मॉरिस, विल्यम: (२४ मार्च १८३४–३ ऑक्टोबर १८९६). इंग्रज कारागीर, कवी आणि इंग्लंडमधील आरंभीच्या समाजवाद्यांपैकी एक. लंडनजवळील वॉल्थॅमस्टो येथे जन्मला. ऑक्सफर्डच्या एक्झिटर कॉलेजात त्याचे शिक्षण झाले. कॉलेजात असताना जॉन रस्किनच्या कलाविषयक लेखनाने तो प्रभावित झाला. एडवर्ड बर्न-जोन्स हा त्याचा हयातभरचा चित्रकार मित्र त्याला ऑक्सफर्डलाच भेटला. ह्या मित्रामुळे, विख्यात प्री-रॅफेएलाइट कवी आणि चित्रकार डँटी गेब्रिएल रोसेटी ह्याच्याशी मॉरिसचा परिचय झाला (प्री-रॅफेएलाइट्स ही रॅफेएलपूर्व-म्हणजे चौदाव्या-पंधराव्या शतकांतील-इटालियन कलेपासून प्रेरणा घेणाऱ्या इंग्रज कलांवंताची एक संघटना होती). मॉरिसला आरंभी वास्तुकलेत स्वारस्य होते परंतु रोसेटीच्या प्रभावातून तो कवितेकडे आणि चित्रकलेकडे वळला. त्याने आणि बर्न-जोन्सने लंडनमध्ये एक स्टुडिओ घेतला. ह्या स्टुडिओसाठी उचित असे फर्निचर मिळवण्यात अडचणी जाणवल्यामुळे त्यानेच आपल्याला लागणाऱ्या फर्निचरचे संकल्पन केले. पुढे आपल्या मित्रांच्या सहकार्याने त्याने एक व्यापारी संस्था स्थापन करून चित्रकाचा, जवनिका, भित्तिपत्रे (वॉलपेपर), फर्निचर इ. गृहसजावटीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची निर्मिती सुरू केली. वस्तु नुसत्याच सुंदर नकोत त्या उपयुक्तही असल्या पाहिजेत, अशी मॉरिसची दृष्टी होती. त्याचप्रमाणे मध्ययुगीन कलांबद्दल-ह्यात आलंकारिक कलाही आल्या-मॉरिसला विशेष आस्था होती. त्याने निर्मिलेल्या सजावटीच्या वस्तूंतून ह्याचा प्रत्यय येतो. गृहसजावटीसंबधीच्या इंग्रज समाजाभिरुचीवर मॉरिसने लक्षणीय प्रभाव पाडला. एकोणिसाव्या शतकात झपाट्याने पसरत चाललेली यांत्रिकीकरणाची लाट थोपवून, हस्तकौशल्याची कामे करणाऱ्या कारागिराचे महत्त्व आणि स्वातंत्र्य समाजाला पटवावे, ह्यासाठी मॉरिसने धडपड केली.
‘सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ एन्शंट बिल्डिंग्ज’ ही संस्था मॉरिसने १८७७ मध्ये स्थापन केली. इंग्लंडमधील जुन्या इमारती नष्ट होऊ नयेत, ही धडपड ह्यामागे होती. १८७० नंतर मॉरिसला शोभित हस्तलिखितांत (इल्यूमिनेटेड मॅन्यूस्क्रिप्ट्स) आणि सुलेखनकलेत स्वारस्य निर्माण झाले. ह्या कलेच्या जोपासनेची परिणती त्याने पुढे स्वतःचे मुद्रणालय (केल्मस्कॉट प्रेस) काढण्यात झाली. मुद्रणयोजनावरही त्याने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला.
ऑक्सफर्डला असताना मॉरिसने त्याच्या काही मित्रांसमवेत ऑक्सफर्ड अँड केंब्रिज मॅगझिन ह्या नावाचे एक नियतकालिक सुरू केले होते. कविता, निबंध, कथा असे लेखन तो त्यातून करीत असे. १८५८ मध्ये डिफेन्स ऑफ ग्विनिव्हिअर अँड अदर पोएम्स हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर द लाइफ अँड डेथ ऑफ जेसन (१८६७), द अर्थ्ली पॅरडाइज (१८६८–७०), लव्ह इज इनफ (१८७३), द स्टोरी ऑफ सिगुर्ड अँड व्होलसंग (१८७६) आणि चांट्स फॉर सोशॅलिस्ट्स (१८८४–८५) हे काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले. माधुर्य, पदलालित्य आणि आर्जव हे त्याच्या कवितेचे काही उल्लेखनीय गुण होत. ग्रीक आणि स्कँडिनेव्हिअन आख्यायिकांचा प्रभाव त्याच्या कवितेवर दिसतो. काही गद्य रोमान्सही त्याने लिहिले. १८८३ मध्ये ‘सॉशॅलिस्ट डेमॉक्रॅटिक फेडरेशन’ ह्या संघटनेचा मॉरिस सदस्य झाला परंतु त्यानंतरच्या वर्षी त्या संघटनेतून फुटून गेलेल्या सदस्यांबरोबर राहून मॉरिसने ‘सॉशॅलिस्ट लिग’ ह्या संघटनेच्या स्थापनेत भाग घेतला. त्या संघटनेच्या द कॉमनविल ह्या नियतकालिकाचे संपादन त्याने केले त्यात लेखनही केले. द ड्रीम ऑफ जॉन बॉल (१८८८) आणि न्यूज फ्रॉम नोव्हअर (१८९१) हे त्याचे ग्रंथ मुख्यतः गद्यात असून ते समाजवादी विचारांच्या प्रसारासाठी लिहिलेले आहेत.
मॉरिसने आइसलँडला दोनदा भेट दिली होती. आइसलँडिक वीरगाथांनी (सागा) तो प्रभावित झाला होता. त्यांतील बऱ्याचशा वीरगाथांचा इंग्रजी अनुवाद त्याने माग्नुसॉन ह्याच्या सहकार्याने केला होता. लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Clution-Brock, A. William Morris: His Work and Influence, London, 1914.
2. Drinkwater, J. William Morris, A Critical Study, London, 1912.
3. Evans, B. I. William Morris and His Poetry, London, 1925.
4. Glasier, J. B. William Morris and the Early Days of the Socialist Movement, London, 1921.
5. Henderson, Philip, William Morris, 1967.
6. Mackail, J. W. The Life of William Morris, 1899.
7. Thompson, E. P. William Morris, 1977.
8. Watkinson, Raymand, William Morris as Designer, 1967.
कुलकर्णी, अ. र.