बॅरी, जेम्स मॅथ्यू : (९ मे १८६०–१९ जून १९३७). ब्रिटिश नाटककार. जन्म स्कॉटलंडमधील कीरीम्यूर, फॉरफरशर येथे. आरंभीचे शिक्षण कीरीम्यूर, फॉरफरशर तसेच डंफ्रीस ॲकॅडमी येथे. १८८२ मध्ये एडिंबरो विद्यापीठातून इंग्रजी हा विषय घेऊन पदवीधर. काही काळ नॉटिगॅम जर्नल ह्या नियतकालिकात काम केल्यानंतर १८८५ मध्ये तो लंडनला आला. तेथे कथा, कादंबऱ्या आणि नाटके लिहिली लहान मुलांसाठीही लेखन केले. तथापि आज त्याची कीर्ती मुख्यतः त्याच्या नाट्यकृतींवर अधिष्ठित आहे. सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी नाटके ब्रिटिश रंगभूमीवर जोरात चालू असतानाच अद्भुताचा रम्यसुखद प्रवाह बॅरीने तेथे आणला. द ॲड्मिरेबल क्रिच्टन (१९०३), पीटर पॅन (१९०४), व्हॉट एव्ह्री वूमन भोज (१९०८). डीअर ब्रूट्स (१९१७) व मेरी रोझ (१९२०) ही बॅरीची काही विशेष उल्लेखनीय नाटके. ह्या नाट्यकृतींपैकी पहिली दोन रंगभूमीवर फारच लोकप्रिय झाली. सूक्ष्म, तरल उपरोध आणि वास्तवाची जाणीव न सोडता अद्भुताकडे जाण्याचे बॅरीचे सामर्थ्य ह्या दोन नाटकांतून प्रकर्षाने प्रत्ययास येते. सदैव शैशवावस्थेतच राहणाऱ्या ‘पीटर पॅन’ची बॅरीने निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण आणि विलोभनीय व्यक्तिरेखा अमर झालेली आहे. व्हॉट एव्हरी वूमन नोज ह्या नाटकाचे अनंत काणेकर ह्यांनी केलेले पतंगाची दोरी (प्रयोग १९५१) हे मराठी रूपांतर प्रसिद्ध आहे. पुरुषाच्या कर्तृत्वाचा खरा आधार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्याची प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष पत्नी हाच असतो. हे ह्या नाटकात दाखविले आहे.
बॅरीने मानवी जीवनाकडे आणि व्यवहारांकडे बालकाच्या निरागस आणि आनंदी वृत्तीने पाहिले. जगातील दुःखांची त्याला जाणीव होती. तथापि माणसांना दुःखाचा अनुभव येऊच नये, असे त्याला वाटत असे. बॅरीच्या नाटयकृतींतही अशाच प्रकारचे विचार, हुरहूर आणि स्वप्नरंजन आढळते.
ऑल्ड लिख्ट आय्डिल्स (१८८८–कथासंग्रह) आणि द लिटल मिनिस्टर (१८९१–कादंबरी) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृती. ओल्ड लिख्ट आयडिल्समधून कीरीम्यूरमधील जीवनाची भावपूर्ण चित्रे त्याने रेखाटली आहेत. स्कॉटिश जीवनासंबंधी भावुकपणे लिहिणाऱ्या लेखकांना ‘केलयार्ड’ संप्रदायातील लेखक म्हणून टीकाकार उपरोधाने संबोधित असत. बॅरी हा त्यांचा नेता मानला गेला होता. द लिटल मिनिस्टर ही कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ :1. Asquith Cynthia, Portrait of Barrie, London, 1954.
2.Darlington, William A. J. M.Barrie, London, 1938.
3. Green. Roger L. J.M. Barrie, New York, 1961.
4. Mackail, Dennis G. Barrie, The Story of J. M. B.,New York, 1941.
बापट, गं. वि.