बांगला देश : दक्षिण आशियातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील एक प्रजासत्ताक देश. भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातील या राष्ट्राचा उदय १९७१ साली झाला. तत्पूर्वी हा देश पूर्व पाकिस्तान या नावाने पाकिस्तानचाच एक प्रांत होता. पाकिस्तानच्या इतर प्रांतांपासून तो १,७५० किमी.च्या भारतीय प्रदेशाने अलग केलेला होता. हा देश २१° ५’ उ. ते २६° ४०’ उ. अक्षांश आणि ८८°५’ पू. ते ९२° ५०’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. क्षेत्रफळ १,४३,९९८ चौ. किमी. बांगला देशाची जमिनीवरील ४,७१२ किमी. सरहद्द बहुतांशी भारताने वेढलेली असून याच्या पश्चिमेस व वायव्येस भारतातील प. बंगाल, उत्तरेस आसाम व मेघालय, पूर्वेस आसाम व त्रिपुरा ही राज्ये आणि मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश आहे. आग्नेयीकडील केवळ २८० किमी.ची सरहद्द ब्रह्मदेशाशी निगडित आहे. दक्षिणेकडे बांगलाच्या उपसागराच्या ७१६ किमी.चा किनारा त्यास लाभला आहे. लोकसंख्या ८,६६,४३,००० (१९७९ अंदाज) असून डाक्का (लोक. १६,७९,६००–१९७४) ही देशाची राजधानी आहे. रवींद्रनाथ टागोरांचे आमार सोनार बांगला … हे गीत बांगला देशाचे राष्ट्रगीत आहे.

भूवर्णन : बांगला देश म्हणजे नद्यांच्या संचयन कार्यामुळे तयार झालेले गाळाचे विस्तीर्ण असे मैदान असून देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीपासून १५ मी. पेक्षाही कमी उंचीचा आहे. उपसागरी बाजूस दलदल असून तीत ‘सुंद्री’ची झाडे खूप आढळतात. त्यामुळे ‘सुंदरबन’ म्हणून ओळखला जाणारा भाग भारताप्रमाणेच याही देशात आहे. देशाच्या आग्नेय, उत्तर व ईशान्य भागांत अनेक टेकड्या आहेत. ईशान्येकडे ३० ते ३३५ मी. उंचीच्या तुटक अशा सिल्हेट टेकड्या असून त्यांतील कसारा पहार, लुभाचरा व चतल तिला या प्रमुख आहेत. देशाच्या आग्नेय भागात उत्तर-दक्षिण पसरलेल्या सरासरी ६०० मी. उंचीच्या चितगाँग टेकड्या असून दऱ्याखोऱ्‍यांनी व अरण्यांनी व्यापलेला हा भाग देशातील इतर भागांपेक्षा वेगळा ठरतो. मौंट केओरॅडाँग (१,२३० मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच भागात आहे. पश्चिमेकडील गंगा, ब्रह्मपुत्रा यांच्यामधील ९,२०० चौ.किमी.चा बारिंद, ब्रह्मपुत्रा व मेघना यांच्यामधील ६३,५०० चौ.किमी.चा मधुपूर आणि मेघना नदीच्या पूर्वेकडील लालभाई हे तीन मैदानी भाग गाळाच्या संचयनाने बनलेले आहेत. या तीन विभागांच्या दक्षिणेकडील बाजूस नवीन गाळाचे मैदान तयार झालेले आहे.

नद्या : देशभर नद्यांचे जाळे पसरलेले असून गंगा, जमुना (ब्रह्मपुत्रा), मेघना, पद्मा, तिस्ता, कर्णफुली, ढालेश्वरी, बुढीगंगा या देशातील प्रमुख नद्या होत. ब्रह्मपुत्रा नदीच्या मुख्य प्रवाह बांगला देशात जमुना या नावाने ओळखला जातो. गंगा नदी भारतातून या देशात वायव्य दिशेने वाहत आल्यानंतर पुढे तिला उत्तरेकडून जमुना नदी येऊन मिळाल्यानंतर हा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. मेघना नदी पुढे बांगलच्या उपसागरास जाऊन मिळते. देशाचा ईशान्य भाग मेघना खोऱ्याने व्यापलेला आहे. देशाच्या वायव्य भागातील अधिक उंचीचा प्रदेश तिस्ता व तिच्या उपनद्यांनी व्यापलेला आहे. तिस्ता नदीला वारंवार पूर येतात व तिचे पात्रही बदलते. आग्नेय भागात कर्णफुली ही प्रमुख नदी आहे. गंगा व तिच्या उपनद्यांमुळे बांगला देशात विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला असून त्यातील कोबाडक, गाराई, मधुमती, बुरीश्वार या प्रमुख प्रवाहशाखा होत.

नद्यांना येणारे पूर व वारंवार बदलणारी पात्रे–विशेषतः जमुना नदीचे–यांमुळे अनेक वेळा प्राणहानी व वित्तहानी होत राहते तसेच वाहतुक व दळणवळणही खंडित होते. डाक्का व फरीदपूर या देशाच्या मध्यभागातील जिल्ह्यांना पुराचा नेहमीच तडाखा बसतो तथापि पुराच्या वेळी गाळाचे संचयन होऊन हा भाग सुपीक होण्यास मदत झाली आहे.

मृदा : बांगला देशात जुनी गाळाची, नवी गाळाची व पर्वतीय अशा तीन प्रकारच्या मृदा आढळतात. नवीन गाळाची मृदा सुपीक असून ती प्रामुख्याने पूरप्रदेशात आढळते. फॉस्फोरिक अम्ल, नायट्रोजन, सेंद्रीय पदार्थ यांचे प्रमाण या मातीत कमी असले, तरी पोटॅश व चुन्याचे प्रमाण अधिक असते. बारिंद व मधुपूर या मैदानी प्रदेशांतील जंगलात आढळणारी जुनी जलोढीय मृदा गर्द तपकिरी व दुमट प्रकारची आहे. पावसाळ्यात ही चिकट, तर कोरड्या ऋतूत कठीण बनते. पर्वतीय मृदा जंगलांच्या वाढीस पोषक आहे.

कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही प्रमुख खनिज-इंधने होत. सिल्हेट, बोग्रा व जमालपूर येथे कोळशाच्या खाणी आहेत. सिल्हेट जिल्ह्यातील हरीपूर, छाटक, कैलाश-टिला, रशीदपूर, शादी बाझार येथे आणि कोमिल्ला जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया, बखेराबाद येथे नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत. हरीपूर, रशीदपूर व कैलाश-टिला येथील नैसर्गिक वायू सिल्हेटमधील ‘पेंचुगंज नॅचरल गॅस फर्टिलायझर फॅक्टरी’ला पुरविला जातो तर ब्राह्मणबारिया येथील टिटाज क्षेत्रातील नैसर्गिक वायू नळांद्वारे डाक्क्यापर्यंत नेला आहे. खनिज तेलाचे साठे प्रामुख्याने बंगालच्या उपसागरात सापडले आहेत. डोंगराळ भागात जलविद्युत्शक्तिच्या विकासास बराच वाव आहे. यांशिवाय मीठ, चुनखडी, शाडू, काचनिर्मितीसाठी लागणारी वाळू ही येथील इतर खनिजे होत. खनिजे संपत्तीच्या दृष्टीने हा देश फारसा समृद्ध नाही.


