ॲल्फ्रेड मार्शलमार्शल, ॲल्फ्रेड : (२६ जुलै १८४२–२३ जुलै १९२४). जगप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्राज्ञ. अर्थशास्त्रामधील नवसनातनवादाचा महत्त्वाचा पुरस्कर्ता. त्याचा जन्म लंडनच्या क्लॅपम या उपनगरात झाला. त्याचे वडील बँक ऑफ इंग्लंडमध्ये रोखपाल म्हणून काम करीत होते. वयाच्या नवव्या वर्षी ॲल्फ्रेड मर्चंट टेलर्स स्कूलमध्ये दाखल झाला. त्याला गणितात गती होती. आवडत्या विषयाचा अधिक अभ्यास करावयास मिळावा म्हणून एकोणिसाव्या वर्षी त्याने केंब्रिजच्या सेंट जॉन्स महाविद्यालयात प्रवेश मिळविला. गणितात उच्च प्रावीण्य संपादून तो पदवीधर झाला. ट्रायपॉस परीक्षेतील तो दुसरा रँग्लर होता. प्रारंभी क्लिफ्टन येथे व त्यानंतर केंब्रिजमध्ये तो गणित विषयाचे अध्यापन करू लागला. तेथे त्याचा प्रख्यात तत्त्ववेत्ता हेन्री सिज्‌विक (१८३८–१९००) याच्याशी संबंध आला आणि मुख्यतः त्याच्या आग्रहामुळे तो कांट आणि हेगेल यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू लागला. स्पेन्सर, मिल, टॉयन्बी, कूर्नो, बेंथॅम यांच्या ग्रंथांच्या वाचनाचा व त्यांच्या विचारसरणीचा मार्शलवर खोल परिणाम झाला. गणितज्ञ असूनही अर्थशास्त्राने त्याला झपाटून टाकले, मात्र अर्थशास्त्राची ओळख त्याला तत्त्वज्ञान आणि नीतिशास्त्र या विषयांद्वारे झाल्यामुळे त्याच्या अर्थशास्त्रविषयक दृष्टिकोनावर त्या विषयांचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

केंब्रिजमध्ये अधिछात्रवृत्ती मिळत असताना १८७७ साली त्याने आपली विद्यार्थिनी मेरी पॅले हिच्याशी विवाह केला. केवळ अविवाहितांसाठी असलेली ही अधिछात्रवृत्ती त्याला विवाहानंतर सोडून द्यावी लागली. त्यानंतर ब्रिस्टल येथील युनिव्हर्सिटी कॉलेजचा पहिला प्राचार्य म्हणून त्याने १८८१ पर्यंत काम पाहिले. प्रशासकीय कामाच्या ताणांचा त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्याने त्याने या पदाचा राजीनामा दिला व तो एक वर्षभर विश्रांतीसाठी इटलीत जाऊन राहिला. त्यानंतर तो ऑक्सफर्डच्या बॅल्यल महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचा (पोलिटिकल इकॉनॉमी) व्याख्याता म्हणून रुजू झाला. १८८५ मध्ये तो पुन्हा केंब्रिजला आला आणि अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करू लागला. १९०८ मध्ये निवृत्त होईपर्यंत तो त्या जागेवर होता. अखेरपर्यंत त्याने केंब्रिजशी संबंध ठेवला होता. मार्शलने अर्थशास्त्रामधील केंब्रिज संप्रदायाची (केंब्रिज स्कूल) प्रस्थापना केली. १९०२ पासून रॉयल इकॉनॉमिक्स सोसायटी (पूर्वीचे ब्रिटिश इकॉनॉमिक्स असोसिएशन, स्था. १८९०) ही संस्था आणि इकॉनॉमिक जर्नल हे मासिक या दोहोंची स्थापना त्याच्या पुढाकारामुळेच झाली.

तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि सभोवतालचे दारिद्र्य पाहून मार्शल व्यथित होत असे. दारिद्र्य हे अनेक सामाजिक दुरवस्थांच्या मुळाशी आहे, याची त्याला जाणीव झाली. दारिद्र्याच्या कारणांचा शोध म्हणजे मानवजातीच्या अधःपतनाचे विश्लेषणच होय, असे त्याने ठामपणे म्हटले आहे. मार्शलने अर्थशास्त्राच्या अभ्यासात विशेष रस घेतला, तो या जाणिवेमुळेच होय. अर्थशास्त्राची व्याख्या करताना, एका बाजूला अर्थशास्त्र संपत्तीचा अभ्यास करते, तर दुसऱ्या बाजूला मानव आणि त्याचे कल्याण अर्थशास्त्राला महत्त्वाचे वाटते, असे तो म्हणतो, तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्त्वामधील मानवहितवाद प्रकर्षाने ध्यानात येतो.

