पंचानन माहेश्वरी

माहेश्वरी, पंचानन : (९ नोव्हेंबर १९०४–१८ मे १९६६). भारतीय वनस्पतिवैज्ञानिक. त्यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान (वनस्पतींच्या अवयवादिकांच्या कार्याचा विचार न करता त्यांच्या बाह्यस्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र) व गर्भविज्ञान यांसंबंधी विशेष महत्त्वाचे संशोधन केले.

माहेश्वरी यांचा जन्म जयपूर येथे झाला. जयपूर येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण अलाहाबाद येथिल एविंग ख्रिश्चन कॉलेजात व अलाहाबाद विद्यापीठात झाले. त्यांनी १९२७ मध्ये एम्.एससी. व १९३१ मध्ये डि.एस्सी. या पदव्या संपादन केल्या. १९२८–३० मध्ये त्यांनी एविंग ख्रिश्चन कॉलेजात वनस्पतिविज्ञानाचे अध्यापन केले. त्यानंतर त्यांनी आग्रा येथील महाविद्यालयात प्रथम अध्यापक आणि पुढे सहयोगी प्राध्यापक (१९३०–३७), अलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक (१९३७–३९), डाक्का विद्यापीठात प्रथम अध्यापक व नंतर जीवविज्ञान विभागाचे प्रमुख (१९३९–४९) म्हणून काम केले. १९४९ पासून मृत्यूपावेतो यांनी दिल्ली विद्यापीठाच्या वनस्पतिविज्ञान विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून काम केले. १९५९ मध्ये अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

माहेश्वरी यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान व गर्भविज्ञान  या विषयांत मोठा शिष्यवर्ग आणि संशोधनाची एक परंपरा निर्माण केली. १९५७ पासून त्यांनी प्रायोगिक गर्भविज्ञानातील संशोधनास प्रारंभ केला आणि त्यांच्या शिष्यांनी व सहकाऱ्यांनी ते कार्य पुढे चालू ठेवले. दिल्ली विद्यापीठातील वनस्पतिविज्ञानाची प्रयोगशाळा त्यांनी प्रगत राष्ट्रांतील अद्ययावत प्रयोगशाळांशी तुलना करता येईल इतकी समृद्ध केली. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, कॅनडा, ब्रिटन, नेदर्लंडस, जर्मनी, इंडोनेशिया इ.अनेक देशांतील वनस्पतिवैज्ञानिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या व तेथील संशोधनाचा अभ्यास केला.

त्यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ त्यांना अनेक सन्मान मिळाले. इंडियन बोटॅनिकल सोसायटिचे बिरबल सहानी पारितोषिक (१९५८), मॅक्‌गिल विद्यापीठाची (माँट्रिऑल, कॅनडा) डी.एस्‌सी (१९५९), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे सुंदरलाल होरा सुवर्णपदक (१९६३) वगैरे बहुमान त्यांना मिळाले. १९६५ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस इ. भारतीय संस्थांबरोबरच ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस, अमेरिकन बोटॅनिकल सोसायटी, रॉयल डच बोटॅनिकल सोसायटी वगैरे परदेशी वैज्ञानिक संस्थांचेही सदस्य होते. भारतीय विज्ञान परिषदेच्या वनस्पतिविज्ञान विभागाचे अध्यक्ष (१९५०), इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे अध्यक्ष (१९५२), पॅरिस येथील इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेसच्या गर्भविज्ञान विभागाचे अध्यक्ष (१९५४), इंटरनॅशनल सोसायटी ऑफ प्लँट मॉर्फालॉजिस्टसचे अध्यक्ष (१९५४), एडिंबरो येथील इंटरनॅशनल बोटॅनिकल काँग्रेसचे उपाध्यक्ष (१९६४), भारताच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्ष (१९६३–६५), इ. महत्त्वपूर्ण पदे त्यांनी भूषविली. त्यांनी लिहिलेले ॲन इंट्रोडक्शन टू द एंब्रियॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्म्‌स (१९५०), रिसेंट ॲडव्हान्सेस इन द एंब्रियॉलॉजी ऑफ अँजिओस्पर्म्‌स (१९६३), डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्‌स इन इंडिया (१९६५) हे ग्रंथ आणि सु. २०० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले. १९५० पासून फायटोमॉर्‌फॉलॉजी  या नियतकालिकाचे ते संपादक होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या प्रकाशनांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. ते दिल्ली येथे मृत्यू पावले.

त्यांचे पुत्र सतीशचंद्र माहेश्वरी (१९३४ –) हेही एक नामवंत वनस्पतिवैज्ञानिक असून त्यांनी वनस्पती आणि कोशिका (पेशी) यांचे शारीरक्रियाविज्ञान या क्षेत्रात (विशेषतः वनस्पतींच्या वाढीचे शरीरक्रियाविज्ञान व जीव रसायनशास्त्र आणि विभेदन म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी शरीराच्या विविध भागांचे होणारे रूपांतरण) महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. या कार्याबद्दल त्यांना १९७५ च्या शांतिस्वरूप भटनागर पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

जमदाडे, ज. वि.