मावा : या सूक्ष्म कीटकांचा समावेश ॲफिडी या कुलात होतो. हेमिप्टेरा गणाच्या होमोप्टेरा या उपगणात ॲफीडी हे कुल मोडते. हे कीटक बहुतेक सर्व वनस्पतींवर आढळतात. यांचे शरीर मृदू असते व त्यांची लांबी १·५–३·० मिमी. असते काही जातींत ही लांबी ५० मिमी. इतकीही आढळली आहे. सूक्ष्म आकारमानामुळे व झाडांच्या पानांच्या रंगांशी असणाऱ्या साम्यामुळे त्यांचे अस्तित्व ओळखणे कठीण जाते. पुष्कळशा जातींत शरीर रंगीत असते. हे रंग साध्या पांढऱ्या रंगापासून ते हिरवे, पिवळे, गुलाबी, तांबडे, करडे किंवा काळे अशा विविध छटांचे असतात. काही वेळा त्यांच्या अंगावर मेणासारख्या पदार्थाची भुकटी पसरलेली असते. हे सूक्ष्म कीटक ज्या वनस्पतींवर राहतात त्या वनस्पतीतील अन्नरस शोषून घेतात व पर्यायाने वनस्पतींच्या नाशास कारणीभूत होतात. फुलांच्या झाडांचे ताटवे किंवा मोठाली शेते यांचा थोड्याच अवधीत या कीटकांनी संपूर्ण नाश केल्याचे आढळले आहे. त्यांच्या सु. १,७५० जातींची नोंद झाली आहे व दरवर्षी नवीन जाती आढळत आहेत. भारतात माव्याच्या सु. ५०० जाती आढळतात.

आ.१ मावा : अर्भकास जन्म देणारी पंखहीन मादी : (१) शृंगिका, (२) डोळा, (३) पुढचा पाय, (४) चोचीसारखे तोंड, (५) मधला पाय, (६) श्वासरंघ्र, (७) मागील पाय, (८) नलिकाकृती इंद्रिय (निनालिका), (९) पुच्छ

शरीररचना : याच्या शरीराचा आकार कुंभाकृती असतो. शरीराची विभागणी शीर्ष, वक्ष व उदर यात होते. प्रौढ कीटकात पंखाचे व बिनपंखाचे असे दोन प्रकार आढळतात. पंखाच्या कीटकात शीर्षावर तीन साधे डोळे व दोन संयुक्त डोळे [⟶ डोळा] असतात, तसेच दोन शृंगिकाही (संधियुक्त स्पर्शेंद्रियेही) असतात. प्रत्येक शृंगीका तीन ते सहा खंडांची बनलेली असते. तोंड चोचीसारखे असते व या चोचीच्या आत केसासारखी चार मुखांगे असतात. ही मुखांगे वनस्पतींच्या परिकाष्ठात (अन्नरसाची ने-आण करण्यासाठी उपयोगात असलेल्या पेशीसमूहांच्या संस्थेत) खुपसून हा कीटक वनस्पतीतील रसांचे शोषण करतो रसाचे शोषण करण्यापूर्वी मुखांगातून विषारी लाळ वनस्पतीत टाकली जाते. त्यामुळे वनस्पतीच्या रंगद्रव्यावर परिणाम होऊन तिच्या दृश्य रंगरचनेत बदल होतात आणि वनस्पतीच्या आकारावरही परिणाम होतो. काही जातींचे मावा किटक वनस्पतीवर गुल्मे (गाठी) तयार करतात, तर काही कीटक विषाणूंचा (व्हायरसांचा) प्रसार करतात. रसशोषणाकरिता केलेल्या बारीक क्षतांतून वनस्पतीत सूक्ष्मजंतूंचाही प्रवेश होतो व परिणामी वनस्पती नाश पावतात

वक्ष तीन खंडांचे असते. पंख असलेल्या माव्याच्या वक्षावर पारदर्शी पंखांच्या दोन जोड्या असतात. यांपैकी मागची जोडी पुढच्या जोडीपेक्षा लहान असते. वक्षावर पायांच्या तीन जोड्या असतात. प्रत्येक पाय संधियुक्त असतो  व त्याच्या टोकास नखी असते.

उदर आठ खंडाचे असते. नववा खंड अल्पविकसित असतो. या खंडावर पुच्छ व गुदपट्टिका असते.  आ. २. जीवनचक्रातील तीन अवस्था : (१) अर्भक, (२) पंख विरहित मादी (३) पंखयुक्त मादी

वर्गीकरणात यास फार महत्त्व आहे. पहिल्या सात खंडावर प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे श्वासरंधे असतात. सहाव्या उदरखंडाच्या पृष्ठपार्श्वभागावर एक वैशिष्ट्यपूर्ण नलिकाकृती इंद्रिय असते. यातून वायूरूप पदार्थ किंवा मेण बाहेर पडते. या इंद्रियास निनालिका म्हणतात. असे इंद्रिय इतर कोणत्याही कीटकांत आढळत नाही. पूर्वी या नलिकांस  ‘मधुनलिका’ म्हणत असत. मावा कीटकापासून मिळणारा ⇨ मधुरस या नलिकांतून येतो अशी समजूत होती पण हे खरे नाही. मधुरस हे पचनक्रियेतून निघणारे उप – उत्पादन होय. स्वतःच्या अन्नाची गरज भागविल्यावर जे जास्त वनस्पतीरस आणि शर्करा माव्याच्या अन्ननलिकेत शिल्लक राहतात, त्यातून मधुरसाची उत्पत्ती होते व मधुरस माव्याच्या गुदद्वारातून बाहेर टाकला जातो.