 मार्शलने अर्थशास्त्र विषयाला केलेले योगदान फार मोठे आहे. मार्शलचा उदय होण्यापूर्वी अर्थशास्त्र हे राज्यशास्त्राची एक शाखा समजले जाई. सनातनवादी अर्थशास्त्राला ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ म्हणत. मार्शल आपल्या द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात अर्थशास्त्राचे वाढते महत्त्व ओळखून त्या शास्त्राला स्वतंत्र स्थान दिले आणि ‘इकॉनॉमिक्स’ हा शब्द प्रथमच योजिला. अर्थशास्त्राचा मानवी स्वभावातील तरल व सतत बदलत्या प्रवृत्तींशी संबंध आहे आपले भौतिक कल्याण साधण्यासाठी मनुष्यप्राणी समाजाचा एक भाग म्हणून जी धडपड करतो त्या धडपडीचा अर्थशास्त्र अभ्यास करते, असे विचार मार्शलने मांडले. ज्या मानवी व्यवहारांचे पैशाच्या फूटपट्टीने मोजमाप करता येते त्याच व्यवहारांत अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना स्वारस्य असते, असे मार्शल म्हणतो. अर्थशास्त्र हे शास्त्र आहे, पण ते केवळ सैद्धांतिक शास्त्र म्हणून राहता कामा नये, दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घातली गेली पाहिजे यांवर त्याने भर दिला. सारांश, अर्थशास्त्र हे प्रत्यक्षानुसारी, तसेच आदर्शानुसारी शास्त्र आहे, असे मार्शलचे मत होते.


मार्शलचे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री (१८७९) (सहलेखिका : मेरी पॅले), प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१८९०), इंडस्ट्री अँड ट्रेड (१९१९) आणि मनी, क्रेडिट अँड कॉमर्स (१९२४) हे होत. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मार्शलने अर्थशास्त्रामधील अनेक विषयांवर विस्ताराने लिहिले आहे. त्याने उपभोगाला अर्थशास्त्रात महत्त्वाचे स्थान दिले. मानवी गरजा या सर्व आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी आहेत उपभोग हा आर्थिक व्यवहारांचा प्रारंभ तसाच अंतही आहे, हे त्याने प्रथमच ठामपणे सांगितले. मानवी गरजा, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांची विभागणी यांचा त्याने विस्तृत परामर्श घेतला आहे.⇨ उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही नवी कल्पना त्याने मांडली. एखादी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूसाठी उपभोक्ता अधिक पैसे खर्च करायला तयार असेल आणि त्याला ती वस्तू कमी किंमतीत मिळत असेल, तर त्या दोन्हींमधील फरक म्हणजे उपभोक्त्याला मिळणारे अतिरिक्त समाधान म्हणजेच उपभोक्त्याचे संतोषाधिक्य होय. एकूण उपयोगिता आणि सीमान्त उपयोगिता यांवर आधारलेली ही संकल्पना फारशी व्यवहारोपयोगी नसली, तरी उपभोगविषयक अनेक समस्यांना चालना देणारी म्हणूनच उपयुक्त ठरते. तथापि, उपभोग आणि मागणी यांचा विचार करताना मार्शलने मांडलेली ‘लवचिकतेची कल्पना’ अर्थशास्त्रात अतिशय महत्त्वाची मानली जाते. वस्तूच्या किंमतीत होणाऱ्या बदलचा मागणीवर होणारा परिणाम ‘लवचिकते’ च्या साहाय्याने मोजता येतो. काही वस्तूंच्या बाबतीत किंमतींत होणारा थोडासा बदल मागणीत मोठा बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतो, तर काही वस्तूंच्या किंमतीत मोठे बदल घडून आले, तरी त्यांचा मागणीवर ठळक परिणाम दिसून येत नाही. लवचिकतेची कल्पना अर्थशास्त्रात इतकी अर्थपूर्ण मानली जाते की, वस्तूंचे व उत्पादक घटकांचे मूल्यविषयक सिद्धांत लवचिकतेच्या कल्पनेशिवाय मांडताच येणार नाहीत, असे केन्सने स्पष्टपणे म्हटले आहे. ‘लवचिकतेच्या कल्पनेचा शोध लावून मार्शलने संशोधनाचे मोठे क्षेत्र उघडून देऊन अर्थशास्त्रज्ञांची मोठीच सेवा केली आहे’, असे केन्स म्हणतो.

