सान रेमो : इटलीतील एक बंदर आणि प्रसिद्घ हवेशीर ठिकाण. लोकसंख्या ५६,८६४ (२००९अंदाज). इटलीच्या वायव्य भागातील लिग्यूरिया प्रदेशामधील इंपेऱ्या प्रांतात हे नगर आहे. भूमध्य समुद्रातील लिग्यूरियन समुद्रकिनाऱ्यावर हे वसले असून व्हेन्टिमील्या शहराच्या पूर्वेस १६ किमी. तर इंपेऱ्या बंदराच्या नैर्ऋतेस १९ किमी. वर त्याचे स्थान आहे. भूमध्य सामुद्रिक हवामानामुळे हौशी प्रवाशांचे आकर्षण ठरलेल्या रिव्हिएरा या प्रसिद्घ किनारी प्रदेशात हे वसले असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.मध्ययुगाच्या प्रारंभीच्या काळात शेजारील राज्ये व लष्करी राजवटींनी सान रेमो आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले होते. चौदाव्या शतकात जेनोआ राजवट प्रभावशाली बनल्यानंतर सान रेमोला स्वायत्तता दिली गेली. १७५४ मध्ये स्थानिक कायदेंडळ बरखास्त होईपर्यंत ही स्वायत्तता राहिली. १८६१ पासून बारमाही आरोग्यधाम म्हणून याचे महत्त्व वाढले. जर्मनीचा राजा तिसरा फ्रेडेरिक हा १८८७-८८ दरम्यान येथे राहिला होता.

पहिल्या महायुद्घानंतर १९–२६ एप्रिल १९२० दरम्यान ऑटोमन तुर्की साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेल्या युद्घपूर्व काळातील भूप्रदेशाचे भवितव्य ठरविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषद येथे भरली होती. तीत ग्रेट बिटन, फान्स व इटली यांचे पंतप्रधान आणि जपान, गीस व बेल्जियम या देशांचे राजप्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत तुर्कस्तानबरोबरच्या शांतता तहाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. त्यावर पुढे १० ऑगस्ट १९२० रोजी सेव्हर येथे चर्चा होऊन सेव्हर शांतता तहात या चर्चेची परिणती झाली.

अकराव्या-बाराव्या शतकांतील जुने सान रेमो नगर मॅरिटाइम आल्प्स पर्वतपायथ्याच्या डोंगर उतारावर वसले असून त्यात जुनी घरे व तीव्र उताराचे अरुंद रस्ते आहेत. या भागातील प्राचीन वास्तूंत सॅन सिरो याचे बाराव्या शतकातील रोमन वास्तुशिल्पशैलीत बांधलेले कॅथीड्रल आणि मॅडोना देल्ल कोस्टाचे ( पंधरावे-सतरावे शतक) प्रार्थनास्थळ आहे. नवीन नगराची वसाहत प्रामुख्याने किनाऱ्यालगत झाली असून तीत टुमदार बंगले, उद्याने, खाजगी उद्यानगृहे, उपाहारगृहे, जुगारगृहे आणि निसर्गरम्य विहार आहेत. या छोट्या बंदरात १,२०० मी. लांबीचा धक्का बांधलेला असून सान्ता तेक्ला किल्ल्याच्या तो दृष्टिपथात येतो. परिसरात ऑलिव्ह, लिंबू इ. जातींची फळे, फुले व भाजीपाल्याच्या बागा असून त्यांचा मोठा व्यापार येथे चालतो. फुलांची देशातील मोठी बाजारपेठ येथे असून त्यांची निर्यात केली जाते. वाईन व ऑलिव्ह तेल उत्पादनासाठी हे नगर महत्त्वाचे आहे. तसेच येथे लोह खनिजावर प्रकिया करून त्याची निर्यात यूरोपभर केली जाते. बारमाही आल्हाददायक हवामान आणि पर्यटकांसाठी उपलब्ध विविध सुविधा, यांमुळे पर्यटकांचे हे प्रमुख आकर्षण स्थळ बनले आहे.

देशपांडे, सु. र.