हवामान : देशाचे हवामान उष्ण मोसमी प्रकारचे आहे. उन्हाळ्यातील कमाल तपमान ३३° ते ३६° से. पर्यंत पर्यंत आढळते. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या नैर्ऋत्य मान्सूनच्या शाखेमुळे जून–ऑक्टोबर या काळात येथे पाऊस पडतो. हवामान आर्द्र असून पर्जन्याचे सरासरी प्रमाण १५० सेंमी. आहे. डोंगराळ प्रदेशात हेच प्रमाण ५०० सेंमी. पर्यंत गेलेले आढळते. बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळांचा तडाखा या देशास वारंवार (विशेषतः मार्च ते जुलै आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर) बसतो. त्यामुळे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. नोव्हेंबर १९७० मधील चक्रीवादळामुळे सु. २,५०,००० लोक मरण पावले.

वनस्पती व प्राणी : देशातील सु. १६% भूभाग जंगलमय आहे. चितगाँग टेकड्यांच्या परिसरात तसेच सिल्हेट, खुलना या जिल्ह्यांत मोठी जंगले असून डाक्का आणि मैमनसिंग जिल्ह्यांतील काही भाग अरण्यमय आहे. देशातील वनस्पतीसृष्टी विविध प्रकारची आढळते. ग्रामीण परिसर आमराई, वेळूवने, फणस, व सुपारी व खजुराच्या बागा यांनी नटलेला आहे. ईशान्य भागात बांबू व रॅटॅन पाम यांची जंगले असून बांबू हे देशातील महत्त्वाच्या कागद उद्योगाचा आधारस्तंभ होय. तळी व सरोसरे यांनी व्यापलेल्या मध्य विभागात दलदली वनस्पती आढळतात. मधुपूर जंगलाच्या भाग यातच मोडतो. जमुनेच्या वायव्येकडील व पद्मेच्या नैर्ऋत्येकडील मैदानी भागात बागायती वनस्पती (विशेषतः फळबागा), बाभूळ इ. वनस्पती आढळतात. द. भागात (विशेषतः सुंदरबनात) कच्छ वनश्री आढळते. यांशिवाय सुंद्री, वृत्तपत्रीय कागद बनविण्यास आवश्यक अशी गेवा तसेच गोरण, पासू इ. वनस्पतिविशेष आढळतात.

देशात सामान्यतः आढळणाऱ्या वनस्पतींत आंबा, नारळ, सुपारी, खजूर, वटवृक्ष, ओसूथ यांचा अंतर्भाव होतो. फुलांपैकी बंगाली गुलाब, कमळे, गंधराज निशिगंध, बकुळ, कामिनी हे फुलांचे प्रकार सर्वत्र दिसून येतात.

या देशात सस्तन प्राण्यांचे सु.२००, पक्ष्यांचे ७५०, सरपटणाऱ्या प्राण्यांचे १५० व माशांचे २०० प्रकार आढळतात. चितगाँग टेकड्यांत हत्तींचे कळप व रानरेडे आढळतात. रेडे व रानरेड्यांचा उपयोग शेतीकामास व वाहतुकीसाठी केला जातो. यांशिवाय हरणांच्या काही जाती येथे आढळतात. उदा., भुंकणारे हरिण, बारशिंगा, सांबर इ. दिसून येतात. सुंदरबनात प्रसिद्घ बंगाली वाघ व चित्ते आढळतात. अस्वलांचेही काही प्रकार देशात आहेत. कोल्हा, मुंगूस, माकड हेही सर्वत्र आढळतात. देशात आढळणाऱ्या अनेक प्रकारच्या पक्ष्यांपैकी कोकीळ, बुलबुल, खंड्या, ससाणा, गरूड, गिधाडे, घुबड इ. उल्लेखनीय आहेत.

आठल्ये, द.बा. चौधरी, व. सु.

इतिहास : १९४७ पासून पाकिस्तानचा एक प्रांत व पुढे स्वतंत्र बांगला देशाच्या १९७१ मधील उदयापर्यंतचा इतिहास हा पाकिस्तानविरोधी असंतोषाचा एक इतिहास आहे. वास्तविक पाहता पूर्व व पश्चिम पाकिस्तानमध्ये धार्मिक समानतेखेरीज कोणताही दुवा नव्हता. या असंतोषाचा मुळाशी बांगला देशाच्या स्वतंत्र सांस्कृतिक परंपरांची व न्याय राजकीय आकांक्षांची पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी सतत केलेली उपेक्षाच होती, असे दिसून येईल. येथील मूठभर उच्चभ्रू, उच्च वर्णीय आणि प्रायः प. आशियातील मुसलमानांचे वंशज असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या अशरफांकडे वर्षानुवर्षे राजकीय नेतृत्त्व होते.

१९४६ च्या सुरुवातीस निवडणुका झाल्या, त्या वेळी देशात फक्त १५ टक्के सुशिक्षित व जमीनजुमला धारणा करणाऱ्‍यांनाच मताधिकार होता. त्यामुळे बंगालमध्ये अशरफ मुसलमानांचा राजकारणावरचा प्रभाव टिकून होता. निवडणुकांत मुस्लिम लीगला नेत्रदीपक यश मिळाले. पक्षावर जिनांची पकड अधिकच घट्ट झाली. ७ ते ९ एप्रिल १९४६ ला निवडून आलेल्या लीग नेत्यांचे दिल्लीत खास अधिवेशन झाले. या अधिवेशनात जिनांच्या सूचनेवरून सुहरावर्दी या दुसऱ्या एका बंगाली नेत्याने १९४० चा लाहोर ठराव दुरुस्त करून दोन पाकिस्तानांऐवजी एकच पाकिस्तान निर्माण करावे असा ठराव मांडला व तोही एकमताने पसार झाला. अशा रीतीने बंगाली मुस्लिम जनतेला काहीसे अंधारात ठेवून, निवडणुका संपेपयर्यंत वाट पाहून, त्यानंतर पूर्व बंगाल नियोजित पाकिस्तानात सामील करण्याचे आपले स्वप्न जिनांनी साकार केले.


