मेंडे : पश्चिम आफ्रिका खंडातील द. सिएरा लिओनमधील एक आदिम जमात. त्यांपैकी काही थोडे जवळच्या लायबीरियातही आढळतात. लोकसंख्या सु. १० लाख (१९८१). मेंडे नायजर–काँगो भाषाकुटुंबातील मांडे शाखेतील बोलीभाषा बोलतात. फिरती शेती हा त्यांचा प्रमुख धंदा. तांदूळ हे प्रमुख पीक असून केळी, सुरण, टॅपिओका, मका इ. पिकेही ते घेतात. कोको, आले, शेंगदाणे ही नगदी पिके होत. मच्छीमारी व पाम वृक्षाचे उत्पादन हीही त्यांच्या उपजीविकेची साधने आहेत.

छोटी गावे व खेडी यांतून हे लोक राहतात. प्रत्येक भागाचा एक प्रमुख असतो. ते पद वंशपरंपरागत असते. सर्वप्रमुख म्हणूनही एक पद असते. धार्मिक विधींसाठी एक पोरो-पुरोहित वर्ग असतो. जमातीमधील श्रेष्ठ व ज्येष्ठ पुरुषांचे मंडळ असते. ते मंडळ सर्व मेंडे कायदेकानूंचे पालन पद्धतशीर होते किंवा नाही, यावर लक्ष ठेवते. शिवाय काही गुप्तसंघटना व पोरो समाज मुलामुलींना शिक्षण देतात, त्यांच्या लैंगिक संबंधावर लक्ष ठेवतात, शेतीला प्रोत्साहन देतात आणि लष्करी प्रशिक्षणही देतात. कर्मकांडात मुखवटे वापरण्याची प्रथा आढळते. वयात आलेल्या मुलामुलींच्या दीक्षाविधीस महत्त्व असून त्यानंतरच ती मुले गुप्तसंघटनेची सभासद होतात. स्त्रियांच्या गुप्तसंघटनेला सांडे म्हणतात. वयात आल्यानंतर विवाह होतात. मामेबहिणीच्या विवाहास अग्रक्रम देतात. देज देण्याची पद्धत असून बहुपत्नीत्व रूढ आहे. प्रत्येक पत्नीसाठी स्वतंत्र घर असते. वारसाहक्क मुलाकडे जातो. मेंडे हे पारंपरिक जडप्राणवादी असून भूतपिशाच्चांची पूजा रूढ आहे. याशिवाय रोगराईच्या निवारणासाठी ते जादूटोण्याचा वापर करतात. विसाव्या शतकात अनेक मेडेंनी इस्लाम वा ख्रिस्ती धर्माचा अंगीकार केला आहे.

देशपांडे, सु.र.