खबरदार, अरदेशर फरामजी ‘अदल’ : (१८८१–१९५३). आधुनिक काळातील प्रसिद्ध गुजराती कवी. ते पारशी होते. त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही. लहानपणीच ते व्यापारात पडले आणि  त्यानिमित्त त्यांचे बहुतेक वास्तव्य मद्रासला होते. तथापि गुजरातबाबतच्या त्यांच्या प्रेमाचे आणि अभिमानाचे प्रतिबिंब त्यांच्या राष्ट्रीय कवितेत पडलेले दिसते. मद्राससारख्या दूरच्या ठिकाणी राहूनही त्यांनी विशुद्ध गुजराती भाषेत विपुल काव्यरचना केली. मुंबई विद्यापीठातर्फे ‘ठक्कर व्याख्यानमाला’ गुंफण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. त्यांची ही व्याख्याने गुजराती कवितानी रचनाकळा (१९४१) ह्या नावाने प्रसिद्ध झाली. त्यांच्या सुरुवातीच्या कवितेवर महाकवी नर्मद याचा प्रभाव दिसतो तथापि त्यांची नंतरची कविता स्वतंत्र आहे. गुजरातीत विडंबनपर कविता प्रथम त्यांनीच लिहिली. नानालाल यांच्या काव्याचे प्रभातनो तपस्वी अने कुक्कुटदीक्षा (दुसरी आवृ. १९३७) आणि बळवंतराय ठाकोर यांच्या आरोहण काव्याचे अवरोहण ह्या नावाने त्यांनी उत्कृष्ट विडंबन केले. आपल्या काव्यात त्यांनी छंदांबाबत विविध प्रयोग केले आणि विविध छंदांच्या मिश्रणातून ‘मुक्तधारा’, ‘अमीरो’ इ. नवीन छंदही गुजरातीत आणले. त्यांनी निर्यमक रचनाही करण्याचा प्रयत्न केला.

काव्यरसिका (१९०१) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. यानंतर त्यांचे विलासिका (१९०५), प्रकाशिका (१९०८), भारतनो टंकार (तिसरी आवृ. १९४१), संदेशिका (१९२५), कलिका (१९२६), रासचंद्रिका (तिसरी आवृ. १९४१), भजनिका (१९२८), दर्शनिका (१९३१), कल्याणिका (१९४०) इ. काव्यग्रंथ प्रसिद्ध झाले. ईश्वरभक्ती हा त्यांच्या काव्याचा महत्त्वपूर्ण पैलू असून भजनिकाकल्याणिकामधील त्यांची भजने या दृष्टीने उल्लेखनीय होत. राष्ट्रीय व वीररसप्रधान कवितेसाठी गुजरातीत ते विशेष प्रसिद्ध असून त्या दृष्टीने त्यांची ‘हलदीघाटनुं युद्ध’, ‘सदाकाळ गुजरात’, ‘अमारे देश’ इ. काव्ये महत्त्वपूर्ण मानली जातात. कलिकामधील त्यांची कविता प्रेमपर असून निर्यमक रचनेचा प्रयत्न त्यात त्यांनी केला. दर्शनिका हे त्यांचे तत्त्वज्ञानपर काव्य आहे. आधुनिक गुजराती काव्यात त्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.                                                                       

पेंडसे, सु. न.