अखंड पाकिस्तानात ५६ टक्के एवढी विशाल लोकसंख्या धारण करणाऱ्या पूर्व पाकिस्तानींना राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्याऐवजी पाकिस्तानी सरकारने हिंदुद्वेष, जातीय दंगली, भारतद्वेष इ. फाळणईपूर्व विषवपन चालूच ठेवले. त्याचबरोबर इतरही काही आत्मघातकी धोरणे अंगिकारिली. विद्यमान बांगला देश हा पूर्वी पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जाई. पाकिस्तानने उर्दूला अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता दिल्यापासूनच पूर्व पाकिस्तानातील बहुसंख्य बंगाली भाषिकांत असंतोष निर्माण झाला. अखेर सहा वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर व अनेक हुतात्मे बळी गेल्यानंतर १९५४ मध्ये बंगालीला संयुक्त राजभाषेचा दर्जा देण्यात आला. पुढे १९५५ मध्ये पूर्व व पश्चिम अशी पाकिस्तानची पुनर्रचना होऊन पाकिस्तानच्या राष्ट्रीय विधानसभेत दोहोंना समान प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली. तथापि लोकसंख्या दृष्टीने हे अन्याय्यच होते. कारण बंगाली भाषिक पाच कोटी तर प. पाकिस्तानी चार कोटीच होते. तरीही पूर्व पाकिस्तानातील असंतोष कमी झाला नाही. जनरल अयुबखानच्या अध्यक्षीय राजवटीत पू. पाकिस्तानींना अगोदरच्या दहा वर्षांत जी सत्ता होती, तीही राहिली नाही. शेख मुजीबूर रहमान यांच्या अवामी लीगने स्वायत्ततेची मागणी केली. डिसेंबर १९७० मधील निवडणुकांत देशाच्या राष्ट्रीय विधानसभेत अवामी लीगला बहुमत प्राप्त झाले. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान या पक्षाचे अध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांस मिळावयास हवे होते. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्याखान व प. पाकिस्तानात बहुमत मिळालेले भुट्टो यांचा मुजीबने पंतप्रधान होण्यास विरोध होता. पाकिस्तानी सैन्याने पू. पाकिस्तानात दडपशाही सुरू केली. परिणामतः २६ मार्च १९७१ रोजी स्वतंत्र बांगला देश प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. अवामी लीगने कायदेभंगाची चळवळही सुरू केली. परिणामतः शेख मुजीब व इतर नेत्यांना अटक करण्यात आली. मुक्तिवाहिनीने बांगला देशाच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला. त्यामुळे त्या काळात लक्षावधी हिंदु-मुसलमान निर्वासित पू. पाकिस्तानातून भारतात आश्रयाला आले. शेवटी भारताला मुक्तिसंग्रामाला मदत करणे भाग पडले. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पतकरली. जानेवारी १९७२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भुट्टो यांनी शेख मुजीब यांची मुक्तता केली. बांगला देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शेख मुजीब अधिकारारूढ झाले. मार्च १९७३ मधील निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वावर बहुसंख्य मतदारांनी शिक्कामोर्तब केले. स्वतंत्र बांगला देशाला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली. २२ फेब्रुवारी १९७४ रोजी पाकिस्ताननेही बांगला देशाला अधिकृत मान्यता दिली. [⟶ पाकिस्तान].

स्वातंत्र्ययुद्ध व अवर्षण यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली होती. दहशतवाद आणि धर्माधिष्ठित पक्ष यांमुळे देशांतील राजकीय स्थैर्यही धोक्यात आले व भारतविरोध प्रचाराला धार आली. अमेरिका, पाकिस्तान व चीन देशांनी बांगला देशांत भारतविरोधी वातावरण तयार करण्यास हातभार लावला. त्यामुळे १९७४ मधील डिसेंबरच्या अखेरीस देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. जानेवारी १९७५ मध्ये देशातील संसदीय शासनव्यवस्था रद्द करून त्याऐवजी अध्यक्षीय राजवट सुरू करण्यात आली. शेख मुजीब हे राष्ट्राध्यक्ष बनले व त्यांच्या सर्वंकष सत्ता आली. त्यांनी ‘शेतकरी व कामगार अवामी लीग’ हा पक्ष स्थापून देशातील इतर पक्षांवर बंदी घातली. शेख मुजीब यांना अनुयायांवर नियंत्रण ठेवता आले नाही. मुक्तिसंग्रामकाळातील फारच थोडी शस्त्रे सरकारला परत करण्यात आली. तसेच माजी मुक्तिसैनिकांनी केलेल्या बेफाम वागणुकीमुळे सरकारबद्दलची आस्था कमी झाली. परिणामतः १५ ऑगस्ट १९७५ रोजी शेख मुजीब व त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती यांची एका एका सैनिकी अधिकाऱ्यांच्या गटाने हत्या केली. हे हत्याकांड अत्यंत सूचक ठरते या नवजात देशाच्या सैन्यात योग्य परंपरा अथवा संकेत निर्माण झाले नाहीत किंवा ते तसे निर्माण होण्यास वेळ मिळाला नाही. सैन्याला गटबाजीने ग्रस्त केले. सैनिकी बंडाळ्या वरचेवर उद्‍भवत राहिल्या. पाकिस्तानधार्जिणे इस्लामपसंद गट, सैन्यातील गट, चीनशी एकनिष्ठ असलेले डावे आतंकवादी गट यांमुळे देशाचे राजकीय स्थैर्य नष्ट झाले. शेख मुजीबनंतर खोंडकर मुश्ताक अहमद यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता हाती घेतली व देशात लष्करी कायदा पुकारून सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. त्यानंतर लष्करी कायदा पुकारून सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली. त्यानंतर ७ नोव्हेंबर १९७५ मध्ये पुन्हा अवचित सत्तांतर होऊन ब्रिगेडिअर खलिद मुशरफ यांच्या हाती सत्ता गेली. यानंतर चारच दिवसांनी म्हणजेच ११ नोव्हेंबर १९७५ रोजी पुन्हा लष्करी उठाव झाला व सैन्यातील तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या संयुक्त लष्करी कायदा-प्रशासक म्हणून अधिकारी देण्यात आले. अबू सादात महंमद सायेम हे राष्ट्राध्यक्ष बनले आणि तटस्थ अपक्षीय सरकार अस्तित्वात आले. या नव्या व्यवस्थेत मेजर जनरल झिया उर् रहमान यांच्या हाती अधिकाधिक सत्ता एकवटत गेली. वायुसेना प्रमुख एअर व्हाइस-मार्शल एम्. जी. तबाब हे लष्करी उठाव करण्याच्या विचारात आहेत, अशी वदंता पसरली परिणामतः तबाब यांनी मे १९७६ मध्ये राजीनामा दिला. सुरक्षिततेच्या दृष्टीने देशाचे ११ विभाग करण्यात येऊन त्यांवर लष्करी कायदा प्रशासक म्हणून भू व नौसेनेतील अधिकारी नेमण्यात आले. जनरल झिया यांनी प्रातिनिधिक सरकार स्थापन करण्याचे जाहीर केले होते. १९७६ मध्ये राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली व १ ऑगस्टपासून काही विशिष्ट मर्यादेत देशातील राजकीय पक्षांना कार्य करण्यास संमती देण्यात आली. १९७७ च्या फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करण्यात आली. तथापि २४ नोव्हेंबर १९७६ रोजी या निवडणूक अनिश्चित काळ पुढे ढकलण्यात आल्या. त्याचप्रमाणे देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष मुश्ताक अहमद यांना व इतरांना अटक झाली. देशातील लष्करी कायदा प्रशासन प्रमुख म्हणून झिया यांनी राष्ट्राध्यक्ष सायेमकडून सत्ता आपल्याकडे घेतली. पुढे सायेम यांनी राजीनामा दिल्याने २१ एप्रिल १९७७ पासून झिया यांच्याकडेच राष्ट्राध्यक्षपद आले. त्यांनी घटनादुरुस्ती करून धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रद्द करून त्याऐवजी बांगला देश इस्लामी राष्ट्र म्हणून घोषित केले. मे १९७७ मध्ये सार्वत्रिक लोकमत घेण्यात आले व त्यात ९९% लोकांनी झिया यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला. ऑक्टोबर १९७७ मध्ये झालेला सत्तांतराचा उठाव यशस्वीपणे दडपून टाकण्यात आला पण हे कारण पुढे करून देशातील तीन प्रमुख राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली. भू व वायुसेनेतील अनेक अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आले व अनेकांना कारावासात डांबण्यात आले. लष्करी कायदा जारी असतानाच जून १९७८ मध्ये देशात प्रथमच सार्वत्रिक प्रौढ मतदानानुसार राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यात आली. तिचा कौल जनरल झिया यांच्या बाजूनेच गेला. त्यांनीही ‘बांगला देश राष्ट्रीय पक्ष’ स्थापन केला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी सल्लागार समिती बरखास्त करून मंत्रिमंडळाची स्थापना केली. जानेवारी १९७९ मध्ये संसदीय निवडणुका घ्यावयाच्या होत्या त्यांवर देशातील १२ राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तथापि विरोधकांच्या मागणीनुसार १९७४ च्या घटनादुरूस्तीतील सर्व लोकशाहीविरोधी तरतुदी रद्द करण्यात आल्या राजकीय कैद्यांची मुक्तता करण्यात आली व वृत्तपत्रांवरील निर्बंध दूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लष्करी कायदा उठविण्यात आला. परिणामतः राष्ट्रीय अवामी पक्ष व मुस्लीम लीग यांनी निवडणुकीत भाग घेण्याचे ठरविले.

