झाले.

खुद्द बामियान येथील अनेक बौद्ध विहारांत शेकडो शैलगृहे असून या शैलगृहांतून भित्तिचित्रे व अनेक प्रकारचे कोरीवकाम आढळते. येथील उत्तुंग खडकात कोरलेल्या दोन बुद्धमूर्ती जगप्रसिद्ध आहेत. चुनेगच्चीत घडविलेल्या या उत्तुंग बुद्धमूर्तीपैकी मोठी मूर्ती ५३ मी. उंच असून ती प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. या मूर्तीचा काल तज्ञांच्या मते इसवी सनाचे तिसरे शतक असावा. लहान मूर्ती ३७ मी. उंच असून तिचा काल इसवी सनाचे पाचवे शतक मानण्यात येतो. या छोट्या मूर्तीभोवतीची चित्रकला उल्लेखनीय आहे. तीत अनेक शैलींचे मिश्रण झालेले असूनही त्यांतून स्वतंत्र बामियान शैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यातील काही चित्रे मध्ये आशियातील चित्रशैलीशी जवळिक दाखवितात, तर काही थोड्या चित्रांवर भारतीय चित्रशैलीची छाप आढळते. बामियान येथील चित्रमूर्तीतून ⇨गांधार शैलीची सर्व वैशिष्ट्ये आढळतात. या शैलीत बाह्यांगी पाश्चात्य कलेची झाक दिसत असली, तरी शिल्पांच्या अंतरंगीचा गाभा भारतीयच आहे आणि शिल्पविषयही भारतीयच आहे.येथील प्राचीन अवशेषांचे जतन व्हावे, म्हणून अफगाण शासनाच्या विनंतीवरून भारतीय पुरातत्त्वज्ञ येथे 1970 पासून काम करीत आहेत.

संदर्भ :   1. Anand, Mulk Raj, Ed, Marg, Vol. XXIV, March 1971, Bombay,

             2. Hayden, H.H. Notes on Some Monuments in Afghanistan, Calcutta, 1910.

             3. Rowland, Benjamin, The Art and Architecture of India, Buddhist, Hindu Jain, Harmondosworth, 1967.

देव, शां. भा.