मॉस्को : मस्कव्हा. सोव्हिएट रशिया आणि रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट प्रजासत्ताक यांची राजधानी. लोकसंख्या ८५·४६ लक्ष (१९८४ अंदाज). क्षेत्रफळ ८७९ चौ. किमी. ओक व व्होल्गा नद्यांच्या मस्कव्हा या उपनदीच्या दोन्ही तीरांवर मॉस्को वसलेले आहे. हा प्रदेश मध्यवर्ती औद्योगिक प्रदेश म्हणून तसेच देशातील सर्वांत प्रगत व सर्वाधिक लोकसंख्या-घनता असलेल्या भागांतील एक म्हणून गणला जातो.
रशियन बखरींमधून मॉस्कोचा लिखित स्वरूपातील उल्लेख ११४७ च्या सुमारास आढळतो. मॉस्को येथील नवाश्मयुगीन वसतीचे पुरावे मिळाले असले, तरी साधारणतः बाराव्या शतकापासून या नगराचा सलग इतिहास मिळतो. मस्कव्हा नदीच्या उत्तरेकडील टेकडीवर ११५६ मध्ये व्हॅ्लदिमिर-सूझडल प्रदेशाचा राजपुत्र यूऱ्यई डल्गरूकई याने मातीची तटबंदी करून लाकडी मेढेकोट बांधले. हेच ‘क्रेमलिन’ अथवा बालेकिल्ला होय. १३३९–४०, १३६७–६८ व १४८५–९५ ह्या उत्तरकाळात त्याची अनेकदा डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली. मंगोल-तातार नियंत्रणाखाली असतानाच्या काळात (१२३७–१४८०) मॉस्कोच्या परिसरातील समृद्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, नदीमार्ग व रस्ते यांची उपलब्धता व मध्यवर्ती स्थान यांमुळे मॉस्कोला प्रथमपासूनच महत्त्व लाभले. मध्ययुगीन काळात ते ‘तिसरे रोम’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले. तेरावे ते पंधरावे शतक यांदरम्यान मॉस्कोच्या राज्यकर्त्यांना मंगोल-तातार टोळ्यांच्या आक्रमणांना वरचेवर तोंड द्यावे लागले. तिसरा इव्हॅन द ग्रेट याच्या कारकीर्दीत (१४६२–१५०५) क्रेमलिनचा विस्तार होऊन अनेक चर्चवास्तू, राजप्रासाद तसेच श्वेत घंटामनोरा यांसारख्या प्रसिद्ध वास्तू उभारण्यात आल्या. सोळाव्या शतकात चौथ्या इव्हॅन द टेरिबलला (१५३०–८४) क्रिमियन तातारांच्या आक्रमणाला तोंड द्यावे लागले. याच शतकात मॉस्कोतील उद्योगधंदे व व्यवसाय वाढीस लागले. क्रेमलिन हे राज्यशासन आणि धर्मशासन यांचे याच काळात केंद्र बनले होते. निर्यात व्यापारही-विशेषतः फरचा-विकसित झाला होता. सतराव्या शतकात बंडाळ्या, दंगेधोपे आणि आगीसारख्या नैसर्गिक आपत्ती यांमुळे मॉस्को पुन्हा आपत्तीत सापडले. पीटर द ग्रेटने शांतता स्थापन केली. त्यानेच मॉस्कोहून सेंट पीटर्झबर्ग या नव्या उभारलेल्या शहरात आपली राजधानी हलविली (१७१२) तथापि मॉस्कोमध्ये त्याने उद्योगधंद्यांच्या व कारखानदारीच्या विकासास चालना दिली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मॉस्को विद्यापीठ (१७५५), पॅशकॉव्ह हाउस यांसारख्या अनेक नव्या वास्तू उभारण्यात आल्या. १८१२ मध्ये नेपोलियनच्या आक्रमणाला या शहराने यशस्वीपणे परतवून लावले. त्यानंतर शहराची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना करण्यात आली व तीसाठी एक स्वतंत्र आयोग नेमण्यात आला (१८१३). यावेळी क्रेमलिन राजप्रासाद, शस्त्रागार राजवाडा (आर्मरी पॅलेस), विद्यापीठ, बोलशॉई रंगमंदिर इत्यादींची पुनर्रचना करण्यात आली. १८३७ मध्ये मॉस्को शेअरबाजार व १८५१ मध्ये सेंट पीटर्झबर्ग-मॉस्को अशी रेल्वेवाहतूक सुरू