मेजर जनरल मझूर अहमद यांनी चितगाँग येथून केलेल्या लष्करी उठावात ३० मे १९८१ रोजी राष्ट्राध्यक्ष जनरल झिया यांचा चितगाँग येथे खून करण्यात आला परंतु हा उठाव केवळ ४८ तासांच्या आतच निपटून काढण्यात आला. मंझूर अहमद यांना अटक करण्यात आली (१ जून १९८१). राष्ट्राध्यक्ष अब्दुस सत्तार त्याचप्रमाणे पंतप्रधान शाह अझिझ उर् रहमान यांनी यशस्वीपणे देशातील राजकीय स्थैर्य टिकवून ठेवले. मंझूर अहमद यांचा चिडलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी ३ जून १९८१ रोजी खून केला. काहींच्या मते पोलीस व बंडखोर यांच्या संघर्षात मंझूर बळी पडले.

पाकिस्तानबरोबरचे संबंधही १९७६ पासून सुधारू लागले. राजदूतांची अदलाबदल, टपाल-तार इ. दळणवळणांची सुरुवात झाली आणि चहा, ताग यांची प्रथमच पाकिस्तानात आयात करण्यात आली. भारत-बांगला सरहद्दीवर होणारी दहशती कृत्ये ही एक मोठी समस्या आहे. १९७४ सालचा भारताशी झालेला व्यापारी करार कधी अंमलात आलाच नाही. बांगला देशामधून कलकत्ता-अगरतला हा लोहमार्ग होणार होता, पण तो सुरू करता आला नाही. समुद्रसीमेसारख्या विवाद्य प्रश्नावर शेख मुजीब यांनी एकतर्फी निर्णय घेऊन भावी तंट्यांचे बीज परल्याचे म्हटले जाते. फराक्का बंधाऱ्याची समस्या नोव्हेंबर १९७७ मधील पंचवार्षिक करारानुसार निर्धारित करण्यात आली आहे.


राज्यव्यवस्था : ऑगस्ट १९७५ ते डिसेंबर १९७८ पर्यंत देशात लष्करी कायदा जारी होता. बांगला देशाचे मूळ संविधान राष्ट्रीयता, समाजवाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर अधिष्ठित होते. १९७७ मधील घटनादुरूस्तीवर धर्मनिरपेक्षतेऐवजी इस्लाम धर्मीय राष्ट्र अशी सुधारणा करण्यात आली. समाजवादी आर्थिक व्यवस्था, मूलभूत मानवी हक्क व स्वातंत्र्य, कायद्याचे राज्य, सार्वत्रिक, मोफत व आवश्यक शिक्षण ही संविधानातील काही महत्त्वाची तत्त्वे होत. इस्लामधर्मीय राष्ट्रांत एकात्मता साधणे अशी तरतूद आहे. देशात घटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे.

राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असून सार्वत्रिक प्रौढ मतदाराने ५ वर्षांसाठी त्याची निवड करण्यात येते. दुसऱ्‍यांदा निवडणूक लढविण्याची त्यास मुभा आहे. राष्ट्राध्यक्षाच्याच हाती सर्व सेनादले असतात. तो उपराष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व इतर मंत्री, तसेच सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची निवड करतो. संसद (जातीय संघसद) एकसदनी आहे. तिचे एकूण ३१५ सदस्य असून त्यांपैकी १५ स्त्री-सदस्य १० वर्षांसाठी असतात. सदस्यांची निवड सार्वत्रिक मतदान पद्धतीने होते. १८ वर्षांपुढील व्यक्तींना मतदानाचा अधिकार आहे. संसदेची मुदत ५ वर्षांसाठी असते. बांगला देशाचे हंगामी अध्यक्ष अब्दुस सत्तार यांनी जनरल झिया यांच्या हत्येनंतर देशात आणीबाणी जाहीर केली. देशच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षाच्या अनपेक्षित मृत्यूनंतर उपराष्ट्राध्यक्ष हा राष्ट्राध्यक्ष होतो व सहा महिन्यांच्या आत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे देशात नोव्हेंबर १९८१ पर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत सत्ताधारी ‘बांगला देश राष्ट्रीय पक्षा’च्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांना–अब्दुस सत्तार यांना–भाग घेता यावा म्हणून २१ जुलै १९८१ रोजी संसदेने संविधानदुरूस्ती करून विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा हंगामी राष्ट्राध्यक्ष यांना आपल्या सवेतन अधिपकारपदाचा राजीनामा न देता राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे भावी निवडणुकांत या घटनादुरूस्तीचा फायदा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारालाच मिळण्याची शक्यता आहे. देशात निर्वाचन आयोग आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त व त्याच्या हाताखालील इतर निर्वाचन आयुक्तांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतो. १९७८ च्या अखेरीस देशात एकूण २३ राजकीय पक्ष होते. त्यांपैकी झिया उर् रहमान यांनी स्थापन केलेला ‘बांगला देश राष्ट्रीय पक्ष’ हा सत्ताधारी असून त्याशिवाय शेख मुजीबूर रहमान यांची सुकन्या हसीना वाजेद यांचा अवामी लीग व माजी राष्ट्राध्यक्ष खोंडकर मुश्ताक अहमद यांचा डेमॉक्रॅटिक लीग हे देशातील इतर महत्त्वाचे राजकीय पक्ष आहेत.

न्यायव्यवस्था : १९७७ च्या घटना दुरुस्तीनुसार सर्वोच्च न्यायसमिती स्थापन करण्यात आली असून तिच्या मार्फत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांसाठी एक आचारसंहिता तयार करण्यात येत आहे. या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्राध्यक्ष कोणत्याही न्यायाधीशास बडतर्फ करू शकतो. देशात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व अपील न्यायालय अशी न्यायव्यवस्था आहे. त्यांखाली इतरही कनिष्ठ न्यायालये अशी न्यायव्यवस्था आहे. त्यांखाली इतरही कनिष्ठ न्यायालये आहेत.

जाधव, रा. ग. नगरकर व. वि.

