बाक्वांगा : नवे विद्यमान नाव‘एमबूजीमायी’. मध्य आफ्रिकेतील झाईरे देशाच्या कासाई ओरिएंटाल विभागाची राजधानी व हिऱ्याच्या व्यापाराचे एक प्रमुख केंद्र. लोकसंख्या ३,८२,६३२ (१९७६). हे काबिंदाच्या नैऋत्येस ९॰ किमी. बुशीमे नदीकाठी वसले आहे. देशातील इतर मोठ्या शहरांशी ते सडकांनी जोडलेले आहे. या शहराच्या परिसरात हिऱ्याच्या खाणीचा शोध लागल्याने १९॰९नंतर यूरोपियनांनी त्याचा विकास घडवून आणला. १९६॰ साली दक्षिण कासाई प्रांताची ही राजधानी करण्यात आली. १९६६ मध्ये ‘एमबूजीमायी’ असे तिचे नामांतर करण्यात आले. येथील हिऱ्यांच्या खाणी जगप्रसिद्ध असून औद्योगिक उपयुक्ततेच्या दृष्टीने हिऱ्यांवर प्रक्रिया करण्याचे कारखानेही येथे आहेत. याशिवाय शहरात शैक्षणिक सुविधाही उपलब्ध आहेत.
लिमये, दि. ह.