झाली. १८६१ मधील भूदासविमोचनानंतर कृषकवर्गाचा ग्रामीण भागातून नागरी भागाकडे, विशेषतः मॉस्कोकडे, मोठ्या प्रमाणावर ओघ चालू राहिल्यामुळे १८९७ च्या सुमारास मॉस्कोची लोकसंख्या १९·८ लक्षांवर गेली. १८९० च्या पुढे अवजड यंत्रे, निर्मितिउद्योग, धातुउद्योग इत्यादींचे प्रचंड कारखाने उभारण्यात आले जुने नगरभवन (सांप्रतचे केंद्रीय लेनिन संग्रहालय), राज्य ऐतिहासिक संग्रहालय, राज्य विभागीय भांडार यांसारख्या अनेक शासकीय व खाजगी इमारती उभ्या राहिल्या. याच सुमारास मॉस्कोत होत गेलेली औद्योगिक श्रमजीवींची वाढ, कामगारांचे खालच्या प्रतीचे जीवनमान यांमुळे सर्वत्र असंतोष व संप घडून येत होते अनेक क्रांतिकारी गट कार्यशील होते. १९०५ मध्ये मॉस्कोत घडून आलेली अल्पायुषी बंडखोरी तसेच न्यिकलायेव्ह रेल्वेस्थानक बळकाविण्याचा प्रयत्न हे दोन्ही चिरडून टाकण्यात आले. २५ ऑक्टोबर १९१७ रोजी बोल्शेव्हिकांनी पेट्रग्राड (सांप्रतचे लेनिनग्राड) हस्तगत केले त्यापाठोपाठ मॉस्कोतही रणधुमाळी माजली. झारच्या सैन्याने थोडाबहुत प्रतिकार केला, तथापि १६ नोव्हेंबरच्या सुमारास सोव्हिएट सत्ता मॉस्कोत दृढमूल झाली. रशियन क्रांतीनंतरच्या काळात देशाची राजधानी म्हणून मॉस्कोचा झपाट्याने विकास होत गेला. दुसऱ्या महायुद्धकाळात या शहरावर जर्मनांनी बाँबवृष्टी केली होती. ६ डिसेंबर १९४१ चा जर्मन सैन्याचा निर्वाणीचा हल्ला येथून शौर्याने परतविण्यात आला. पंतप्रधान न्यिक्यित ख्रुश्चॉव्हच्या कारकीर्दीत (१९५८–६४) शहरातील घरबांधणीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला. १९६० मध्ये बृहत मॉस्को क्षेत्र निर्माण करण्यात आले. शहरांना गौरविण्याच्या रशियन परंपरेनुसार दुसऱ्या महायुद्धातील अतुलनीय कामगिरीबद्दल मॉस्कोला ‘वीर नगर’ (हीरो सिटी), ‘ऑर्डर ऑफ लेनिन’, ‘ऑर्डर ऑफ द ऑक्टोबर रेव्हलूशन’ हे किताब देण्यात आले.
शहराचे तीन भाग पाडण्यात आले आहेत : (१) क्रेमलिनपासून सडॉव्हय (किंवा बूलेव्हरांचे उद्यानमय वर्तुळ) पर्यंतचे अंतर्नगर. (२) चक्री लोहमार्गापर्यंतचा मध्य विभाग व (३) चक्री लोहमार्गापासून ११० किमी. लांबीच्या चक्री मोटारमार्गापर्यंत पसरलेला बाह्य विभाग. त्याच्या पलीकडे १,७२५ चौ. किमी. क्षेत्राचा जंगलउद्यान विभाग (ग्रीन बेल्ट) उभारण्यात आला आहे.
अंतर्नगरात क्रेमलिन, किताई गोरोड व सडॉव्हय हे भाग येतात. क्रेमलिन हा रशियाचा सांस्कृतिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाचा भाग असून इतिहास, वास्तुकला व ललित कला यांच्या दृष्टींनी पर्यटकांचे ते मोठे आकर्षण ठरले आहे. क्रेमलिनचे सु. पाच हेक्टरांचे त्रिकोणाकृती बंदिस्त क्षेत्र आहे. यामधील अनेक वास्तू इटालियन वास्तुशिल्पींच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आल्या असल्याने त्यांत इटालियन व रशियन वास्तुशैलींचा सुरेख संगम आढळतो. त्यांतील लाल विटांच्या भिंती व १९ मनोऱ्यांपैकी (१४८५–९५) ‘स्पास्काया’ (सेव्हिअर्स) गेट टॉवर (१४९१) व त्यावरील घंटाबुरूज (१६२४–२५) उल्लेखनीय आहे. यामधील घड्याळाच्या घंटांचा गजर रेडिओद्वारे कालनिदर्शक म्हणून सबंध देशभर प्रक्षेपित करण्यात येतो.