मार्शलच्या मते भूमी आणि श्रम हे उत्पादनाचे दोन महत्त्वाचे घटक होत. संघटन हे श्रमाचा एक भाग असून भांडवल म्हणजे भौतिक वस्तूंच्या उत्पादनासाठी साठा करून ठेवलेली तरतूद, असे म्हणता येईल. उत्पादनकार्यात निसर्ग महत्त्वाची कामगिरी बजावतो श्रमिकाची शारीरिक व बौद्धिक वाढसुद्धा भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे मार्शलचे प्रतिपादन होते. उत्पादनक्षेत्रात मार्शलने श्रमविभाजनाचे महत्त्व जाणले होते. श्रमविभाजन व यंत्राचा वापर परस्परावलंबी असून श्रमिकांचे कौशल्य आणि यंत्रसामग्री यांचा जास्तीतजास्त उपयोग करून घेण्यासाठी श्रमविभाजनाचा अवलंब करणे हितावह ठरते मात्र वस्तूंना असलेली मागणी आणि बाजाराची व्याप्ती वाढल्याशिवाय श्रमविभाजन फायदेशीर ठरणार नाही, हे मार्शलने स्पष्ट केले आहे.

उत्पादनक्षेत्रातील मूलभूत सिद्धांत ‘घटत्या उत्पादनफलाचा नियम’ रिकार्डोने मार्शलपूर्वीच उल्लेखिला असला, तरी त्या नियमाला मार्शलने तपशीलवार स्वरुप दिले. कृषिव्यवसायात सुधारणा झालेली नसताना जर भांडवल व श्रम यांचे प्रमाण भूमी कसताना वाढविण्यात आले, तर मिळणारे उत्पादन सर्वसाधारणपणे घटत्या प्रमाणात वाढत राहते, अशी व्याख्या मार्शलने केली. लागवडीच्या पद्धतीत सुधारणा झाली, तर उत्पादनाचे प्रमाण वाढते राहील हे खरे, परंतु ही वाढ तात्पुरत्या स्वरुपाची असते, असे तो म्हणतो. हा सिद्धांत मच्छीमारी व खाणकाम यांनाही लागू आहे. मार्शलने हा सिद्धांत कृषिव्यवसायाशी निगडित केला असला, तरी तो उत्पादनाच्या अन्य क्षेत्रांसही लागू होतो, असे आज सिद्ध झाले आहे.

अर्थशास्त्रात ‘प्रातिनिधिक उत्पादनसंस्था’ (रेप्रेझेंटेटिव्ह फर्म) ही कल्पना सर्वप्रथम मार्शलने उपयोगात आणली. बहिर्गत आणि अंतर्गत बचतींचा फायदा घेणारी, दीर्घकाळ अस्तित्वात असणारी, उत्पादनक्षेत्रात सर्वसाधारण यश मिळविणारी आदर्श उत्पादनसंस्था म्हणजे, प्रातिनिधिक उत्पादनसंस्था होय.


