मालावी प्रजासत्ताक : (पूर्वीचे न्यासालँड). आफ्रिकेच्या आग्येय भागातील एक खंडांतर्गत देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ९° २७ ′ ते १७° १०′ द. व ३२° २०′ ते ३६° पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ १,१८,४८५ चौ. किमी. यांपैकी २३,५६९ चौ. किमी. जलाशयांचे क्षेत्र असून त्यांत मुख्यतः न्यासा (मालावी) सरोवराचा समावेश आहे. लोकसंख्या ६४,२९,००० (१९८३ अंदाज). दक्षिणोत्तर लांबी ८५३ किमी., पूर्व-पश्चिम कमाल रूंदी २५७ किमी. मालावीच्या उत्तरेस व ईशान्येस टांझानिया, पूर्वेस, दक्षिणेस व नैर्ऋत्येस मोझँबीक आणि पश्चिमेस झँबिया हे देश आहेत. देशाला एकूण २,७६८ किमी. लांबीची सरहद्द असून लिलाँग्वे (लोकसंख्या ९८,७१८–१९७७) ही देशाची राजधानी आहे.
भूवर्णन: दक्षिणोत्तर पसरलेल्या मालावी प्रजासत्ताकाचा आकार अरुंद व लांबट आहे. हा देश विषुववृत्तीय प्रदेशात असून निसर्गसौंदर्य, पर्वत व सरोवरे यांमुळे याला ‘आफ्रिकेचे स्वित्झर्लंड’ म्हणतात. देशाची भूरचना विविध प्रकारची असून तीनुसार ग्रेट रिफ्ट व्हॅली, मध्यवर्ती पठारी प्रदेश, उच्चभूमी व पर्वतीय प्रदेश असे मुख्य चार विभाग पडतात. त्यांपैकी ग्रेट रिफ्ट व्हॅली हा खचदरीचा प्रदेश विशेष उल्लेखनीय व वैशिष्ट्यपूर्ण आहे. पूर्व भागात दक्षिणोत्तर पसरलेल्या या प्रचंड द्रोणीसारख्या प्रदेशातच न्यासा सरोवर व शीरे नदीचे खोरे येते. न्यासा सरोवराच्या दक्षिण टोकापासून देशाच्या दक्षिण सरहद्दीपर्यंतचा सु ४०० किमी. लांबीचा प्रदेश शीरे नदीद्रोणीने व्यापला आहे. याच नदीद्रोणीच्या उत्तर टोकाशी मालोंबे सरोवर आहे. न्यासा सरोवराच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवरील ८ ते २५ किमी. रूंदीच्या प्रदेशात ठिकाठिकाणी दलदली व खारकच्छे आढळतात. या किनारी प्रदेशाने देशातील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळाच्या आठ टक्के क्षेत्र व्यापले आहे. मध्यवर्ती भागात ८०० ते १,४०० मी. उंचीचा पठारी प्रदेश असून त्याने देशाच्या एकूण भूभागाच्या ७५% क्षेत्र व्यापले आहे. देशातील उच्चभूमीचे प्रदेश एकाकी असे असून त्यांची सस. पासून उंची २,४४० मी. पर्यंत आढळते. यात उत्तर व पश्चिम भागांतील न्यीका, विप्या, डोवा हे उच्चभूमीचे प्रदेश, डेड्झा-किर्क पर्वतरांग आणि दक्षिणेकडील शीरे उच्चभूमीच्या प्रदेशाचा समावेश होतो. शीरे उच्चभूमीतील सपित्वा हे देशातील सर्वोच्च शिखर आहे. आग्येय भागातील मुलांजे (३,०४८ मी.) व झाँबा (२,१३३ मी.) हे एकाकी गिरिपिंड म्हणजे देशाचा चौथा प्राकृतिक विभाग होय. समुद्रसपाटीपासून सर्वांत कमी उंची (३७ मी.) देशाच्या दक्षिण टोकाशी, शीरे नदीखोऱ्यात आहे.
देशाच्या पठारी प्रदेशात तपकिरी व पिवळी रेवाळ मृदा, शीरे खोऱ्यात गाळाची मृदा, तर सरोवराकाठी गाळाची काळी व रेताड मृदा आढळते. देशातील खडक हे कँब्रियनपूर्व कालखंडातील असून त्यांत नीस, शिस्ट, ग्रॅनाइट, सायेनाइट हे खडकप्रकार आढळतात. येथील अवसादी खडक ३,४५० ते १,९०० लक्ष वर्षांपूर्वीचे असावेत. दक्षिणेकडील शीरे खचदरीत प्राणिपाषाण व अल्कली गुणधर्मांचे खडक आढळतात.
