बाखोफन, योहान याकोब : (२२ डिसेंबर १८१५ – २५ नोव्हेंबर १८८७). स्विस कायदेपंडित व मानशास्त्रज्ञ. बाझेल येथे सधन घराण्यात जन्म. पदवी घेतल्यानंतर (१८३४) न्यायशास्त्र या विषयात त्याने बाझेल विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली (१८४॰) व पुढील दोन वर्षे पॅरिस व लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास केला. बाझेल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून (१८४२- ४४) आणि याच शहरात न्यायाधीश म्हणून (१८४४-६६) त्याने काम केले. कायद्याच्या इतिहासासंबंधीचे दोन व्याप्तिलेख (१८४३) आणि रोमन नागरी कायद्यावरील दोन ग्रंथ (१८४७ व १८४८) ही त्याची उल्लेखनीय ग्रंथसंपदा. यानंतर तो मानवशास्त्राच्या अभ्यासाकडे वळला. १८४२-४३च्या दरम्यान इटलीमध्ये प्रवास करताना पाहिलेल्या प्राचीन थडग्यांमुळे त्याची या विषयाच जिज्ञासा जागृत झाली. इटली व ग्रीस या देशांत त्याने १८४८-४९ व १८५१-५२ या काळात अभ्यासू वृत्तीने प्रवास केला. त्याच्या मानवशास्त्रविषयक संशोधनाचे फलित म्हणून त्याचे पुढील ग्रंथ उल्लेखनीय आहेत. : ए हिस्टरी ऑफ द रोमन्स (इं.शी. १८५१, एफ्.डी. गेलार्खच्या सहकार्याने), एसे ऑन द टूम सिम्बॉलिझम ऑफ द एन्शंट्स (इं.शी. -१८६१), द मदर राइट (इं.शी.). याशिवाय त्याचे काही स्फटलेखही प्रसिद्ध आहेत.
संदर्भ : Dormann, Johannes, Was Johann Jakob Bachofen Evolutionist? Anthropos, 60:I-48, Fribourg, 1965.
देशपांडे, सु. र.