जीवनचक्र : निषेचित (फलित) अंडी एक एक अगर समूहाने झाडांच्या पानांच्या खबदडीत हिरवाळ्यात घातली जातात. वसंत ऋतूपर्यंत अंड्यांत पिलांची वाढ होते. अंड्यांचे आकारमान साधरणपणे १ मिमी. असते व त्यांच्या रंग सुरुवातीस पिवळट किंवा हिरवट असतो. पुढे काही काळाने तो काळसर होतो. वसंत ऋतूच्या सुरुवातीस अंड्यांतून मावे बाहेर पडतात. तापमानानुसार दोन तीन आठवड्यांत चार वेळा कात टाकून ते प्रौढत्व अवस्थेप्रत पोहोचतात. हे प्रौढ कीटक म्हणजे जीवनचक्रातील पहिली पिढी होय. यांना ‘मूळ माता’ असे संबोधितात. सर्वसाधारणपणे यांना पंख नसतात. या मूळ मातांची अंडी ⇨ अनिषेकजननाने (शुक्राणू व अंडे यांचा संयोग न होताच घडूण येणाऱ्या प्रजोत्पादनाने) वाढतात आणि यांच्या पुढील पिढ्यांतही अनिषेकजनन आढळते. काही मावा कीटकांत अनिषेकजननाने वाढणारी अंडी मादीच्या पोटातच वाढतात आणि यथाकाल मादी त्यांना जन्म देते. हे प्रजोत्पादन हिवाळ्यापर्यंत चालते. प्रत्येक मादी दररोज तीन ते सात पिलांना याप्रमाणे तीन ते चार आठवडे प्रसवते. या काळात १२ ते २० पिढ्या निर्माण होतात आणि माव्याची अमर्याद संख्येने निर्मिती होते. हे सर्व कीटक एकएकटे किंवा समूहाने सर्व वनस्पतींवर पसरतात. आणि पाने, खोड व मुळे खाऊन संबंध झाडांचा नाश करतात.


आ. ३. अर्भकास जन्म देताना माव्याची पंखविरहित मादी.दुसऱ्या पिढीतील मावे पंखाचे अगर पंखविरहित असतात. यापुढील पिढ्यांतील पंख असलेले कीटक एका झाडावरून त्याच जातीच्या अगर इतर दुसऱ्या जातींच्या झाडांवर जातात व अशा रीतीने त्यांचा फैलाव होतो. काही नियमितपणे स्थलांतरण करणाऱ्या जाती आहेत. त्यांचे वसंत ऋतूत तयार होणारे कीटक मूळ झाडावरून त्या झाडासारख्या पण निराळ्या जातीच्या दुय्यम झाडावर जातात व अशा रीतीने त्यांचा प्रसार होतो. मूळ झाड साधारणपणे बारमाही विकास पावलेले असते. याउलट दुय्यम झाडे वार्षिक व लहान झुडपांसारखी असतात. या दुय्यम झाडांवर बिनपंखाच्या कीटकांच्या अंदाजे दहा पिढ्या तयार होतात.

उन्हाळा संपल्यावर जेव्हा तापमान कमी होते तेव्हा या दुय्यम झाडांवर असलेल्या कीटकांपासून पंख असलेले मावे तयार होतात व ते दुय्यम झाडांवरून मूळ झाडांकडे जातात व तेथे आपले समूह स्थापन करतात. या थंड हंगामातील स्थलांतरण करणाऱ्या व पंख असलेल्या माव्यांपासून पंख नसलेल्या, लैगिंक व अंडी घालणाऱ्या माद्या तयार होतात. या माद्यांचे पंख असलेल्या व दुय्यम झाडांवर तयार झालेल्या नरांशी मीलन होते. मीलनानंतर या माद्या मूळ झाडावर निषेचित अंडी घालतात व त्यांपासून तयार होणाऱ्या माव्यांचे नवीन जीवनचक्र सुरू होते. हे जीवनचक्र सप्ताळूवर आढळणाऱ्या मायझस परसिके आणि बटाट्यावर सापडणाऱ्या मॅक्रोसायफम सोलॅनीफोली या माव्यांचे बाबतीत दिसून येते.