देशाच्या उत्तर व मध्य प्रदेशांत उगम पावणाऱ्या बहुतेक सर्व नद्या न्यासा सरोवराला जाऊन मिळतात. यांत उत्तर रूकूरू, दक्षिण रूकूरू, ड्वांग्ग्वा, लीलाँग्वे व बूआ या नद्या प्रमुख आहेत. न्यासा सरोवरातून बाहेर पडणारी शीरे ही एकमेव नदी आहे. न्यासा सरोवराच्या दक्षिण टोकाशी न्यासा सरोवरालाच जोडून असलेल्या मालोंबे सरोवरातून दक्षिणेस शीरे नदी वाहत जाते व अनेक उपनद्यांसह दक्षिणेस देशाबाहेर (मोझँबीकमध्ये) झँबीझी नदीला मिळते. देशाच्या आग्येय भागातही एक स्वतंत्र नदीप्रणाली निर्माण झालेली आहे. येथील नद्या चिल्वा सरोवराला जाऊन मिळतात. न्यासा हे आफ्रिकेतील एक विस्तीर्ण सरोवर (क्षेत्रफळ २३,०५० चौ. किमी.) मालावी देशाच्या पूर्व सरहद्दीवर दक्षिणोत्तर दिशेत पसरलेले असून पूर्व सरहद्दीपैकी ६०% सरहद्द याने व्यापली आहे. सरोवराची दक्षिणोत्तर लांबी ५८४ किमी. व पूर्व-पश्चिम रूंदी १६ ते ८० किमी. असून ते सस. पासून ४७२ मी. उंचीवर आहे. न्यासा सरोवराच्या दक्षिण टोकाशी मालोंबे सरोवर, तर देशाच्या आग्येय सरहद्दीदरम्यान चिल्वा व शीऊता ही सरोवरे आहेत. येथील सरोवरांच्या अंतर्गत स्थानामुळे कोरड्या ऋतूत त्यांची क्षारता अधिक आढळते.
हवामान: हा देश विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशात येत असला, तरी डोंगराळ व पठारी भागांमुळे येथील हवामान आल्हाददायक आहे. प्रदेशाच्या उंचसखलपणामुळे हवामानात भिन्नता आढळते. मे ते मध्य ऑगस्ट हवामान थंड व मध्य ऑगस्ट ते नोव्हेंबर हवामान उष्ण असून डिसेंबर ते एप्रिल पावसाळा असतो. देशात सरासरी तापमान १३° ते २८° से. यांदरम्यान आढळते. दक्षिण शीरे खोऱ्यात सरोवराकाठी काही ठिकाणी ३८° से. पर्यंतही तापमान वाढलेले आढळते. सर्वांत कमी तापमान जुलैमध्ये, तर सर्वाधिक तापमान नोव्हेंबरमध्ये असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६ ते १५२ सेंमी. असून उत्तर भागात हेच प्रमाण १६३ सेंमी. आहे. उत्तरेस न्यीका पठारावर जुलैमध्ये रात्री कधीकधी हिमतुषार पडतात. पठारी प्रदेशात हवामान थंड व पर्जन्यमान जास्त, तर दक्षिणेकडील कमी उंचीच्या प्रदेशात हवामान उष्ण व पर्जन्यमान कमी असते.
वनस्पती व प्राणी : उंचसखल प्रदेश, जमीन आणि हवामानातील भिन्नतेनुसार नैसर्गिक वनस्पतींमध्ये भिन्नता आढळते. पुरेसा पर्जन्य वा पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशात मऊ लाकडाच्या अनेक वनस्पती विखुरलेल्या दिसतात. विशेषतः मुलांजे पर्वतप्रदेशात बांबू व सीडार हे वनस्पती प्रकार, तर उच्चभूमी प्रदेशात सदाहरित सूचीपर्णी प्रकारच्या वनस्पती आढळतात. कमी उंचीच्या प्रदेशात मोपाने, गोरखचिंच, बाभूळ, मॅहॉगनी इ. वृक्षप्रकार तसेच कोरड्या प्रदेशात सॅव्हाना (पार्कलँड) गवताळ प्रदेश आहेत. अरण्ये तोडून बरेच प्रदेश शेतीखाली आणले असले, तरी उच्चभूमीच्या प्रदेशात मऊ लाकडाच्या वनस्पतींची लागवडही केलेली आहे.
देशात प्राणीही विविध प्रकारचे आहेत. हत्ती, जिराफ, गेंडा, म्हैस, बॅबून, माकड, तरस, लांडगा, झेब्रा, सिंह, निशाचर मांजर, आफ्रिकन रानडुक्कर, बिजू, सायाळ इ. प्रकारचे प्राणी येथे आढळतात. देशात अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांपैकी ‘कासुंग्गू राष्ट्रीय उद्यान’ सर्वांत मोठे (२,०४६ चौ. किमी.) आहे. देशात सु ६०० प्रकारचे पक्षी, अनेक सरपटणारे प्राणी, विविध जलचर, मासे व किटक आढळतात.
