मस्तिष्क निर्देशांक : (सिफॅलिक इन्डेक्स). मस्तकमापनशास्त्राप्रमाणे योग्य त्या उपकरणांच्या आधारे मानवी कवटीची जी अनेकविध मोजमापे घेण्यात येतात, त्यांना मस्तिष्क निर्देशांक (परिमाण) म्हणतात. मस्तकाची लांबी व मस्तकाची रुंदी ही मुख्यत्वे मस्तकाची दोन मोजमाप आहेत परंतु केवळ लांबी अगर रुंदीवरून मस्तकाच्या आकाराविषयी काही सांगता येत नाही. सॅम्यूएल जॉर्ज मॉटिनच्या उपपत्तीप्रमाणे अनेक (सु. १००च्या वर) मोजमापे कवटीवर घेण्यात येतात. त्यांपैकी कवटीची लांबी, रुंदी, उंची, जाडी आणि धारणक्षमता तसेच कपाळाची रुंदी, चेहऱ्याची उंची, नाकाची उंची, रुंदी, बुहद्रंध्राची लांबी-रुंदी, मस्तकाची रुंदी व लांबी या दोन्ही मोजमापांचा उपयोग करून मस्तकाचा निर्देशांक काढला जातो. त्यातील परिमाणांच्या कक्षानुसार मस्तकाचा आकार वा प्रकार ठरविला जातो. हा निर्देशांक पुढीलप्रमाणे काढता येतो :

मस्तिक निर्देशांक (परिणाम) = मस्तिकाची अधिकाधिक रुंदी × १००

मस्तकाची अधिकाधिक लांबी

ह्या निर्देशांकानुसार मस्तकाचे मुख्यत्वे तीन प्रकार पडतात, ते असे. लंबशीर्षी, मध्यशीर्षी व रुंदशीर्षी. याशिवाय ह्या तीन प्रकारांचे उपप्रकारही पडतात. उदा., अतिलंबशीर्षी, अतिरुंदशीर्षी वगैरे. मस्तकाची लांबी व रुंदी पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये निरनिराळी असल्याने मस्तकाचा आकार ठरविण्यासाठी लिंगाप्रमाणे मस्तिष्क निर्देशांकाच्या कक्षाही वेगळ्या असतात. मस्तकाच्या मुख्य प्रकारांच्या तीन कक्षा पुढीलप्रमाणे :

मस्तकाचा प्रकार मस्तिष्क निर्देशांक

पुरुष स्त्रिया

लंबशीर्षी क्ष-७५.९ क्ष-७६.९

मध्यशीर्षी ७६.० ते ८०.९ ७०.० ते ८१.९

रुंदशीर्षी ८१.०-य ८२.०-य

ह्या निर्देशांकांचा उपयोग वंश वर्गीकरणात फार मोठ्या प्रमाणावर केला जातो.

कुलकर्णी, वि. श्री.