इतर जातींच्या माव्यांत थंड हंगामातील स्थलांतरण करणारे मावे मूळ झाडांवर आल्यानंतर त्याच्यांपासून अनिषेकजननाचे पंखविरहित माद्या तयार होतात आणि पुढे या माद्यांपासून अनिषेकजननाने  लैंगिक नर व माद्यांची उत्पत्ती होते व नवीन जीवनचक्रास सुरुवात होते.

साधारणपणे अंडी घालणाऱ्या माद्या ह्या सर्व जातींत पंखविरहित असतात. नर मावे मादीपेक्षा आकारमानाने लहान असून त्यांना पंख असतात किंवा नसतातही.

माव्यांच्या काही जातींत प्रजोत्पादनाच्या जीवनचक्रात लैंगिक प्रजोत्पादनाचा अभाव असतो. लैगिंक प्रजोत्पादनास मूळ आश्रयी झाडांची आवश्यकता असते. काही भूवैज्ञानिक घडामोडीमुळे ही मूळ झाडे जर नाश पावली, तर माव्याच्या ज्या जातीच्या प्रजोत्पादनास ही झाडे आवश्यक आहेत, त्या जातींच्या जीवनचक्रातही फरक पडतात आणि लैगिंक प्रजोत्पादनाच्या अवस्थेचा अभाव दिसून येतो. काही वेळा एका विशिष्ट मूळ झाडावर जगणारे मावे जर दूर दुसऱ्या प्रदेशात नेले गेले, तर त्या प्रदेशात या विशिष्ट मूळ झाडांच्या अभावामुळेही त्यांच्या जीवनचक्रात लैंगिक प्रजोत्पादनाचा अभाव दिसून येतो. सफरचंदावरचा मावा उत्तर अमेरिकेतून जेव्हा युरोपात आणला गेला तेव्हा त्यास लागणारे मूळ झाड यूरोपमध्ये नसल्यामुळे त्याच्या जीवनचक्रातील लैंगिक प्रजोत्पादनाचा लोप झाला व त्यांची उत्पत्ती अनिषेकजननाने होऊ लागली.

मूळ झाडावरून काही काळाने दुय्यम झाडावर जाण्यात कीटकाचा फायदा असतो. कारण ज्या वेळी नैसर्गिक कारणामुळे मूळ झाडातील रस शोषून घेणे त्याला कठीण जाते त्याच वेळी तो दुय्यम झाडावर जातो. स्थलांतरणामुळे त्याला त्याच्या नैसर्गिक शत्रूपासूनही स्वतःचे संरक्षण करता येते. उष्ण कटिबंधात व पादपगृहात (नियंत्रित हवामान परिस्थितीत वनस्पती वाढविण्यासाठी बांधलेल्या इमारतीत) असणाऱ्या माव्यांच्या जातींत अनिषेकजननाचे सतत प्रजोत्पादन होते, कारण त्या ठिकाणी त्यांना स्थिर परिस्थिती लाभते.

उपद्रव : माव्यामुळे पोषक वनस्पतींचा संपूर्ण नाश होत नाही, परंतु या वनस्पतींचा वाढण्याचा जोम कमी होतो आणि त्यांच्यात काही विकृती निर्माण होतात. पहाणीअंती असे आढळले आहे की, माव्यामुळे पुष्कळच नुकसान होते. एकट्या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये वाटाण्यावरच्या माव्यामुळे (मॅ.पिसी) प्रतिवर्षी ३ कोटी रूपयांचे नुकसान होते, तर बटाट्यावरच्या माव्यामुळे (मॅ. सोलॅनीफोली) हे नुकसान ५० कोटीच्या घरात जाते. माव्याचे आक्रमण गुलाब, ॲस्टर वगैरेंसारख्या शोभेच्या व फुलांच्या झाडांवरही फार मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय धान्ये, सफरचंद, खरबूज, कापूस, कोबी वगैरे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या झाडांवरही माव्याचा उपद्रव फार मोठ्या प्रमाणात होतो. ज्वारी वर पडणारा चिकटा हा रोग माव्याच्या उपद्रवामुळे होतो. [⟶ ज्वारी].

नियंत्रण : माव्यावर नैसर्गिक प्रतिबंधक उपाय म्हणजे ⇨ चित्रांग भुंगेऱ्याकडून होणारा त्यांचा नाश. हे भुंगरे मावे खातात. यांच्या डिंभावस्थेत (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न  मिळवून  जगणाऱ्या व प्रौढांशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेत) ते माव्याच्या मोठमोठ्या समूहांचा नाश करतात. माव्याचा अन्न म्हणून उपयोग करणाऱ्या कीटकांच्या आणखीही काही जाती आहेत.

कीटकनाशके वापरूनही माव्यांचा नाश करता येतो. मॅलॅथिऑन, रोटेनॉन, कार्बारिल, डायझिनॉन वगैरे कीटकनाशके योग्य त्या प्रमाणात वापरल्यास परिणामकारक ठरतात.

पहा : मधुरस, मुंगी.

इनामदार, ना. भा.