इतिहास व राज्यव्यवस्था : सुमारे १२,००० वर्षांपूर्वीपासून मालावीमध्ये वस्ती असावी असे दिसते. इ.स.पू. ८००० ते २००० या काळात त्वा व फूला लोक येथील मूळ रहिवासी होत. इ.स. पहिल्या ते चौथ्या शतकांत बांटू भाषिक लोक या प्रदेशात आले. १४८० मध्ये त्यांनी माराव्ही राष्ट्रमंडळाची स्थापना केली. मध्य व दक्षिण मालावीवर या राष्ट्रमंडळाचा विस्तार होता. सतराव्या शतकात काही जवळपासच्या प्रदेशावरही त्यांचे प्रभुत्व होते. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात चेवा लोकांचा येथे विशेष प्रभाव होता. १६०० त्या सुमारास एन्गोंडे या बांटुभाषिकांनी उत्तर मालावीत आपल्या राज्याची स्थापना केली, तर मालावी सरोवराच्या पूर्व किनाऱ्यावरील लोकांनी अठराव्या शतकात येथे चिकुलामायेंबे राज्याची स्थापना केली. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत येथील गुलामांचा व्यापार भरभराटीला आला होता. १८३० ते १८६० यांदरम्यान स्वाहिली भाषिक लोकांचे तसेच एन्गोंडे व याऊ लोकांचे या प्रदेशात आगमन झाले. याऊ लोकांबरोबर स्वाहिली भाषिकांनीही प्रामुख्याने गुलामांच्या व्यापारात विशेष रस घेतला. गुलामांच्या व्यापाराबरोबरच १८६० मध्ये मालावीत इस्लामचा प्रसार झाला. यांदरम्यान डेव्हीड लिव्हिंग्स्टन या पहिल्या युरोपियनाने या प्रदेशाचे समन्वेषण केले. त्याच्या अहवालावरूनच १८८० व १८९० मध्ये यूरोपियनांनी येथे वसाहती स्थापन केल्या. १८९१ मध्ये ब्रिटिशांनी या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित करून संरक्षित असा न्यासालँड जिल्हा निर्माण केला. १८९३ मध्ये या प्रदेशाचे संरक्षित अशा ‘ब्रिटिश मध्य आफ्रिके’ त, तर १९०७ मध्ये ‘न्यासालँड’ मध्ये रूपांतर झाले. ब्रिटिश वसाहतीच्या कारकीर्दीत नगदी पिकांच्या उत्पादनावर तसेच रस्ते व लोहमार्ग-विकासावर अधिक भर दिला गेला. मात्र शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत विशेष सुधारणा झाली नाही. त्यामुळे अनेक लोकांनी रोजगार मिळविण्यासाठी शेजारी देशांकडे स्थलांतर केले. १९५१ ते १९५३ या काळात उत्तर व दक्षिण ऱ्होडेशिया आणि न्यासालँडमधील वसाहतींनी मिळून एक संघ स्थापन केला. १९६३ मध्ये हा संघ बरखास्त करण्यात आला. १ फेब्रुवारी १९६३ रोजी न्यासालँड हा स्वयंशासित देश बनला तर ६ जुलै १९६४ रोजी न्यासालँड ‘मालावी ’ या नावाने व ब्रिटिश राष्ट्रकुलाचा सभासद म्हणून स्वतंत्र झाला. ६ जुलै १९६६ रोजी मालावी प्रजासत्ताक बनला. त्याच वेळी नवे संविधान स्वीकारण्यात आले व हेस्टिंग्ज कामूझू बांडा (१९०६ – ) हे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. १९७० च्या सुरूवातीस मोझँबीकमधील राजद्रोह्यांचे मालावी आश्रयस्थान बनले होते. नोव्हेंबर १९७० मध्ये केलेल्या संविधानातील दुरूस्तीनुसार ६ जुलै १९७१ पासून बांडा यांची कायमचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर मालावीच्या पहिल्या संसदीय निवडणुका २९ जून १९७८ रोजी झाल्या व बांडा हे राष्ट्राध्यक्ष बनले. सुमारे १५,००० (१९८३) मालावी लोक दक्षिण आफ्रिकेत रोजगार करीत असून मालावीचे दक्षिण आफ्रिकेशी असलेले मैत्रीचे संबंध तसेच पुढे चालू राहिले आहेत.
राष्ट्राध्यक्ष हात शासनाचा व मालावी काँग्रेस पक्षाचा प्रमुख असतो. राष्ट्राध्यक्ष हा निर्वाचित असून त्याची मदत साधारणपणे पाच वर्षे असते. मात्र बांडा हे तहहयात राष्ट्राध्यक्ष आहेत. मालावी हे एकपक्षीय राष्ट्र आहे. संसदेत १०१ निर्वाचित सदस्य असतात व त्यांची मुदत पाच वर्षांची असते. मात्र राष्ट्राध्यक्षांना कितीही नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे. कॅबिनेट मंत्र्यांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करीत असून ते राष्ट्राध्यक्षाला जबाबदार असतात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाची तीन विभागांत व २४ जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे.