मार्शलने मूल्यनिर्धारण क्षेत्रात केलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. किंबहुना अर्थव्यवस्थेमधील अनेक भागांच्या परस्परसंबंधांचा शोध घेताना मागणी, पुरवठा व मूल्यनिर्धारण यांचे त्याने मोठ्या उत्साहाने विवरण केल्याचे आढळून येते. मागणीचा विचार करताना त्याने उपयोगिता, सीमान्त उपयोगिता, घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धांत या प्रस्थापित संकल्पनांचा वापर केला आणि पुरवठ्याचे पृथक्करण करताना उत्पादनफलांचे नियम, श्रमविभाजन, उत्पादनक्षेत्रातील संघटनकौशल्य यांचा उपयोग केला. प्रस्थापित संकल्पनांच्या आधाराने त्याने मागणी व पुरवठा यांमधील आपला संतुलन सिद्धांत मांडला. मार्शलपूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूचे मूल्य निश्चित करताना मागणी व पुरवठा ह्या दोहोंचे महत्त्व ओळखले असले, तरी ऑस्ट्रियन संप्रदायाच्या विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झ (१८३५–८२), कार्ल मेंगर (१८४०–१९२१), लेआँ व्हालरा (१८३४–१९१०) व जॉन बेट्‌स क्लार्क (१८४७–१९३८) या अर्थशास्त्रज्ञांनी कोणत्याही वस्तूचे मूल्य तिच्या सीमान्त उपयोगितेमुळेच निश्चित होते, असे मत मांडून मूल्यनिर्धारणात मागणीला अधिक महत्त्व दिले. याउलट जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–७३) , ॲडम स्मिथ (१७२३–९०) , डेव्हिड रिकार्डो (१७७२–१८२३) या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी वस्तूच्या पुरवठ्यावर अधिक भर दिला आणि वस्तूचे मूल्य उत्पादन परिव्ययाइतके असते, असे प्रतिपादन केले. मार्शलने वस्तूचे मूल्य निश्चित करताना वस्तूची सीमान्त उपयोगिता व उत्पादन परिव्यय यांची सांगड घातली मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंना सारखेच महत्त्व दिले. मागणी व पुरवठा ही कात्रीच्या दोन पात्यांप्रमाणे असतात दोन्ही पात्यांचा उपयोग केला, तरच कागद वा कापड कापता येते. मागणी व पुरवठा यांपैकी कोणते पाते अधिक प्रभावी असते, ते कालावधीवर ठरते. मूल्यनिर्धारणात मार्शलने कालावधीला महत्त्वाचे स्थान दिले. अतिअल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ आणि अतिदीर्घकाळ अशी कालविभागणी करून अल्पकाळात वस्तूच्या मूल्यावर मागणीचा विशेष प्रभाव पडतो, तर दीर्घकाळात मूल्यावर वस्तूच्या पुरवठ्याचा अधिक परिणाम होत असतो, असे निष्कर्ष मार्शलने काढले. दीर्घकाळात वस्तूच्या मूल्याची प्रवृत्ती उत्पादनव्ययाबरोबर होण्याची असते. अतिअल्पकाळात निर्धारित होणाऱ्या मूल्यास मार्शल ‘विपणी किंमत’ (मार्केट प्राइस) म्हणतो व दीर्घकाळातील किंमतीस ‘सामान्य किंमत’ (नॉर्मल प्राइस) असे नाव देतो.

मार्शलची ‘प्रतिरूप खंड’(‘खंडनिभ’ – क्वेसि-रेंट) ही संकल्पना आता सर्वमान्य झाली आहे. रिकार्डोने खंड ही कल्पना भूमीशी निगडित केली. भूमीच्या उपजत व टिकाऊ स्वरूपाच्या गुणांच्या वापराबद्दल भूमी मालकाला खंड द्यावा लागतो आणि खंड हा जमिनीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचाच एक भाग असतो, असे रिकार्डोने खंड सिद्धांत मांडताना म्हटले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चार उत्पादन घटकांत वितरण करताना भूमी हा घटक श्रमिक, भांडवल व संयोजक यांहून निराळा आहे, भूमी ह्या निसर्गनिर्मित घटकाचा पुरवठा अल्प व दीर्घ अशा दोन्ही काळांत मर्यादित असतो त्यामुळे भूमीच्या मोबदल्याचा विचार करताना वेगळा दृष्टिकोण आवश्यक आहे, असे रिकार्डोचे मत होते. मार्शलच्या मते मानवनिर्मित उत्पादन घटकांचा पुरवठा अल्पकाळात स्थिर असू शकतो. अल्पकाळात काही कारणांमुळे या घटकांच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्यास त्यांचा पुरवठा तात्काळ वाढविणे शक्य न झाल्यामुळे त्या घटकांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. अल्पकाळात मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचे स्वरूप खंडासारखे असते, म्हणून मार्शल त्यास ‘आभासी वा प्रतिरूप खंड’ म्हणतो. दीर्घकाळात या घटकांचा पुरवठा वाढविणे शक्य असते. तसे झाले म्हणजे हे अतिरिक्त उत्पन्न नाहीसे होते व उत्पादन घटकांना त्यांचे सर्वसामान्य उत्पन्न मिळू लागते. भूमीचा पुरवठा नेहमीच स्थिर असल्यामुळे तिला अल्पकाळात व दीर्घकाळात खंड मिळत राहतो. मार्शलची प्रतिरूप खंडाची कल्पना मानवनिर्मित उत्पादन घटकांशीच निगडित आहे.

