माँड, लूटव्हिख : (७ मार्च १८३९–११ डिंसेबर १९०९). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व उद्योगपती. सॉल्व्हे अमोनिया-सोडा प्रक्रियेत केलेल्या सुधारणा व निकेल धातू मिळविण्याच्या नवीन प्रक्रियेचा शोध या कार्याबद्दल प्रसिद्ध. त्यांचा जन्म कासेल (जर्मनी) आणि शिक्षण मारबुर्ख व हायडल्‌बर्ग येथे झाले (१८५५–५९) नंतर हॉलंड व जर्मनी येथील रासायनिक उद्योगात उमेदवारी केल्यावर १८६२ साली ते इंग्लंडला गेले. सोडियम कार्बोनेट तयार करण्याच्या लब्लांक प्रक्रियेत कॅल्शियम सल्फाइडाच्या रूपात जे गंधक वाया जात असे ते परत मिळविण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली व तिचे एकस्व (पेटंट) घेतले. इंग्लंड व फ्रान्समधील सु. ३० कारखान्यांत ही पद्धती वापरली जाऊ लागली. १८७३ साली माँड व जॉन टॉमीलनसन ब्रुनर यांनी ब्रुनर, माँड अँड कंपनी ही रसायननिर्मितीची मोठी संस्था स्थापन केली. इंधन बचतीचे प्रयोग केल्यावर त्यांनी १८८३ साली माँड प्रोड्युसर वायू संयंत्राचे एकस्व मिळविले. या संयंत्रात दगडी कोळसा किंवा कोक यांतील नायट्रोजनाचे अमोनियात रूपांतर होते. त्याच वेळी यात ⇨ प्रोड्युसर वायूही निर्माण होतो. या वायूला ‘माँड गॅस’ म्हणतात. याचा स्थानिक व परदेशात प्रसार करण्यासाठी त्यांनी अनुक्रमे ‘माँड गॅस कंपनी’ व ‘पॉवर गॅस कॉर्पोरेशन’ यांची स्थापना केली.

वाया जाणाऱ्या अमोनियम क्लोराइडापासून क्लोरीन परत मिळविण्याचे प्रयोग करीत असताना संयंत्रातील निकेलच्या झडपा गंजतात, असे माँड व कार्ल लँगर यांना आढळले. मात्र प्रयोगशाळेतील उपकरणात असे होत नाही. संयंत्रातून अमोनिया बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारा कार्बन मोनॉक्साइड वायू हे याचे कारण असल्याचे त्यांना प्रयोगांती आढळले. कारण सौम्य उष्णतेमध्ये निकेल व कार्बन मोनॉक्साइड यांच्यापासून निकेल कार्बोनिल [Ni (CO)4] म्हणजे गंज तयार होतो. निकेल कार्बोनिलाचे ऊष्मीय अपघटन (उष्णतेने घटक रेणू अलग) होऊन शुद्ध निकेल मिळते. यावरून माँड यांनी धातुकांपासून (कच्चा धातूपासून) शुद्ध निकेल मिळविण्याची ‘माँड पद्धती’ शोधून काढली. या पद्धतीने निकेलचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी ‘माँड निकेल कंपनी’ स्थापन केली. (१९००). या कंपनीच्या खाणी कॅनडात व कारखाना वेल्समध्ये होता.

माँड १८८० साली ब्रिटनचे नागरिक व १८९० साली रॉयल सोसायटीचे फेलो झाले. त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले. संशोधन प्रकल्पांना ते सढळ हाताने मदत करीत असत. त्यांना कलात्मक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांनी आपला अमूल्य चित्रांचा संग्रह लंडनच्या नॅशनल गॅलरीला द्यावा, असे मृत्यूपत्रात लिहून ठेवले होते. ते लंडन येथे मृत्यू पावले.

लूटव्हिख यांचे पुत्र आल्फ्रेट मोरिट्‌स माँड म्हणजे लॉर्ड मेल्वेट (१८६८–१९३०). हे रसायनांची निर्मिती करणाऱ्या जगप्रसिद्ध ‘इंपिरियल केमिकल इंडस्ट्रीज’ या संस्थेचे एक संस्थापक होते.  

मिठारी, भू. चिं.