काळा, तांबडा व हिरवा असे आडवे व समान तिरंगी पट्टे असलेला व काळ्या रंगाच्या पट्ट्यावर मध्यवर्ती असा तांबड्या रंगात उगवत्या सूर्याचे चित्र असलेला राष्ट्रध्वज आहे. मालावीच्या संरक्षण दलात ४,६५० लोक असून (१९८३) याशिवाय सैनिकसम संघटनेत १,००० व राष्ट्रीय पोलीस दलात ३,००० लोक आहेत. संरक्षणावरील खर्च दोन कोटी अमेरिकी डॉलर एवढा होता (१९८१). सर्वोच्च मॅजिस्ट्रेटच्या व परंपरागत न्यायालयांमार्फत न्यायदानाचे काम चालते. देशात २३ मॅजिस्ट्रेट न्यायालये, १७६ परंपरागत व २३ स्थानिक अपील न्यायालये आहेत.
आर्थिक स्थिती:कृषी: देशाची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे. एकूण क्षेत्रफळाच्या ३५% क्षेत्र लागवडीखाली असून ८५% लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे. भूधारणेचे प्रमाण बरेच कमी आहे. निर्वाह शेती बरीच आहे. देशात सहसा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत नसल्याने अन्नधान्याच्या उत्पादनात मालावी स्वयंपूर्ण आहे. १९८० मध्ये मात्र अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा लोकसंख्येतील वाढ अधिक झालेली दिसते. तंबाखू, साखर, चहा ही प्रमुख कृषिउत्पादने असून त्यांच्या निर्यातीपासून देशाच्या एकूण उत्पन्नापैकी ८१% उत्पन्न मिळते (१९८१). याशिवाय कापूस, भुईमूग, मका व वाटाणा हीसुद्धा महत्त्वाची कृषिउत्पादने आहेत. चहाच्या मळ्यांखाली १०,००० हे. क्षेत्र असून शीरे उच्चभूमीवर बरेचसे चहाचे मळे आहेत. १९८१ मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादन झाले (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : ऊस १,७०० मका १,६०० फळे २२३ भाजीपाला २०४ भुईमूग १०० ज्वारी १४० बटाटे ११७ टॅपिओका ९० तंबाखू ५२ तांदूळ ४० चहा ३२ कापूस ९ देशात ग्रामीण विकासाच्या प्रमुख चार योजना आखल्या असून त्यांखाली मालावीच्या एकूण क्षेत्रांपैकी २०% क्षेत्र आणले आहे. त्यांपैकी १९६८ मध्ये सुरू झालेली ‘लीलाँग्वे भूविकास योजना’ ही सर्वांत मोठी आहे. १९७७ पासून ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना’ राबविली जात असून तिला आंतरराष्ट्रीय विकास संघ, आफ्रिकी विकास बँक, यूरोपीय आर्थिक समूह (ईईसी), कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादींतर्फे अर्थसाहाय्य मिळते. कृषिविकास व खरेदी विक्री महामंडळ आणि काही सहकारी सोसायट्या यांमार्फत मुख्य नगदी पिकांचा व्यापार केला जातो.
देशात पशुपालन व्यवसाय विशेष महत्त्वाचा नाही. १९८१ मधील पशुधन व पशुधनउत्पादन पुढीलप्रमाणे होते. (पशुधन संख्या हजारांमध्ये) : गुरे ८७१, डुकरे २०६, मेंढ्या ८५, शेळ्या ७१८ व कोंबड्या ८,१००. पशुधनउत्पादन (हजार मे. टनांमध्ये) : गाई-गुरांचे मांस १२, शेळ्यांचे मांस २, डुकरांचे मांस ७, कोंबड्यांचे मांस ९, गाईचे दुध ३५ व कोंबड्यांची अंडी १०·८.
व्यापारी तत्त्वावरील मासेमारी वाढत असून न्यासा सरोवर हे मासेमारीचे प्रमुख क्षेत्र आहे. याशिवाय मालोंबे सरोवर, चिल्वा सरोवर व शीरे नदीतही थोड्याबहुत प्रमाणावर मासेमारी केली जाते. १९८१ मध्ये ५१,४०० मे. टन इतके माशांचे उत्पादन झाले. देशात, विशेषतः जास्त उंचीच्या प्रदेशात, नैसर्गिक वनसंपदा भरपूर आहे. वन विभागाकडून मऊ लाकडाच्या वृक्षांची, विशेषतः पाइन, सायप्रस व सीडार या वृक्षांची, लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. १९८१ मध्ये सर्व प्रकारच्या लाकडांचे एकूण उत्पादन १,०४,१९,००० घ.मी. झाले. वनोत्पादनाचा स्थानिक वापर अधिक असून काही वनोत्पादनांची निर्यात डेन्मार्क व झँबिया ह्या देशांना केली जाते.
