व्हिझ्बी : स्वीडनच्या गॉटलंड परगण्याची राजधानी. लोकसंख्या २०,४४२ (१९८४ अंदाज). स्वीडनच्या आग्नेयेस बाल्टिक समुद्रात असलेल्या गॉटलंड बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. ख्रिस्तपूर्व स. २००० मध्ये येथे सीलसारख्या माशांची शिकार करणाऱ्या लोकांची वस्ती असावी. बाराव्या शतकात येथून युरोपच्या इतर भागांत चालणाऱ्या व्यापारामुळे परदेशी, विशेषत: जर्मन व्यापारी या केंद्राकडे आकृष्ट झाल्याचे दिसते. ल्यूबेक व इतर हॅन्सिॲटिक नगरांशी व्हिझ्बीचे व्यापारी संबंध होते. तेराव्या शतकात युरोपमधील हे प्रसिद्ध व्यापारी ठाणे होते. त्या वेळी येथे स्वतंत्रपणे नाणी पाडली जात व आंतरराष्ट्रीय कायदेकानूनही तयार करण्यात येत. डॅनिश राजा चौथा वॉल्देमार याने गॉटलंड जिंकले. तेव्हापासूनच व्हिझ्बीचे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र म्हणून असलेले महत्त्व कमी झाले. १३७० मध्ये याचा ताबा हॅन्सिॲटिक लीगकडे देण्यात आला. नंतरची दोन शतके चाचेगिरी करणार्‍यांचे हे केंद्र बनले. १५७० मध्ये याचा ताबा डेन्मार्ककडे गेला, तर १६४५ मध्ये पुन्हा स्वीडनकडे आला. एकोणिसाव्या शतकात शहराने आपला व्यापारी वारसा पुन्हा विकसित करण्यास सुरुवात केली.

आधुनिक व्हिझ्बीमध्येही मध्ययुगीन वैभवाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी पाहावयास मिळतात. तेराव्या शतकातील ३.४ किमी. लांबीची, ९मी. उंचीची व ४० बुरुज असलेली तटबंदी, तेराव्या व चौदाव्या शतकांत चुनखडकांत बांधलेल्या काही वैभवशाली व्यापारी वास्तू तसेच तत्कालीन चर्चवास्तूंचे अवशेष शहरात पाहावयास मिळतात. प्राचीन व मध्ययुगीन कलावस्तूंचे संग्रहालय येथे आहे. ल्यूथरन बिशपचे हे प्रमुख केंद्र आहे. स्थानिक लोक प्रशासकीय सेवा, उद्योगधंदे, व्यापार व हस्तकला व्यवसायांत गुंतलेले आहेत. येथे सिमेंट व साखर निर्मितीउद्योग चालतात. एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही व्हिझ्बी महत्त्वाचे आहे. निनासहामन, ऑस्कर्सहामन व व्हेस्टरव्हीक या शहरांशी स्वयंचलित लहान नावांनी, तर स्टॉकहोम, मॅल्म व नॉर्चपिंगशी हवाई मार्गाने आणि गॉटलंड बेटावरील वेगवेगळ्या स्थाळांशी रस्त्याने हे शहर जोडलेले आहे. 

   चौधरी, वसंत