मार्मागोवा : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा केंद्रशासित प्रदेशातील एक उत्कृष्ट बंदर. ते जुवारी नदीच्या मुखाशी, दक्षिण तीरावर वसलेले आहे. लोकसंख्या ६९,५१७ (१९८१).
इ. स. १५१० मध्ये ⇨ अफांसो द अल्बुकर्क याने येथे भारतातील पहिली पोर्तुगीज वसाहत स्थापन केली. एकोणिसाव्या शतकात प्रामुख्याने लोहधातुक व मँगॅनीज यांच्या निर्यातीमुळे याची भरभराट होऊ लागली. १८८८ मध्ये येथे ब्रिटिशांच्या साहाय्याने पहिला मालधक्का बांधण्यात आला. लगतच्या जांभा खडकाच्या पठारामुळे संरक्षण मिळालेल्या या बंदराच्या मुखाशी १६२४ मध्ये एक भक्कम लष्करी किल्ला बांधला होता. पुढे बंदरासाठी एक संरक्षक भिंतही उभारण्यात आली. भारतातील पोर्तुगीज सत्तेच्या अखेरच्या काळात खनिजनिर्यातीसाठी बंदराचे आधुनिकीकरण करण्यात आले व त्याबरोबरच लोखंडाच्या गोळ्या बनविणे, पडाव बांधणी व दुरूस्ती, जहाज दुरूस्ती या उद्योगांचाही विकास झाला. येथील खनिजे आयात करणारा जपान हा पूर्वीपासूनच प्रमुख ग्राहक देश आहे.
मार्मागोव्यातून होणारी निर्यात आयातीपेक्षा खूपच जास्त आहे. आगबोटींनी, शिडाच्या जहाजांनी व पडावांनी या बंदरातून होणारी किनारी वाहतूक व व्यापार मोठ्या प्रमाणात असून तो मुख्यतः मुंबईशी होतो. बहुतेक अन्नधान्य रेल्वेने आयात केले जाते.
येथील नाविक ठाण्यामुळे बंदर व नद्या यांमधील वाहतुकीवर भारताच्या संरक्षण खात्याची खास देखरेख असून त्यावर वाहतूक मंत्रालयाचा ताबा असतो. पठारावरील दाभोळी विमानतळ, प्रशासकीय इमारती, निवासस्थाने व इतर आणि तदनुषंगाने वाढलेली वाहतूक, व्यापार यांमुळे मार्मागोव्याला आगळेच महत्व आले आहे.
नगरपालिकेने गरिबांसाठी व आपल्या सेवकांसाठी नवीन निवासस्थाने तसेच दुकाने बांधली आहेत. येथे प्राथमिक, माध्यमिक विद्यालयांबरोबरच एक कला व वाणिज्य महाविद्यालयही आहे. प्राथमिक शिक्षण निःशुल्क आहे. शहरात दोन शासकीय रूग्णालये, दोन आरोग्य केंद्रे व एक कुटुंब नियोजन केंद्र असून त्यांच्या जोडीला अनेक खासगी दवाखाने, शुश्रूषागृहे तसेच चित्रपटगृहे, करमणूक व क्रीडा केंद्रे आहेत. येथील ‘ वास्को क्रिडांगण’ हे भारतातील फुटबॉल सामन्यांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. शहरात भव्य सभामंडप, बगीचा, दीपमाळयुक्त महालक्ष्मीचे मंदिर असून त्यात महालक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे. यांशिवाय लक्ष्मीनारायण मंदिर, गॉथिक शैलीत दर्शनी भागाचे नूतनीकरण झालेले सेंट अँड्रू चर्च, दामोदर मंदिर, गुरुद्वारा (१९७२), मशीद, उद्यान व बालोद्यान ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
मार्मागोव्याला लागूनच वाष्कू-द-गामा (वास्को द गामा) ही व्यापारपेठ आहे. सासष्टी तालुक्याची विभागणी झाल्यावर बंदराचा विकास, लोहमार्गाची निर्मिती यांमुळे १९१७ मध्ये पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी चिकोल्डा, वाडेम, मार्मागोवा इ. गावे एकत्र करून मार्मागोवा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण बनविले व त्याला वाष्कू-द-गामा हे नाव दिले आणि वृक्षरांगा असलेले मोठे रस्ते तसेच प्रशस्त पादचारी मार्ग बांधले बंदराचे नाव मात्र मार्मागोवा हेच राहिले. याच्या दाट लोकवस्तीच्या मध्य विभागात रेल्वे स्थानक व चर्च असून त्या विभागात व्यापार व उद्योग एकवटलेले आहेत. दक्षिणेकडील नायना विभागापर्यंत पक्का रस्ता असून तेथील ३ किमी. ची पुळण प्रसिद्ध आहे. शहरात वीज, नळाचे पाणी, अग्निशामक दल, कार्यक्षम वाहतूकव्यवस्था, पर्यटकांसाठी विश्रामगृहे, स्वच्छतागृहे इ. सुखसोयी आहेत. सुनियोजित आणि सुव्यवस्थित असलेले प्रारंभीचे गाव आता मात्र धूलियुक्त व फारच दाट वस्तीचे झाले आहे. शहराच्या मध्यभागात मध्यमवर्गीयांच्या व मजुरांच्या घरांची व झोपड्यांची, विश्रामगृहांची व उपहारगृहांची एकच गर्दी झाली आहे. गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे हे अंतिम केंद्र असून मार्मागोवा रेल्वेस्थानकावर बहुतेक सर्व मालाची चढउतार होते. दाभोळीचा विमानतळ आता नागरिकांच्या उपयोगासाठी खुला झाल्यामुळे पठाराच्या उतारावर व वाष्कू-द-गामा ते कुठ्ठाळ रस्त्याच्या माथ्यावर नवीन बांधकामे झालेली दिसतात.
येथील हवा उष्ण कटिबंधीय असली, तरी नदीवरून व समुद्रावरून येणाऱ्या सुखद वाऱ्यांमुळे ती उत्साहजनक आहे.
पंडित, भाग्यश्री कुमठेकर, ज. ब.