उद्योग : खनिजांच्या अभावामुळे खाणकाम व्यवसाय महत्त्वाचा नाही. चुनखडकाच्या खाणीच फक्त महत्त्वाच्या असून सिमेंट उत्पादनासाठी त्यांचा वापर केला जातो. १९७९ मध्ये सिमेंट उत्पादनासाठी १,१५,००० टन एवढे चुनखडकाचे उत्पादन घेण्यात आले. कुरुविंद, गेलेना, सोने, बॉक्साइट, कायनाइट, ॲस्बेस्टस व अभ्रक यांचे उत्पादन काही प्रमाणावर होते. खनिजसंपत्तीचा शोध घेण्याचे काम चालू असले, तरी व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची अशी कोळशाशिवाय इतर कुठलीही खनिजद्रव्ये सापडली नाहीत. देशात विद्युत्शक्तिचे उत्पादन व वापर या दोहोंचेही प्रमाण फारच कमी आहे. वीज उत्पादन व वितरण मालावी विद्युत्पुरवठा आयोगाकडून केले जाते. १९८० मध्ये एकूण ३,९८० लक्ष किवॉ. ता. विद्युत्शक्ति निर्माण झाली. १९८१ मध्ये या आयोगाने ३,४८० लक्ष किवॉ. ता. वीज स्थानिक वापरासाठी पुरविली, तर बाकीच्या विजेची निर्यात मोझँबीकला केली. एकूण वीजनिर्मितीपैकी ९०% जलविद्युत् असते. आयोगाने अनेक नवीन विद्युत्शक्तिनिर्मिती केंद्रांची कामे हाती घेतली आहेत. खनिज तेलाचे स्थानिक उत्पादन होत नसल्याने त्याची पूर्णपणे आयात केली जाते. १९८१ मध्ये ४७,९३९ टन कोळसा, ५४,४१० टन तेल आणि ७७,९२० टन डीझेल व इतर इंधन साहित्य यांची आयात करण्यात आली.
देशात निर्मिती व अवजड उद्योगांचे प्रमाण खूपच मर्यादित आहे. चहा, तंबाखू, साखर व कापड हे येथील प्रमुख प्रक्रिया व निर्मिती उद्योग आहेत. यांशिवाय साबण, निर्मलक, सिगारेटी, रेडिओ, कृषिअवजारे, आगपेट्या, माशांची जाळी, पादत्राणे, लाकडी सामान, बिस्किटे, जिन, मध, ब्लँकेटे, कापड, खनिज तेल, कौले व वीटनिर्मिती हे उद्योगधंदे देशात चालतात. १९८० मध्ये प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (आकडे लक्षांत) : कच्ची साखर, १·४७ मे. टन, बीर ६·०३ हेक्टोलिटर, सिगारेटी ६,३०० नग, ब्लँकेटे ८·१५ नग व सिमेंट ०·९२ मे. टन. १९८१ मध्ये देशात एकूण ३,६०,०२३ कामगार होते. त्यांपैकी शेती १,६३,१२६, वनोत्पादन व मासेमारी व्यवसायांत ३९,८४१, बांधकामात ४१,८०८, निर्मिती-उद्योगांत ५०,३२१, सेवा व्यवसायांत व इतर क्षेत्रांत ६४,९२७ कामगार गुंतले होते. १९८३ ची कामगारांची संख्या २६ लक्ष असून त्यांपैकी ८५% निर्वाह शेतीत गुंतले होते. बरेचसे यूरोपीय कामगार मालावीच्या शासकीय सेवेत असून येथील बहुतेक आशियाई लोक व्यापारात गुंतलेले आहेत. ‘ट्रेड्स युनियन काँग्रेस ऑफ मालावी ’ (स्था. १९६४) ही देशातील प्रमुख कामगार संघटना असून तिचे ६,५०० सभासद आहेत.
व्यापार, वाणिज्य व अर्थ: मालावीचा अंतर्गत व्यापार प्रामुख्याने देशातील प्रमुख शहरांतच केंद्रित झालेला आढळतो. व्यापारात गुंतलेल्या प्रत्येकाला व्यापार परवाना घ्यावाच लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार मुख्यतः दक्षिण आफ्रिका, ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, झिंबाब्वे (ऱ्होडेशिया), प. जर्मनी इ. देशांशी चालतो. मालावीतून तंबाखू, साखर, चहा, भुईमूग, कापूस, तांदूळ यांची निर्यात, तर कापड, वस्त्रे, मोटारी व मोटारसायकली, यंत्रे, वाहतूक साहित्य, पादत्राणे, अन्नधान्य उत्पादने, वैद्यकीद्य वस्तू व औषधे, दुग्धजन्यपदार्थ, खनिज तेल इत्यादींची आयात केली जाते. १९८२ मध्ये एकूण आयात ३२,२०,९९,००० क्वाचा (मालावीचे चलन) व एकूण निर्यात २,६२,३१५ क्वाचा किंमतीची झाली. मालावीचा व्यापारशेष हा बव्हंशी प्रतिकूलच असतो. १९८२ मध्ये साखरेची किंमत कमी झाल्यामुळे तर हे प्रमाण अधिकच वाढले.