क्रेमलिनच्या अंतर्भागात कॅथीड्रलवास्तू या रशियन वास्तुकलेचे अप्रतिम नमुने मानले जातात. त्यांपैकी ‘ॲसम्प्शन कॅथीड्रल’ (१४७५–७९) हे रशियन झारांच्या राज्यारोहण समारंभांचे अधिष्ठान, सतराव्या शतकातील झारांचे दफनस्थान असलेले ‘आर्केंजल कॅथीड्रल’ (१५०५–०९), नऊ सुवर्ण घटकांचे ‘ॲनन्सिएशन कॅथीड्रल’ (१४८४–८९) हे विवाह समारंभ व नामकरण समारंभ यांचे केंद्र, इव्हॅन द ग्रेट (१५०५–०८) याने बांधलेला ८१ मी. उंचीचा भव्य श्वेत घंटामनोरा, त्याच्या पायाशी असलेली, परंतु कधीही न वाजविलेली २०० मे. टन वजनाची, ६·०९ मी. उंचीची व ६·१४ मी. व्यासाची प्रचंड झार घंटा (१७३३–३५) इ. प्रेक्षणीय आहेत.
कॅथीड्रल चौकाच्या पश्चिमेस विविधकालीन राजप्रासाद आहेत. आकर्षक पद्धतीने नक्षीकाम केलेले स्वागतदालन असणारा ‘पॅलेस ऑफ फॅसिट्स’ (१४८७–९१), ‘नॅटिव्हिटी ऑफ अवर लेडी’ हे चर्च असणारा ‘तेरेम राजाप्रासाद’ (१६३५–३६), ‘ग्रेट क्रेमलिन पॅलेस’ (१८३८–४९) (सांप्रत सुप्रीम सोव्हिएटचे कार्यालय), यालाच शस्त्रागार राजवाडा (१८४४–५२) (सांप्रतचे शस्त्रागार संग्रहालय) जोडण्यात आलेला असून त्यात झारांनी जमविलेल्या शस्त्रास्त्रांचा अतिभव्य संग्रह आहे. शासकीय इमारतींमध्ये रशियन वास्तुशिल्पज्ञ व अभिकल्पक मॅटव्हे कॅझॅकॉव्ह याने बांधलेले पूर्वीचे सीनेट कार्यालय व सांप्रतचे सोव्हिएट रशियाच्या मंत्रिमंडळाचे कार्यालय असून शेजारीच १०६०–६१ मध्ये संगमरवर व काच यांचा वापर करून बांधलेला आधुनिक पद्धतीचा ‘पॅलेस ऑफ काँग्रेसेस’ हा राजप्रासाद आहे. त्यामधील सु. ६,००० आसनांचे प्रचंड प्रेक्षागार कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीसाठी व रंगमंदिरासाठी वापरण्यात येते.