संरक्षण : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची संरक्षणव्यवस्था कशी असावी याबद्दल मुक्तिवाहिनीच्या सैनिकी नेत्यांत वैचारिक संघर्ष सुरू झाला. ताहेर व झियाउद्दीन यांचे मत पुढीलप्रमाणे होते : इतर विकसित राष्ट्रांप्रमाणे गरीब व अविकसित बांगला देशाने खडे सैन्य ठेवल्यास परदेशी मदतीवर सर्वथा अवलंबून रहावे लागेल. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्रीय धोरण व विकास योजना आखता येणार नाहीत म्हणून पाश्चात्य वळणाची सेना न ठेवता लोकसेनासदृश व राष्ट्रीय उत्पादनाला हातभार लावणारी संरक्षणव्यवस्था असावी. देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांना हे मत मान्य नव्हते. त्यांनी झियाउद्दीन यांस बडतर्फ केले व ताहेर यांस क्रियाशील सैनिकी सेवेतून मुक्त केले. पुढे झियाउद्दीन भूमिगत झाले. ताहेर यांनी ‘जातीय समाजतांत्रिक दल’ (जासद) ही राजकीय संघटना व तिच्या ‘विप्लवी सेना संघ’ (विसेसं) आणि ‘विप्लवी गणवाहिनी’ (विगवा) ही दोन गुप्त गनिमी लढाऊ दले स्थापन केली. या संघटनांच्या कार्यामुळे सैनिक व खेडूत प्रभावित झाले. ताहेर यांनी बारा कलमी सैनिकी कार्यक्रम जाहीर केला होता. हा कार्यक्रम जर कार्यवाहीत आला असता, तर बांगला देशातील विद्यमान संरक्षणव्यवस्था उदयास आली नसती. पुढे झियांनी १२,५०० पोलिसांची एक संघटना स्थापून तिच्याकरवी जासद, विसेसं आणि विगवा या ताहेरांच्या संघटनांचा बामोड केला. ताहेर व इतर  पुढाऱ्‍यांना पकडून त्यांच्यावर गुप्तपणे खटले चालविले व त्यांना २१ जुलै १९७६ रोजी फाशी देण्यात आले. देशाच्या मुक्तिसंग्रामात न लढलेल्या व त्या काळात पश्चिम पाकिस्तानात वास्तव्य केलेल्या बांगला देशीय अधिकाऱ्यांना परत बोलावून, झियांनी त्यांना सैन्यात सामावून घेतले व पाश्चात्य धाटणीची संरक्षणव्यवस्था उभी केली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानची जी काही रणसामग्री देशात उरली होती,  तीमधून भू, नौ व वायुसेना दले उभी करण्यात आली. भारत, ग्रेट ब्रिटन, यूगोस्लाव्हिया, रशिया व काही अरब राष्ट्रे यांच्याकडून काही रणसामग्री मिळविण्यात आली.

बांगला देशाची १९७८ अखेर संरक्षण व्यवस्था पुढीलप्रमाणे होती :

भूसेना : पायदळ ब्रिगेड ५ (१७ पलटणी) रणगाडा रेजिमेंट १ तोफखाना रेजिमेंट ३ एकूण सैनिकसंख्या ६५,००० लोकसेना सैनिक २०,०००.


नौसेना : फ्रिगेट २ गस्ती नौका ४ तोफनौका (नदी)५ शिक्षण नौका १ नौसिनिकांची संख्या ३,५००.

नाविक तळ व गोद्या : डाक्का, चितगाँग व खुलना.

वायुसेना : मिग–१९ स्क्वॉड्रन ३मिग–२१ विमाने ३ हेलिकॉप्टर १६ जेट शिक्षण विमाने ८ यांशिवाय काही हलकी विमानेही आहेत. वायुसैनिक संख्या ५,०००.

बांगला देशाने १९७८ पर्यंत संरक्षणाच्या दृष्टीने इतर देशांशी मैत्रीचे तह किंवा करार केले नाहीत तथापि १९७७ च्या राज्यघटनेप्रमाणे इतर मुस्लिम राष्ट्रांशी घनिष्ठ संबंध ठेवण्याची तरतूद आहे. देशात संरक्षण सामग्रीचे उत्पादन करणारे कारखाने नाहीत.

दीक्षित, हे. वि.

आर्थिक स्थिती : या नवजात देशाला पहिल्यापासूनच प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून वाट काढावी लागली. स्वातंत्र्ययुद्धामुळे स्वाभाविकपणेच देशातील अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. नव्या राज्यकर्त्यांना शासकीय-आर्थिक प्रशासनाचा अनुभवही कमी होता. १९७० चे दशक हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही कठीण होते आणि याच दशकात या स्वतंत्र देशाची सर्वांगीण उभारणी करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर होती. अगदी प्रारंभी संयुक्त राष्ट्रे, भारतासारखे मित्र देश, अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. तथापि अवर्षणे, पूर चक्री वादळे इत्यादींमुळे अन्नधान्याच्या बाबतीत आयातीवर खर्च करणे भाग होते. नव्या राजवटीत प्रारंभीच तागाच्या गिरण्या, कापड गिरण्या व तत्सम इतर मोठ्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले पण ते यशस्वी करण्यास आवश्यक ती कार्यक्षम यंत्रणा उपलब्ध नव्हती. पाकिस्तानधार्जिण्या मानल्या गेलेल्या बिहारी मुस्लिमांची औद्योगिक कौशल्ये व अनुभव नव्या राजवटीत डावलण्यात आले. त्याचाही विपरीत परिणाम उद्योगधंद्यांवर झाला, असे म्हटले जाते. शेख मुजीब यांनी देशातील उत्तम अर्थशास्त्रज्ञांना नियोजन आयोगावर नेमले. आयोगाने तयार केलेली पहिली पंचवार्षिक योजना १९७२-७३ मध्ये अंमलात आली तिचा भर अन्नधान्य उत्पादन व ग्रामीण विकास यांवर होता. ही योजना नंतरच्या राजकीय उलथापालथीत बारगळली. शेख मुजीब यांनी शेवटी ‘टका’ या राष्ट्रीय चलनाचे अवमूल्यन केले व नाणेवाढ थोपविण्याचा प्रयत्‍न केला. त्यानंतरच्या काळात आर्थिक विकासाची गती मंदच होती. जनरल झियांच्या कारकीर्दीत अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे, जलसिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे व लोकसंख्येचे नियंत्रण करणे यांवर भर देण्यात आला. परकीय मदत व गुंतवणूक वाढविण्यासाठीही त्यांनी प्रयत्‍न केले. जनरल झिया यांच्या ३० मे १९८१ च्या वधानंतर देशातील आर्थिक धोरणात फारसे बदल झालेले नाहीत.