ब्लँटायर येथे १९६५ मध्ये ‘रिझर्व्ह बँक ऑफ मालावी ’ची स्थापना झाली. नॅशनल बँक ऑफ मालावी व कमर्शियल बँक ऑफ मालावी या देशातील दोन प्रमुख व्यापारी बँका असून त्यांच्या शाखा देशात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट बँक ऑफ मालावी ही बँक मध्यम व दीर्घ मुदतींची कर्जे देते. देशात संघटित असा रोखे बाजार नाही. मूळ ब्रिटिश विमा कंपन्यांची मालकी वा हमी असलेल्या विमा कंपन्या मालवीत विमाव्यवसाय करतात. ‘राष्ट्रीय विमा कंपनी’ ही देशातील प्रमुख विमा कंपनी आहे. आयात कर, प्राप्तीकर, कंपन्यांच्या उत्पन्नावरील कर, शासकीय उपक्रम, उत्पादनशुल्क, परवानाकर, विक्रीकर यांपासून देशाला महसुली उत्पन्न मिळते. एकूण महसूल १,८७४ लक्ष क्वाचा असून एकूण सार्वजनिक खर्च ३,७०२ लक्ष क्वाचा होता (१९८१). १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष असते. केवळ मालावीमध्ये मिळविलेल्या उत्पन्नावरच कर आकारला जातो. कमाल करमर्यादा ५०% आहे. शेती व श्रमप्रधान उद्योगांतील परकीय गुंतवणुकीला शासन विशेष प्रोत्साहन देते. ग्रेट ब्रिटनने अशी गुंतवणूक मालावीत बरीच केली आहे. लीव्हर ब्रदर्स, पोर्टलंड सिमेंट व डेव्हीड व्हाइटहाउस ॲण्ड सन्स या ब्रिटिश उद्योगांचे मालावीत औद्योगिक प्रकल्प आहेत. देशाचे सार्वजनिक गुंतवणुकीचे त्रिवार्षिक नियोजन असून त्यामध्ये दरवर्षी गरजेप्रमाणे काही बदल केले जातात. विकास कार्यक्रमांसाठी बरीचशी परकीय मदत घेतली जाते.
क्वाचा हे येथील चलन असून शंभर तांबालांचा एक क्वाचा होतो. १, २, ५, १०, व २० तांबालांची नाणी आहेत. तर ५० तांबाला व १, ५, १०, २० क्वाचांच्या नोटा आहेत. १ स्टर्लिंग पौंड = १·८१४ क्वाचा, १ अमेरिकी डॉलर = १·५६५ क्वाचा किंवा १०० क्वाचा = ५५·१३ स्टर्लिंग पौंड = ६३·९० डॉलर असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८४). देशात दशमान पद्धत प्रचलित आहे.
वाहतूक व संदेशवहन : देशात १०,७७२ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी २,७४५ किमी. लांबीचे मुख्य रस्ते आहेत (१९८१). लीरांग्गा ते झोब्वे हा ७९ किमी. लांबीचा रस्ता बांधण्याची योजना आहे. लोहमार्गांची एकूण लांबी ७८५ किमी. आहे. सालीमा ते एम्चिंजी (लिलाँग्वेमार्ग) हा कॅनडाच्या मदतीने बांधलेला २२७ किमी. लांबीचा लोहमार्ग १९८० मध्ये पूर्ण झाला आहे. शेजारील देशांशी रस्ते व लोहमार्ग अशा दोन्ही मार्गांनी वाहतूक चालते. १९६५ पासून मालावीतील ब्लाँटायर हे हवाई वाहतुकीचे प्रमुख केंद्र बनले. लिलाँग्वे येथे कामूझू ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची बांधणी १९८१ मध्ये पूर्ण झाली असून नोव्हेंबर १९८३ पासून देशातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचे हेच मुख्य केंद्र बनले आहे. १९८१ मध्ये देशात १४,१०२ मोटारगाड्या, २६८ बसगाड्या, १३,५६१ मालवाहतूक गाड्या, ३,४१८ ट्रॅक्टर आणि ६,७२३ मोटारसायकली होत्या. न्यासा सरोवराचा जलवाहतुकीसाठी उपयोग होतो. देशात एकूण १०,६०,००० रेडिओ संच व १५,१३० दूरध्वनीसंच होते (१९८१). दूरचित्रवाणी सेवा अजून उपलब्ध नाही. रेडिओ कार्यक्रम इंग्रजी व चिचेवा भाषांतून प्रसारित केले जातात.