 मार्शलने संपत्तीची अर्थशास्त्रावरील पकड कमी करून ते मानवी कल्याणाभिमुख बनविले. मार्शलमधील हा मानवतावाद त्याने कामगाराची कार्यक्षमता आणि सवड (फुरसत) यांची जी सांगड घातली आहे, तीत प्रकर्षाने दिसून येतो. कामगारांना भरपूर विश्रांती मिळाली म्हणजे शिक्षण, क्रीडा व अन्य क्षेत्रांत प्रावीण्य मिळविणे त्यांना शक्य होईल आणि त्यांच्यामधील उपजत गुणांचा विकास करण्यास संधी प्राप्त होईल. यासाठी कामगारांचे कामाचे तास कमी करावेत परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार कमी झाला तरी प्रत्यवाय नाही, असे ठामपणे मार्शलने म्हटले आहे. कामगार संघटनांचे कामगारांच्या वेतनांवर जे अनुकूल परिणाम होतात, त्यांचीही मार्शलने दखल घेतल्याचे दिसून येते.


मार्शलने अर्थशास्त्रात कोणतीही नवीन तत्त्वे न सांगता अर्थशास्त्राची निव्वळ पुनर्रचना करून त्याला सुसंबद्ध रूप दिले, असे काही टीकाकारांनी म्हटले आहे. अर्थशास्त्रांच्या सुसंबद्ध मांडणीचे श्रेय मार्शलकडे जातेच. पण त्याने अर्थशास्त्रात अनेक नव्या संकल्पनांची भर घातली हे सर्वज्ञात आहे. लवचिकता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, मूल्यनिर्धारणात कालावधीचे महत्त्व, प्रतिरूप खंड यांसारख्या त्याच्या संकल्पना अर्थशास्त्रातील सैद्धांतिक विकासाला कारणीभूत ठरल्या. सीमान्त उपयोगितेची कल्पना त्याने तपशीलवार मांडली. पैशाचे मूल्य अन्य वस्तूंप्रमाणे मागणी व पुरवठा यांवर ठरते आणि पैशाची मागणी प्रामुख्याने मूल्यसंचयासाठी केली जाते, हा ‘द्रव्यराशी सिद्धांता’ चा ‘रोकड शिल्लक दृष्टिकोण’ मार्शलने व अन्य केंब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. तो वादग्रस्त ठरला असला, तरी त्याचे चलननीतिविषयक मूलगामी विचार त्याच्या चिकित्सक दृष्टीचा प्रत्यय आणून देतात. मार्शलच्या विचारांचा पगडा तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांवर होताच पुढील पिढीतील यूरोपीय आणि अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांवरही त्याचा प्रभाव पडलेला जाणवतो. आर्थर सेसिल पिगू (१८७७–१९५९), जॉन मेनार्ड केन्स (१८८३–१९४६), सिडनी जॉन चॅपमन (१८४७–१९३८), जॉन रिचर्ड हिक्स (१९०४– ) या महान अर्थशास्त्रज्ञांची शिष्यपरंपरा त्याने निर्माण केली. अर्थशास्त्रातील नवसनातनवाद त्याने प्रस्थापित केला. स्वतः गणितात पारंगत असूनही अर्थशास्त्रांत गणिताचा उपयोग त्याने अभावानेच केला. प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सिद्धांतांना गणितीय रूप देताना त्याने तळटीपा आणि परिशिष्टे यांचा आश्रय घेतलेला आहे. असे असले, तरी योझेफ आलोईस शुंपेटर (१८८३–१९५०) या अर्थशास्त्रज्ञाने आधुनिक अर्थमितीच्या उगमास मार्शलने मोठा हातभार लावला, असे गौरवाने म्हटले आहे. केन्स आपल्या गुरूला ‘ आधुनिक आकृतिबद्ध अर्थशास्त्राचा प्रणेता’ हे अभिधान देतो. खोल पाहू जाता ‘केन्सप्रणीत क्रांती’ मार्शलची परंपरा बाजूस सारत नाही, त्या परंपरेचे ते विस्तारित रूप आहे, असे मत आधुनिक विचारवंतांनी व्यक्त केले आहे.

पहा : केन्स, जॉन मेनार्ड खंड-२ मूल्यनिर्धारण सिद्धांत रिकार्डो, डेव्हिड.

संदर्भ : 1. Keynes, John Maynard, Essays In Biography, London, 1963.

              2. Pigou, A. C. Alfred Marshall and Current Thought, London, 1953.

              3. Roll, Eric, A History of Economic Thought, London, 1953.

              4. Schumpeter, S. A. Ten Great Economists, London, 1956.

भेण्डे, सुभाष