कृषी : बांगला देशाची अर्थव्यवस्था १९७१ मध्ये झालेल्या स्वातंत्र्य युद्धामुळे खूपच खालावली होती. १९७३ मध्ये पहिली पंचवार्षिक योजना तयार होऊन आर्थिक विकासाचे धोरण निश्चित करण्यात आले परंतु राजकीय सत्तांतरे, परिणामतः देशात निर्माण झालेले राजकीय अस्थैर्य यांमुळे आर्थिक प्रगतीची गती मंद राहिली. देशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीप्रधान आहे. देशातील बहुतेक जमीन गाळाची व सुपीक आहे. तथापि नद्यांना वारंवार येणारे पूर, चक्री वादळे व अवर्षणे इत्यादींमुळे कृषी-उत्पादनाच्या विकासात अडथळे येतात. देशातील एकूण १४.३ द.ल. हे. जमिनीपैकी ९.१ द. ल. हे. जमीन लागवडीखाली होती (१९७८–७९). शेतीत देशातील एकूण ६० टक्के उत्पन्न शेतीपासूनच मिळते. येथे वर्षातून तीन पिके घेतली जातात. गाळाची जमीन, मुबलक पाणी व स्वस्त मजूरपुरवठा यांमुळे शेती किफायतयशीर बनली आहे. भात हे देशातील मुख्य पीक असून एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. ८०% जमिनीत हे पीक घेतले जाते. स्वातंत्र्यानंतर १९७४ पर्यंत भाताच्या उत्पादनात खूपच घट झालेली होती परंतु त्यांनंतर उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन १९७७–७८ मध्ये १३.३ द.ल. टन तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले. गव्हाचे पीकही घेण्याचे सुरुवात करण्यात आली आहे. हे पीक भातापेक्षा कमी खर्चाचे असल्याने त्यास शासनातर्फे उत्तेजन देण्यात येते. १९८०–८१ या सालात गव्हाचे उत्पादन ४ द.ल. टनांपर्यंत वाढविण्याचे शासकीय लक्ष्य आहे. लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्याने अद्यापही दुसऱ्या देशातून थोड्याफार प्रमाणात अन्नधान्य आयात करावे लागते. या दोन पिकांशिवाय कडधान्ये, बटाटे, तंबाखू (६४,००० मे. टन–१९७७), ऊस, तेलबिया व फळे यांचेही उत्पन्न थोड्याफार प्रमाणात घेतले जाते.

परकीय चलन मिळवून देणारे ताग हे नगदी पीक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगातील एकूण ताग उत्पादनाच्या सु. ५०% उत्पादन या देशात होते. या पिकाची लागवड देशात एकूण १.०१ द. ल. (९%) हेक्टरांत केली जाते. निम्मे उत्पादन निर्यात केले जाते व उरलेले तागावर देशातच प्रक्रिया करून त्यापासून अनेक वस्तू बनवून त्यांची निर्यात केली जाते. १९७१ नंतर काही काळ तागाच्या उत्पन्नात बरीच घट झाली. या सत्तराच्या दशकाच्या अखेरीस नवीन बी-बियाणे व खतांचा वापर करून ते वाढविण्यात आले. स्वातंत्र्य-युद्धकाळात तागाची निर्यात करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आयाती देशांनी तागाऐवजी कृत्रिम धाग्याचा वापर सुरू केला होता. त्यामुळे तागाची आंतरराष्ट्रीय मागणी घटली, परंतु १९७९-८० मध्ये खनिज तेलाची दरवाढ झाल्याने कृत्रिम धाग्यांचे उत्पादन घटू लागले व तेव्हापासून तागाची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. तागाच्या खालोखाल परकीय चलन चहाच्या निर्यातीपासून मिळते. कापड व सिगारेट हे त्यानंतरचे महत्त्वाचे उद्योग. साखरेचेही उत्पादन देशात थोड्याफार प्रमाणात घेतले जाते.


मत्स्योद्योग हा विकसित होऊ शकणारा देशातील महत्त्वाचा उद्योग आहे. बंगालचा उपसागर व नद्या यांमध्ये अमुक्रमे ९०,००० टन व ७,३६,००० टन मत्स्योत्पादन केले गेले (१९७६-७७). सागरी भागात पापलेट व अंतर्गत भागात पाला हे माशांचे प्रकार जास्त आढळतात. या उद्योगांशिवाय देशात आगपेट्या, काचेच्या वस्तू, होजिअरी, कागद, ॲल्युमिनियम इत्यादींचे कारखाने विकसित झालेले आहेत. चितगाँग येथे पोलाद कारखाना आहे. शिवाय वृत्तपत्रीय कागद, रासायनिक खते, जहाजबांधणी इ. उद्योगही या शहरात आहेत. १९७६-७७ ची उत्पादने पुढीलप्रमाणे : (आकडे टनांत) तागाचे गोणपाट ४,८९,००० पोलाद १,९३,००० खते ३,३८,०००, साखर १,३९,००० विणलेले सुती कापड ६,२१,७९,२०० मीटर. उद्योगधंद्यांत ६०% कामगारवर्ग असून एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उद्योगधंद्यांचा वाटा १०% आहे. देशात १९७४-७५ मध्ये १० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या १,४१७ लहानमोठ्या औद्योगिक कंपन्या होत्या. त्यांत २,९३,००० कामगार काम करीत होते.

अर्थकारण व व्यापार: देशाचे १९७६ पासून ‘टका’ हे अधिकृत चलन आहे. १ टका म्हणजे १०० पैसे असून १, २, ५, १०, २५, ५० पैशांची नाणी व १, ५, १०, ५०, १०० टकांच्या नोटा वापरात आहेत. विदेशविनिमय दर १ स्टर्लिंग पौंड=३४.७ टका आणि १ अमेरिकी डॉलर=१५.४ टका असा होता (मार्च १९८०).

देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. देशात २,७५६ बँकशाखा असून त्यांपैकी ग्रामीण भागात १,५९४ आहेत (१९७८). ‘बांगला देश बँक’ ही मुख्य बँक असून देशात परदेशी बँकाही आहेत. बँक ऑफ बरोडा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भारतीय बँकाच्या शाखा या देशात आहेत.

देशातून ताग, कातडी, चहा इत्यादींची निर्यात होते. निर्यातीपैकी ७१% भाग ताग व ताग उत्पादने यांचा असतो. १९७८-७९ मध्ये ८,२५,१०,००,००० टकांची निर्यात झाली. याच वर्षीची आयात २३,३३,७०,००,००० टका असून त्यात यंत्रसामग्री, वाहतूक-साधने, अन्नधान्य, खनिज इंधन, रसायने, औषधे व इतर उपभोग्य वस्तूंचा समावेश होतो.

वाहतूक व संदेशवहन : देशात ६,२७६.४ किमी. लांबीच्या सडका असून त्यांपैकी ३,८६२.४ किमी. पक्क्या सडका आहेत. त्यांशिवाय २,८१६ किमी. रेल्वे मार्गही आहेत. नद्यांच्या प्रवाहांतून मोठ्या प्रमाणात जलवाहतूक चालते. देशात एकूण पाच महत्त्वाची नदी-बंदरेही आहेत. सागरी बंदरात छलना, चितगाँग महत्त्वाची असून मांगला या नव्या बंदराचाही विकास होत आहे. ‘बांगला देश विमान’ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत हवाई वाहतूक चालते. डाक्का व चितगाँग येथे आँतरराष्ट्रीय विमानतळ असून कुर्मितोला येथे १९७९ च्या अखेरीपासून विमानतळ सुरू करण्यात आला आहे.

यांशिवाय देशात खाजगी मोटारी (१५,६०६), बसेस व तत्सम वाहाने (७,७५२), ट्रक (१०,०५८), ऑटोरिक्षा (८,२८२) व मोटारसायकली (२८, ७५६) यांचाही दळणवळणात मोठा वाटा आहे. देशात ८९,२११ दूरध्वनी होते (१९७८). डाक्का आणि इस्लामाबाद यांच्यातील दूरध्वनी यंत्रणा ऑक्टोबर १९७६ पासून कार्यान्वित झाली. आंतरराष्ट्रीय संदेशवहन उपग्रहाद्वारे चालते.

देशात वृत्तपत्रसंस्था असून ३३ दैनिके, ११२ साप्ताहिके, १४ पाक्षिके, ११६ मासिके व ८० त्रैमासिके प्रसिद्ध होत होती (१९७९). बहुतेक महत्त्वाची वृत्तपत्रे डाक्क्यामध्येच प्रसिद्ध होतात. सरकारतर्फेही एक वृत्तपत्र चालविले जाते.