सातशे मी. लांब व एकशेतीस मी. रुंद एढे क्षेत्र असलेला लाल चौक हा (रेड स्क्वेअर-क्रास्नाया फ्लॉशचाड–क्रास्नाया = सुंदर व लाल) भव्य समारंभ, मे दिवस व ऑक्टोबर क्रांतिदिनानिमित्त होणाऱ्या कवायती व संचलने इत्यादींसाठी वापरण्यात येतो. या चौकाच्या एका बाजूला क्रेमलिनची भव्य भिंत, तर त्याच्या विरुद्ध बाजूला इमारतींची रांग आहे. मॉस्कोकडे येणाऱ्या अनेक मार्गांचे लाल चौक हे केंद्र असून मध्ययुगीन काळात हा चौक म्हणजे मॉस्कोची प्रमुख बाजारपेठ होती. लाल चौकाच्या दक्षिणेकडील टोकास भव्य व उत्तुंग अशा दहा घुमटांचे ‘सेंट बॅझिल द ब्लेसिड’ चे कॅथीड्रल आहे. क्रेमलिन भिंतीजवळ लाल व काळ्या दगडांत बांधलेले ‘लेनिन मासोलीअम’ (लेनिन स्मारक १९३०) असून त्याच्या पाठीमागेच प्रसिद्ध सोव्हिएट व्यक्तींची स्मारके आहेत. क्रेमलिनच्या व लाल चौकाच्या ईशान्य बाजूस असलेल्या शहराच्या भागाला ‘किताई गोरोड’-मध्यवर्ती शहर-असे म्हणतात. ‘राज्य विभागीय भांडार’ (१८९०–९३), पहिला रशियन छापखाना (१५६३), अनेक चर्च, रमानव्ह ब्वाये या पहिल्या सिमॉनॉव्ह झारचे घर (१५६५), प्रचंड ‘रशिया हॉटेल’ अशा अनेक प्रसिद्ध वास्तू येथे आढळतात. क्रेमलिनच्या पश्चिम बाजूस ‘अलेक्सांद्राव्हस्की उद्यान’ असून त्यापलीकडे मॉस्को विद्यापीठाची जुनी वास्तू आहे (१७५५). त्याच्या उत्तरेस सोव्हिएट मंत्रिपरिषदवास्तू असून तिच्या उत्तरेस सुविख्यात ‘बोलशॉई (ग्रेट) रंगमंदिर’ (थिएटर) (१८२५) आहे. त्यापलीकडील ‘ड्झिर्झीन्स्की चौका’त ‘कमिटी ऑफ स्टेट सिक्युरिटी’ (केजीबी) या प्रसिद्ध सोव्हिएट गुप्तहेर यंत्रणेचे कार्यालय आहे. या चौकाच्या आग्नेयीस ‘पॉलिटेक्निकल म्यूझीयम’, ‘म्यूझीयम ऑफ द हिस्टरी अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ मॉस्को’ ही संग्रहालये तसेच सोव्हिएट युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रसमितीची वास्तू आहे.
उर्वरित सडॉव्हय वर्तुळातील पश्चिमेकडील भाग म्हणजे पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरला आहे. या भागात ‘राज्य पुश्किन ललित कला संग्रहालय’ (१८१४), ‘मॉस्को संरक्षिका’, ‘मॉस्को कला रंगमंदिर’ (मॉस्को आर्ट थिएटर) इ. सुविख्यात संस्था आहेत. याच भागातून गॉर्की व कालीनिन हे दोन प्रशस्त मार्ग जातात. गॉर्की मार्गावर वा जवळच अनेक हॉटेले, रंगमंदिरे, रेस्टॉरंट, दुकाने आहेत. या भागात लेनिन स्टेट लायब्ररी (१९२७–२९) आहे.
मध्य विभाग सॅडाव्हयपासून चक्राकार लोहमार्गापर्यंत विस्तारलेला आहे. शहराची नऊ प्रमुख अंतिम लोहमार्ग स्थानके या विभागात आहेत. येथे सुप्रसिद्ध व लोकप्रिय ‘गॉर्की सेंट्रल पार्क ऑफ कल्चर’ हे उद्यान आहे. लेनिन हिल्सवरील प्रचंड मॉस्को राज्य विद्यापीठ वास्तुसमूह याच भागात आहे. या विभागातील अठराव्या शतकातील राजाप्रासादमध्ये ‘रशियन ॲकेडमी ऑफ सायन्सेस’ च्या अध्यक्षमंडळाचे कार्यालय आहे. येथील नोव्होडेव्हिची मठ, त्यामधील स्मोलेन्स्क कॅथीड्रल व त्याचा उंच घंटामनोरा (१६९०) प्रेक्षणीय आहे. याच परिसरातील ‘लुझनिकी पार्क’ हे एक प्रचंड क्रीडास्थान असून त्यामध्ये सु. एक लाखांवर प्रेक्षक बसू शकतील असे मध्यवर्ती लेनिन प्रेक्षागार (क्रीडागार) (१९५५–५६) आहे.
