मालाबो : पश्चिम आफ्रिकेतील विषुववृत्तीय गिनी या देशाची राजधानी. लोकसंख्या ३७,००० (१९८२ अंदाज). गिनीच्या आखातातील बिओको या बेटाच्या उत्तर टोकाशी हे वसलेले आहे. हे देशातील प्रमुख बंदर तसेच व्यापारी व आर्थिक केंद्र आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून त्याद्वारे रीओ मूनी प्रांतातील बाटा या शहराशी तसेच द. आफ्रिकेतील देशांशी हवाई वाहतूक चालते.

गुलामांच्या व्यापाराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी १८२७ मध्ये मालाबो वसविले व त्यास ‘पोर्ट क्लॅरेन्स’ किंवा ‘क्लॅरेन्सटाउन’ असे नाव दिले. १८४४ मध्ये स्पॅनिशांनी त्यावर ताबा मिळविला व त्याचे ‘सांता इझाबेल’ असे नाव ठेवले. १९६८ मध्ये विषुववृत्तीय गिनीला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९७३ मध्ये सांता इझाबेलला सांप्रतचे नाव देण्यात आले. मालाबो बंदरातून काकाओ – बिया, केळी, कॉफी, पाम तेल इत्यादींची निर्यात होते. मासेमारी व मत्स्यप्रक्रिया हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. येथे रोमन कॅथलिक कॅथीड्रल आहे.

गाडे, ना. स.