मालार्मे, स्तेफान : (१८ मार्च १८४२–९ सप्टेंबर १८९८). श्रेष्ठ फ्रेंच कवी फ्रेंच कवितेतील प्रतीकवादी संप्रदायाचा नेता. जन्म पॅरिस शहरी. इंग्रजी भाषेत त्याला विशेष रस असल्यामुळे त्याने फ्रान्सप्रमाणेच इंग्लंडमध्येही शिक्षण घेतले. लंडन येथे राहून इंग्रजीच्या अध्यापनाची पात्रता प्राप्त करून घेतल्यानंतर तो फ्रान्सला परतला आणि तेथील विविध शाळांतून त्याने इंग्रजी शिकविले.

लाप्रॅमिदी  दँ फोन (१८७६, इं. शी. आफ्टरनून ऑफ अ ऑन) ही मालार्मेची सर्वश्रेष्ठ काव्यकृती. विख्यात फ्रेंच संगीतरचनाकार आशील-क्लोद दब्यूसी हा ह्या काव्यकृतीचे अत्यंत प्रभावित झाला होता. मालार्मेच्या एकूण काव्यरचनेत सु. ६० सुनीते व लघुकाव्ये, ‘एरोदियाद’ सारखे नाट्यकाव्य, उपर्युक्त ‘लाप्रॅमिदी…’ ही काव्यकृती ह्यांचा समावेश आहे. काही गद्यकाव्ये त्याने लिहिली तसेच शैली व सौंदर्यशास्त्र ह्या विषयांवरही लिहिले. पोएझी (१८८७, इं. शी. पोएम्स) हा त्याच्या कवितांचा संग्रह.

कवितेने वर्णन करण्यापेक्षा सूचन करावे कवी जेव्हा शब्दांचा वापर करतो, तेव्हा दैनंदिन जीवनातील त्यांच्या अर्थाच्या पलीकडे जाणारा, एक आवाहक आशय त्यांना प्राप्त होतो. अशी मालार्मेची श्रद्धा होती. कविता आणि संगीत ही विशुद्ध कल्पनेचीच (आयडीआ) पर्यायी अंगे होत, असेही तो मानत होता. कवी हा आधीच अस्तित्वात असलेल्या वास्तवतेला कवितेचा घाट बहाल करणारा केवळ शब्दजुळव्या नव्हे, तर शुन्यातून आदर्श सौंदर्याची निर्मिती करणारा परमेश्वर होय, ही त्याची धारणा होती. ह्या आदर्श सौंदर्याची प्रचीती देण्यासाठी आपल्या कवीतेतून त्याने प्रतीकांचा आणि रूपकांचा मार्मिकपणे वापर केला. भाषेच्या सूक्ष्म आणि संकुल अशा वापरासाठी तिच्या अंतःशक्तींचा शोध घेतला. कवी म्हणून त्याचे व्यक्तीमत्त्व त्याच्या हयातीत प्रभावी ठरलेच परंतु त्याच्या नंतरच्या कवींवर असलेला त्याचा प्रभावही लक्षणीय आहे. पॅरिस येथे असलेले त्याचे घर हे सखोल, तात्विक काव्यचर्चेचे एक केंद्रच बनले होते. त्याने काही गद्यलेखनही केले ते ‘व्हॅर ए प्रोझ’ (१८९३) ह्या नावाने संगृहीत आहे. १९४५ साली त्याच्या समग्र गद्यपद्यलेखनाचा संग्रह प्रसिद्ध झाला. व्हॉल्व्हिन्स येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Bowie, Malcolm, Mallarme and thr Art of Being Difficult, 1978.

           2. Gill, Austin, The Early Mallarme : Volume l. Parentage, Early Years and Juvenalia, 1980.

           3. Michaud, Guy, Mallarme, 1971. Eng. Trans., 1965.

कुलकर्णी, अ. र.