माल्व्हेलीझ : (भेंडी गण). जे. एन. मित्र यांच्या मते या गणात माल्व्हेसी (भेंडी कुल), टीलीएसी (परूषक कुल). स्टर्क्युलिएसी (मुचकुंद कुल), बॉम्बॅकेसी (शाल्मली कुल) व एलिओकार्पेसी (रूद्राक्ष कुल) ही पाच कुले असून त्यांच्यामध्ये एकमेकांशी आप्तभाव आहेत. या गणातील वनस्पती ⇨ ओषधी, झुडपे व वृक्ष असून त्यांच्या कोवळ्या भागांत श्लेष्मल कोशिका (बुळबुळीत पदार्थयुक्त पेशी), कोटरे किंवा नाल्या असतात. खोडात तंतू असून कधी कधी सालीवर तारकाकृती सूक्ष्म केस असतात. पाने सोपपर्ण (तळाशी उपांगे असलेली) फुले द्विलींगी, क्वचित एकलिंगी, अवकिंज व चक्रीय (मंडले असलेली) पंचभागी संवर्त धारास्पर्शी (संदले किनारींनी स्पर्श करणारी) प्रदले (पाकळ्या) सुटी एकमेकांना अंशतः नियमितपणे वा अनियमितपणे झाकून राहणारी केसरदलांची (पुं-केसरांची) दोन मंडळे बाहेरची संदलासमोर असून कधी ती वंध्य, तर कधी त्यांचा अभाव असतो कधी एकसंघ (जुळलेली), बहुसंघ (अनेक जुडग्यांत)किंवा सुटी परंतु तळाशी जुळलेली असतात. [⟶ फूल] .

माल्व्हेलीझ गणाची उगम ⇨ रोझेलीझपासून (गुलाब गणापासून) किंवा अधिकांश गटिफेरेलीझपासून (कोकम गणापासून) झाला असावा. गटिफेरेलीझमधील [⟶ गटिफेरी] बहुसंघत्वाचा बदल क्रमविकासात (उत्क्रांतीत) एकसंघत्वात होण्याची शक्यता गृहित धरली आहे. काहींच्या मते माल्व्हेलीझचा उगम (रोझेलीझद्वारे) रॅनेलीझपासून झाला असावा. तर रॅनेलीझपासून बॉम्बॅकेसीद्वारा इतर चार कुले दोन मार्गानी अवतरली असावीत, असे इतर काहींचे मत आहे.

पहा : माल्व्हेसी.

संदर्भ : 1. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

             2. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol, II, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.