बाकुबा : आफ्रिकेतील झाईरे प्रजासत्ताकातील १६ छोट्या जमातींचा समूह. तो कूबा म्हणूनच ओळखला जातो. कासाई आणि सांकूरू नद्यांच्या संगमाच्या पूर्वेकडे या जमातींची वस्ती असून ते नायजरकाँगो भाषासमूहातील बेन्वेकाँगो ही भाषा बोलतात. लोकसंख्या ७५,॰॰॰ (१९७५ अंदाज). हे लोक शेती करतात. मका, बारीक, तृणधान्ये, भुईमूग, घेवडा ही त्यांची मुख्य पिके. ताड व तेलमाड यांचीही ते लागवड करतात. मका हे नगदी पीक असून ते काटांगा प्रदेशात पाठविण्यात येते. शिकार आणि मच्छीमारी हेही व्यावसाय त्यांच्यात रूढ आहेत.
या समूहातील जमाती स्वत:ला मातृवंशी मानतात व आपली वंशावळ आईकडून सांगतात. एकाच मातृवंशातील या जमाती विविध कुळींत विखुरलेल्या आहेत. इ.स. १६॰॰ पासून बाकुबांचे स्वतंत्र शासन असून त्यावरील बुशंगो जमातीच्या राजाचा हक्क ईश्वरदत्त समजला जातो. बुशंगोंचे राज्य संघराज्यात्मक स्वरूपाचे असून प्रत्येक जमातप्रमुख आपापल्या जमातीचे नियंत्रण करतो. या सर्व जमातींचे समान बंधत्वाचे घटक म्हणजे सांस्कृतिक सारखेपणा, समूहभावना, शाही सेनादल आणि समाईक प्रशासन हे होत. बाकुबा जडप्राणवादी आहेत. पूर्वी जादूटोणा करणाऱ्याना विषप्राशन करविण्यास लावीत. ही प्रथा १९३॰ च्या सुमारास शोधून बंद करण्यात आली व अशा आरोपींना शोधून काढण्यासाठी स्वतंत्र संघटना उभ्या करण्यात आल्या तथापि १९५९ नंतर पुन्हा जुने कर्मकांड सुरू झाल्याचे दिसते. बाकुबांच्या नित्योपयोगाच्या वस्तूही सजवलेल्या असतात. काष्ठशिल्पे, रफिया, क्लॉथवरील भरतकाम, दीक्षाविधीचे मुखवटे यांसारख्या वस्तू निर्यातही केल्या जातात.
मांडके, म. बा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..