मार्टिनिएसी : (वृश्चन कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] द्विदलिकित वनस्पतींचे एक लहान कुल. याचा अंतर्भाव अनेक शास्त्रज्ञांनी ⇨ पेडॅलिएसीत (तिल कुलात), तर जे. हचिन्सन यांनी टेटू गणात [बीग्नोनिएलीझ → बीग्नोनिएसी] केला आहे. मार्टिनिया या प्रजातिनामावरून या कुलाचे शास्त्रीय नाव पडले आहे. भारतात ह्या कुलातील तीन प्रजातींपैकी (मार्टिनिया, प्रोबॉसिडिया व क्रॅनिओलॅरिया) मार्टिनिया प्रजातीतील एकमेव जाती मा. ॲन्युआ (मा. डायन्ड्रा) आढळते. हिला ‘विंचवी’ (वृश्चन, वृश्चिक, विंचू) म्हणतात, त्यावरून मराठीत ह्या कुलाला वृश्चन कुल हे नाव दिले आहे.
ह्या कुलात तेरा जाती (जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते पाच प्रजाती व १६ जाती ए. बी. रेंडेल यांच्या मते तीन प्रजाती व नऊ जाती) असून त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधीय अमेरिकेत आहे तेथे त्या रूक्ष ठिकाणी समुद्रकिनारी आढळतात. पेडॅलिएशी या कुलाचे साम्य आहे मात्र मार्टिनिएसी कुलाची पुढील लक्षणे भिन्न आहेत : परागकोशांना शुंडिका (नळीसारखा उपांग) असते. ऊर्ध्वस्थ किंजपुटात द्विखंडी तटलग्न बीजकाधानी (भिंतीवर दोन ठिकाणी बीजकांचे उगमस्थान) असते. फळात (बोंडात) थोडी किंवा अनेक बीजे व बीजात पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) फार कमी असतो. याची इतर विशेष लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत : सर्पिल किंवा संमुख पाने मांसल मुळे, मंजरी प्रकारचा फुलोरा [ → पुष्पबंध], द्विलिंगी, पंचभागी एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी) फुले चार कार्यक्षम केसरदले व एक वंध्य (वांझ) [ → फुल]. फळाचे आतील आवरण कठीण असून प्रत्येक किंजदलाच्या टोकाचा भाग काष्ठमय बनून त्याचे आकड्यासारखे (विंचवाच्या नांगीसारखे) उपांग बनते व याची प्राण्यांच्या साहाय्याने फळांच्या प्रसारास मदत होते.
पहा : पेडॅलिएसी विंचवी.
परांडेकर, शं. आ.