लोक व समाजजीवन : देशाच्या १९७७ च्या ५५,४७,४६० एवढ्या लोकसंख्येपैकी ५५,३२,२९८ आफ्रिकन, ६,३७७ यूरोपियन, ५,६८२ आशियाई व इतर ३,१०३ लोक होते. एकूण लोकसंख्येत ६५% ख्रिश्चन, १९% प्राचीन टोळीवाल्यांचे धर्म पालन करणारे व १६% मुस्लिमधर्मीय आहेत. दक्षिण भागात मुस्लिमांची संख्या जास्त आहे. मालावीतील लोक प्रामुख्याने वेगवेगळ्या बांटू गटांतील आहेत. त्यांपैकी निम्मे लोक चेवा व न्यांजा गटांतील असून एकोणिसाव्या शतकापूर्वी ते मालावी किंवा मारावी म्हणून ओळखले जात. १५% लोक लोम्वे किंवा आलोम्वे गटातील असून ते चिल्वा सरोवराच्या दक्षिण भागात राहतात. एन्गोनी व याओ लोक एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे आले असून त्यांची संख्या १५% आहे. उत्तर मालावीत तुंबुका, एन्काँडे व टाँगा, तर मध्य व दक्षिण मालावीत सेवा, एन्गोनी, याऊ, लोम्वे व मॉगाँजा जमातींच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. यूरोपियनांत प्रामुख्याने ब्रिटिश अधिक आहेत. तसेच काही पोर्तुगीज व आशियाई (प्रामुख्याने भारतीय) लोकही आहेत. आशियाई लोकांपैकी ५०% मुस्लिम व २५% हिंदू आहेत. लोकसंख्येचा घनतेचा १९८३ चा अंदाज दर चौ. किंमी. स ५४·३ असून आफ्रिकेतील ही सर्वाधिक घनता समजली जाते. देशात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. वार्षिक सरासरी जन्मप्रमाण दर हजारी ४८·३ व मृत्युप्रमाण दर हजारी २५ होते (१९७७). सु. ९०% लोकसंख्या ग्रामीण आहे. नोकरी-धंद्यांच्या शोधार्थ मालावीतील अनेक लोकांनी आफ्रिकेतील इतर देशांत स्थलांतर केलेले आहे. स्थलांतरितांची निश्चित संख्या सांगता येत नसली, तरी दरवर्षी मालावीमधील ८५,००० लोक नोकरी-धद्यांच्या शोधार्थ मालावी देश सोडून जातात. देशाच्या दक्षिण भागात मोझँबीकमधून आलेल्या लोकांचे प्रमाण बरेच आहे, पण त्यांची निश्चित संख्या उपलब्ध नाही. ग्रामीण भागातून नागरी भागाकडे होणारे स्थलांतरही बरेच आहे. १९७५ पर्यंत दक्षिण भागातील झाँबा हे राजधानीचे ठिकाण होते. त्यानंतर मध्यवर्ती भागातील लिलाँग्वे येथे राजधानी हलविण्यात आली. त्यामुळेच लिलाँग्वेची १९६६ मधील २०,००० लोकसंख्या अवघ्या १० वर्षात ९८,७१८ पर्यंत पोहोचली. १४ मे (कामुझू डे-राष्ट्राध्यक्ष बांडा यांचा वाढदिवस), ६ जुलै (प्रजासत्ताक दिन), ६ ऑगस्ट (बँक हॉलिडे), १७ ऑक्टोबर (मदर्स डे), २५ व २६ डिसेंबर (नाताळ व बॉक्सिंग डे) हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असतात.
शासनाचे कामगार व समाजकल्याण खाते देशाच्या सामाजिक विकासास जबाबदार असते. सरासरी प्रसूतिमान ७ (१९७०) हे जास्त असूनही कुटुंबनियोजन उपायांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ स्त्रीचे प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गर्भपातालाच कायद्याने मान्यता आहे. कामगारांची निर्यात म्हणजे राष्ट्रीय महसुलाचे प्रमुख साधन, या शासनाच्या दृष्टिकोनामुळेच कुटुंबनियोजन कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यसेवा अत्यंत मर्यादीत प्रमाणावर उपलब्ध असून त्या आफ्रिकी लोकांना मोफत पुरविल्या जातात. मलेरिया, क्षयरोग, जंत, पीतज्वर, अपपोषण यांमुळे सार्वजनिक आरोग्याला वारंवार धोके उद्भवतात. सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ४४·४ वर्षे व स्त्रियांच्या बाबतीत ४७·६ वर्षे होते (१९७५–८०). बाल मृत्यूप्रमाण दर हजारी १७२ असून पूर्व आफ्रिकेतील हे प्रमाण सर्वाधिक होते (१९८०). देशात ४,१२२ आरोग्य संस्था, त्यांपैकी ४७ रूग्णालये, ११,३७६ खाटा (१९८०), १२१ डॉक्टर व ६,००० वैद्यकीय कर्मचारी होते (१९८१).