देशात दूरचित्रवाणीची १९७२ पासून सोय असून ती स्वतंत्र निगमामार्फत नियंत्रित केली जाते. डाक्का हे याचे मुख्य केंद्र असून कोमिल्ला, टनगेल, मैमनसिंग आणि फरीदपूर ही इतर दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. तसेच देशात नभोवाणी केंद्रेही असून ती शासननियंत्रित आहेत. ती डाक्का, राजशाही, चितगाँग, खुलना, सिल्हेट आणि रंगपूर येथे आहेत.

लोक व समाजजीवन : इस्लाम हा देशाचा अधिकृत धर्म होय. देशातील सु. ८०% लोक मुस्लिम असून त्यांपैकी बहुसंख्य सुन्नी पंथाचे आहेत. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक पीराचे भक्त आहेत. १८% लोक हिंदू असून त्यांपैकी बहुतेक कनिष्ठ जातींतील आहेत.  एकत्रित कुटुंबपद्धती अजूनही टिकून आहे. वडील आणि त्यांच्या नंतर वडीलमुलगा यांवर कुटुंबाची जबाबदारी असते. तथापि वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यांमुळे कुटुंबव्यवस्थेचे विघटन होऊ लागले आहे. भात आणि मासे हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे.  लोकसंख्येची घनता जास्त असून १ चौ. किमी. मध्ये २९० ते ७७० लोक राहतात. बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात. केवळ १०% लोक शहरात राहणारे असून डाक्का व चितगाँग येथे दाट लोकवस्ती आहे. जननमान व मृत्युमान हे अनुक्रमे दर हजारी ४४ व १९ होते (१९७८).


बांगला देशातील स्त्रिया या मुख्यतः घरकामातच गुंतलेल्या आहेत. ग्रामीण भागात पडदापद्धती रूढ आहे. स्त्रिया घरात वावरताना पडद्यामागे असतात व घराबाहेर पडल्यावर बुरखा वापरतात. शहरी भागातील स्त्रिया मात्र अधिक स्वतंत्रपणे वावरतात. शैक्षणिक संस्थातून विद्यार्थ्यांनींची संख्या वाढती असून स्त्रियांच्या समान हक्कांची जाणीवही निर्माण होत आहे. १९७२ साली स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी एक राष्ट्रीय मंडळही स्थापन करण्यात आले. या संस्थेचे मूळचे उद्दिष्ट पाकिस्तानी सैनिकांनी बलात्कार केलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन करणे हे होते. स्त्रियांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे कार्य आता ही संस्था करते.

बांगला देशातील सुशिक्षित तरूणवर्ग चांगल्या प्रकारे संघटित असून राजकीय दृष्ट्याही जागृत आहे. देशातील तरुण विद्यार्थिवर्ग राजकीय पक्षांच्या संघटनातूनही कार्य करीत असतो. देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात विद्यार्थीवर्गाने मोठी कामगिरी पार पाडली व म्हणून समाजात त्यांच्याविषयी आदर दिसून येतो. तथापि सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर विद्यार्थीवर्गात विविध मतांचे विविध गट आहेत.

समाजकल्याण व आरोग्य : हिवताप, देवी यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रतिबंध, सार्वत्रिक अपपोषण आणि युद्धोत्तर काळातील शेकडो लोकांचे पुनर्वसन या देशापुढील महत्त्वाच्या समस्या आहेत. देशातील वैद्यकीय तज्ञांचा निम्मा वर्ग डाक्क्यामध्येच एकवटलेला आहे. १९७३ पासूनच एक पंचवार्षिक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम अंमलात आलेला आहे व त्याचा भर संततिनियमनावर आहे.

देशात मनोरुग्‍णालय, दोन क्षयरोग-रुग्‍णालये, आठ वैद्यकीय महाविद्यालये असून परिचर्या प्रशिक्षण केंद्रेही आहेत. त्यांतून प्रतिवर्षी १,२०० परिचारिका प्रशिक्षण घेतात. देशातील रुग्‍णालयांतून एकूण १४,००० खाटांची सोय होती (१९७७).

स्वातंत्र्यपूर्ण काळातील सामाजिक सेवा करणाऱ्या बहुतेक संस्था ह्या खाजगी क्षेत्रात होत्या. तथापि नागरी विकास प्रकल्प, अपंगांच्या शाळा, युवक केंद्रे, अनाथाश्रम, समाजसेवकांच्या प्रशिक्षण संस्था इ. सरकारमार्फतच चालविण्यात येत. तीच व्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळात चालू राहिली. खाजगी संस्थांची मदत अनेक राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी घेण्यात आली. चक्रीवादळे, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती देशात वेळोवेळी उद्‍भवतात. त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाची मदतकार्ये हाती घेण्यात हाती घेण्यात येतात.

शिक्षण : १९७२ साली शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली व शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची कामगिरी त्यावर सोपविली. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यांच्यात सुधारणा करण्यासाठी एक राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली असून तिच्यातर्फे बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची पाहणी केली जात आहे. पहिल्या पाच वर्गांतील प्राथमिक शिक्षण मोफत आहे. अर्थात ते आवश्यक मात्र केलेले नाही. तथापि या संदर्भात काही मार्गदर्शक योजना तयार करण्याचे काम चालू आहे. खाजगी स्वरूपाच्या माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये या प्रकारच्या शासकीय संस्थांपेक्षा संख्येने अधिक आहेत. देशात एकूण सहा विद्यापीठे असून त्यातील एक कृषी व एक अभियांत्रिकी विद्यापीठ आहे. शैक्षणिक सुधारणेच्या कार्यक्रमात प्राथमिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जात आहे. देशातील सु. २३% लोक साक्षर असून त्यांत स्त्रियांची संख्या अत्यंत कमी आहे. देशात प्राथमिक शाळांची संख्या ३९,९१४ व त्यांतील विद्यार्थिसंख्या ८५,३१,००० होती. सक्तीची प्राथमिक शिक्षण योजना बदलून त्याऐवजी आदर्श (मॉडेल) प्राथमिक शिक्षण योजना अंमलात आणलेली आहे. जिल्हा शिक्षण मंडळे बरखास्त करून शाळांचे प्रशासन शासनाने आपल्या हाती घेतले आहे (१९७७-७८). माध्यमिक शाळा ८,३२७ व त्यांतील विद्यार्थीसंख्या १९,४३,००० होती. तांत्रिक महाविद्यालयांची संख्या ५८८ आणि विद्यार्थिसंख्या ३,९३,००० होती. देशीतील सहा विद्यापीठांतून ३२,००० विद्यार्थी शिकत होते. तसेच सहा शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये, ४८ प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण संस्था, २२ तंत्रनिकेतने व ३५ धंदे शिक्षणाच्या संस्था होत्या (१९७७).

देशांत विद्यापीठांखेरीज इतरही महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. त्यांत अणुउर्जा आयोग, शास्त्रीय व औद्योगिक संशोधन समिती यांसारख्या संशोधन संस्था उल्लेखनीय आहेत.

जाधव, रा.ग. चौंडे, भा. ल.