बाह्य विभागात चक्राकार लोहमार्ग व चक्राकार राजमार्ग यांमधील शहराचे निम्म्याहून अधिक क्षेत्र आहे. आधुनिक कारखाने व मोठ्या प्रमाणावरील घरबांधणी प्रकल्प या भागात झालेले आहेत. ‘सकॉल्न्यिकी उद्यान’, त्याचप्रमाणे विज्ञान, उद्योग, शेती, वाहतूक, सांस्कृतिक कार्य इत्यादींमध्ये देशाने केलेली प्रगती दर्शविणारे प्रदर्शनही याच भागात आहे. जवळच ऑस्टॅन्किनो येथे ५३३ मी. उंचीचा दूरचित्रवाणी मनोरा असून त्यावर फिरते रेस्टॉरंट आणि निरीक्षणकक्ष आहे. या विभागात शहराची बंदरे येतात.
देशाच्या वाहतूक यंत्रणेतील मध्यवर्ती स्थान, त्यामुळे दूर अंतरांवरून नैसर्गिक कच्चा माल शहरातील विविध उद्योगांकरिता सुलभतेने आणला जाण्याची सुविधा, कुशल कामगारांचा सातत्याने होत राहणारा पुरवठा अशा विविध घटकांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मॉस्कोला मोठे महत्त्व लाभले आहे.
मॉस्कोतील औद्योगिक रचना मुख्यतः कच्च्या मालाचे तंत्रदृष्ट्या अत्यंत प्रगत व मौल्यवान वस्तूंमध्ये रूपांतर करणाऱ्या उद्योगांवर अधिष्ठित आहे. देशाचे कापड व वस्त्रनिर्मितिउद्योगाचे एक प्रमुख केंद्र असूनही, मॉस्कोच्या उद्योगांनी प्रामुख्याने अभियांत्रिकी आणि धातुप्रक्रिया यांवर प्रकर्षाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. इतर महत्त्वाच्या उद्योगांमध्ये रसायने, अन्नप्रक्रिया, बांधकाम सामग्री, लाकूड कापणी आणि लाकडावरील कोरीव काम, कागद लगदा व कागद, छपाई इत्यादींचा समावेश होतो. मोटारगाड्या व ट्रक, तदनुषंगी सुटे भाग, गोलक धारवा (बॉल बेअरिंग), यंत्रे व यंत्रावजारे, सूक्ष्म उपकरणे, घड्याळे, प्लॅटिनम सुया, पंप, संपीडक, दाबमापक, ट्रॅक्टर, विद्युत् व इलेक्ट्रॉनीय उपकरणे व वस्तू, तसेच रेडिओ अभियांत्रिकी व वैमानिकी अभियांत्रिकी उद्योग या निर्मितीउद्योगांची मोठी आघाडी आहे. उच्च दर्जाच्या पोलादांची निर्मिती येथील कारखान्यांतून होते. पादत्राणे व पियानो ही मॉस्कोची विशेष उत्पादने होत.
मालवाहतुकीसाठी मॉस्कोला अनेक महत्त्वाच्या जलद लोहमार्गावर अवलंबून राहावे लागते. त्यांमध्ये ‘लेनिनग्राड’ (१८५१), ‘सॅव्हॉयलोव्हो’ (१९०२), ‘यारोस्लाव्ह्ल’ (१८६२), गॉर्की (१८६१), ‘कझॅन’ (१९१२), ‘याझान’ (१८६२), ‘कुर्स्क’ (१८६६), ‘कीव्ह’ (१८९८), ‘स्मोलेन्स्क’ (१८७०), ‘रिगा’ (१९११) इ. महत्त्वाच्या लोहमार्गांचा अंतर्भाव होतो. यांपैकी लेनिनग्राड, कीव्ह, डॉनबॅस, ट्रान्स सायबीरियन या लोहमार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.
मॉस्को मेट्रो (भुयारी रेल्वे) ही अतिशय कार्यक्षम वाहतूक यंत्रणा असून १९३५ पासून ती कार्यान्वित झाली. शंभरांवर स्थानके असलेला व सु. १६० किमी. लांबीचा हा लोहमार्ग असून या भुयारी रेल्वेद्वारा प्रतिदिनी सु. ६० लक्ष प्रवाशांची वाहतूक केली जाते. कमालीची स्वच्छता व भव्यता यांसाठी मेट्रो स्थानके प्रसिद्ध आहेत.
मॉस्को हे महत्त्वाचे नदीबंदर आहे. मॉस्को कालव्यातून (१९३२–३७) सागरगामी जहाजांची वाहतूक चालते. हवाई मार्गांचे मॉस्को हे केंद्र आहे. चार विमानतळांमुळे मॉस्को हे देशाचे महत्त्वाचे हवाई वाहतूक केंद्र बनले आहे.
गद्रे, वि. रा.
“