देशात अनेक प्रकारच्या बांटू भाषा व बोलीभाषा बोलल्या जातात. चिचेवा (चिन्यांजा) ही चेवा व न्याजा लोकांची भाषा असून तीच राष्ट्रभाषा आहे. लोम्वे, याऊ व तुंबुका लोकांच्या अनुक्रमे चिलोम्वे, चियाऊ व चितुंबुका या स्वतंत्र भाषा आहेत. इंग्रजी ही शिक्षणाची राजभाषा आहे. डेली टाइम्स हे इंग्रजी दैनिक ब्लँटायर येथून प्रसिद्ध होते (खप १२,८००–१९८१) मालावी न्यूज हे इंग्रजी व चिचेवा या दोन भाषांतून लींबे येथून दर रविवारी प्रसिद्ध होते.(खप १८,५००). वृत्तपत्र प्रसिद्धीवर शासनाचे कडक निर्बंध आहेत.
सर्व शिक्षण व्यवस्था (मिशनच्या शाळांसह) मंत्रालयाच्या शिक्षणविभागाच्या नियंत्रणाखाली आहे. शिक्षण सक्तीचे नाही. फारच थोड्या मालावी लोकांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होते. ६ ते १३ वर्षे वयोगटातील ४३% मुले प्राथमिक शिक्षण घेत असून ४८% पुरुष व २५% स्त्रिया साक्षर आहेत. देशातील एकूण २,३४० प्राथमिक शाळांत ८,०९,८६२ विद्यार्थी आणि १२,५४० शिक्षक, माध्यमिक शाळांत १८,००६ विद्यार्थी व ८३४ शिक्षक, शिक्षक प्रशिक्षण संस्थांमध्ये १,७५४ विद्यार्थी व १०८ शिक्षक, तांत्रिक शाळांत ६४७ विद्यार्थी व ३४ शिक्षक आणि विद्यापीठीय शिक्षणात १,७२३ विद्यार्थी व १७३ शिक्षक होते (१९८०). १९६५ मध्ये मालावी विद्यापीठाची झाँबा येथे स्थापना झाली असून तिच्याशी संलग्न अशी चार महाविद्यालये आहेत.
मालावी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना १९६८ मध्ये झाली असून त्यात १,३०,००० ग्रंथसंख्या आहे. मालावी विद्यापीठाच्या ग्रंथालयात २,००,००० ग्रंथ आहेत. लिलाँग्वे येथे अ. सं. सं. च्या माहिती अभिकरणाची, तर ब्रिटिश कौन्सिलची लिलाँग्वे व ब्लँटायर येथे ग्रंथालये आहेत. झाँबा येथे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. ब्लँटायर येथे मालावी वस्तुसंग्रहालय असून त्यात पुरातत्वशास्त्र, ऐतिहासिक व शिल्पकलाविषयक वस्तूंचा संग्रह आहे.
महत्वाची स्थळे : ब्लँटायर (लोकसंख्या २,१९,०११–१९७७) देशातील सर्वांत प्रमुख नागरी व व्यापारी केंद्र आहे. त्याशिवाय झाँबा (२४,२३४) हे जुन्या राजधानीचे ठिकाण, लिलाँग्वे हे सांप्रतच्या राजधानीचे ठिकाण व एम्झुझू (१६,१०८) ही प्रमुख नागरी केंद्रे आहेत. बड्या शिकारीचा प्रदेश, आकर्षक सृष्टीसौंदर्य, उत्साहवर्धक हवामान यांमुळे पर्यटन व्यवसायाला विशेष महत्त्व असून परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा देशातील चौथ्या क्रमांकाचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. न्यासा सरोवर हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून सरोवराकाठी पर्यटकांसाठी हॉटेले व मनोरंजनाच्या भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. न्यासा सरोवरकाठावरून आठ दिवसांच्या सहलीही आयोजित केल्या जातात. याशिवाय मौंट मुलांजे व मौंट झाँबा हीसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे आहेत. १९८१ मध्ये ५७,५०३ पर्यटकांनी मालावीला भेट दिली. १९८० मध्ये पर्यटकांपासून देशाला ६० लक्ष डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. १९८२ मध्ये पर्यटन महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रकुल देशांतील लोकांना मालावीत येण्याला प्रवेशपत्राची आवश्यकता नसते.
चौधरी, वसंत
“