भाषा व साहित्य : इंडो-आर्यन भाषासमूहातील बंगाली भाषा देशाची राज्यभाषा असून ती देशातील अल्पसंख्य हिंदूप्रमाणेच बहुसंख्य मुसलमानांचीही मातृभाषा आहे. ही भाषा संस्कृत, प्राकृत व पाली ह्या भाषांपासून विकसित झाली असून अरबी, फार्सी व इंग्रजीच्या प्रभावाने ती समृद्ध झाली आहे. येथील बंगाली भाषिकांची संख्या ४,३०,००,००० (१९७८) आहे. [⟶ बंगाली भाषा].


बांगला देशाच्या बंगाली साहित्यास फाळणीपूर्व बंगाली साहित्याची प्रदीर्घ व समृद्ध अशी परंपरा असून नोबेल पुरस्कार विजेत्या ⇨ रवींद्रनाथ टागोरांचा वारसाही लागला आहे. रामायणकर्ते ⇨ कृत्तिवास, ⇨ शरत्चंद्र चतर्जी, ⇨ बंकिमचंद्र चतर्जी, ⇨ काजी नजरुल इस्लाम यांसारखे श्रेष्ठ कादंबरीकार व कवी देशाच्या वाङ्मयीन परंपरेत मोडतात. काजी नजरुल इस्लाम हे विद्रोही कवी. त्यांनी बंगाली भाषिकांत आपल्या ओजस्वी क्रांतीकारी काव्याने स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. आधुनिक काळातील जशीमुद्दीन अबुल फजल हे अतिशय लोकप्रिय कवी असून त्यांनी बांगालातील ग्रामीण जीवनाचे चित्रण करणारी लोकगीते व वीरगीते लिहिली. १९४७ नंतर पूर्व बंगालमधील कथा-कादंबरीकारांचा एक तरूण गट उदयास आला. त्यांच्या निर्मितीवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव असून तो त्यांच्या ऐतिहासिक आणि इतर प्रकारच्या कादंबऱ्‍यातून जाणवतो. सय्यद वलिउल्ला, शौकत उस्मान, अब्दुल गफ्फार चौधरी, अलाउद्दीन अल्-अझाद इ. लेखकांनी वर्गविग्रहाचे व तदानुषंगिक मानवी जीवनातील संघर्षाचे आपल्या लेखनातून उत्कृष्ट चित्रण केले. मुनीर चौधरी यांनी उत्कृष्ट नाटके लिहिली, तर मुहंमद शहीदुल्ला, मुफझ्झल हैदर चौधरी, इनामुल् हक्, शिराजल् इस्लाम चौधरी आणि बद्रुद्दीन उमर यांनी गद्य साहित्यात मोलाची भर घातली. १९४७ नंतरच्या काळात पाकिस्तानी दडपशाहीविरुद्ध व शोषणाविरुद्ध बांगला कवि-लेखकांनी आपल्या साहित्यातून आवाज उठविला. या दृष्टीने तरुण कवी शमशुर्रहमान यांची कविता विशेष लक्षणीय आहे. जहाज आरा आरजू, झेबुन्निसा जमाल आणि सूफिया कमाल या कवयित्रींचाही या संदर्भात आवर्जून उल्लेख करायला हवा. पाकिस्तानी राजवटीत लादल्या जाणाऱ्या  उर्दू भाषेविरूद्ध निकराचा लढा देऊन बंगालच्या थोर वाङ्मयीन परंपरेचे तरुण लेखकांनी हिरीरीने जतन केले. [⟶ बंगाली साहित्य].

सुर्वे, भा. ग.

कला व क्रीडा : देशातील कलाक्रीडांची परंपरा ही व्यापक अशा बंगाली परंपरेची निदर्शक आहे, असे म्हणता येईल. संगीताच्या क्षेत्रात अभिजात सुगम भक्तीपर आणि लोकसंगीत इत्यादींत बांगला परंपरेचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. देशात ख्याल, ठुमरी, टप्पा, कव्वाली व कीर्तन हे सर्वच प्रकार लोकप्रिय आहेत. ‘रवींद्रसंगीत’ हेही देशात लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे ‘नज्रूल गीती’ हाही आधुनिक संगीतप्रकार लोकप्रिय आहे. कथकळी आणि भरतनाट्यम् यांच्या परंपराही टिकून असल्या, तरी लोकपरंपरेतील काही नृत्यप्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उदा., ढाली, बाउल, मणिपुरी आणि सर्पनृत्ये इत्यादी. बांगला चित्रकलाही विकसित होत आहे. झैनल अलीदिन हा चित्रकार प्रसिद्ध असून १९४३ च्या बंगालमधील दुष्कळाची त्याने काढलेली रेखाचित्रे उल्लेखनीय आहेत. या चित्रकाराने प्रयोगशील कलावंताचा एक गटच निर्माण केला आहे.

क्रीडेच्या क्षेत्रात कबड्डी, फुटबॉल, हॉकी, टेनिस, नेमबाजी, जलतरण इ. खेळ विशेष लोकप्रिय आहेत. देशात सु. १५० चित्रपटगृहे असून चित्रपट विकास निगम हा चित्रपटनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करतो. देशात प्रतिवर्षी सु. २० चित्रपट तयार होतात.

डाक्का येथील वस्तुसंग्रहालय आणि ग्रंथालय प्रसिद्ध आहे. राजशाही वरेंद्र संग्रहालय व डाक्का बाल्डा संग्रहालय ही खाजगी संग्रहालयेही प्रसिद्ध असून त्यांच्यावर शासनामार्फत देखरेख ठेवली जाते.

पर्यटन: डाक्का व चितगाँग ही शहरे पर्यटकांची आकर्षणे आहेत. ‘कॉक्स बाझार’ ही जगातील सर्वांत मोठी पुळण (१२० किमी. लांब) आणि दक्षिणेकडील टेकनाफ हीदेखील पर्यटन केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यटकांत भारत, जपान, ग्रेट ब्रिटन आणि प. जर्मनी या देशांतील लोक अधिक असतात. देशात स्वतंत्र पर्यटन आयोग असून महत्त्वाच्या शहरी त्याच्या शाखा आहेत.

जाधव, रा. ग. चौंडे, मा. ल.

 संदर्भ :

    1. Bhargava, G. S. Pakistan in Crisis, 1971.  

    2. Chaudhury, G. W. The Last Days of United Pakistan, 1975.

    3. Chen, L. C. Ed. Disaster in Bangladesh: Health Crisis in a Developing Nation, London, 1973.

    4. Chowdhury, R. The Genesis of Bangladesh, London, 1972.

    5. Jehan, Raunaq. Pakistan: Failure in National Integration, 1974.

    6. Kashyap, S. C. Ed. Bangla Desh: Background and Perspectives, New Delhi, 1971.

    7. Khan. A. R. The Economy of Bangladesh, London, 1972.

    8. Lifeschultz, Lawrence, Bangla Desh: The Unfinished Revolution, London, 1980.

    9. Oliver, T. W. The United Nations in Bangladesh, Princeton (N. J.). 1978.

  10. Patil, D. K. The Lightning Campaign, New Delhi, 1972.

  11. Rahman, M. Bangladesh Today: An Indictment and a Lament, London, 1978.

  12. Robinson, E. A. G. Griffin, K. Ed. The Economic Development of Bangladesh, London, 1974.


बांगला देश

बंगाली भाषा आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मारक, डाक्का

ताग वाहतूक, डाक्का लालबाग किल्ला, डाक्का