मार देल प्लाता : अर्जेंटिनातील एक प्रमुख औद्योगिक शहर, अटलांटिक महासागरावरील प्रमुख बंदर आणि हवेशीर ठिकाण. लोकसंख्या ४,२३,९८९ (१९८०). हे देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ब्वेनस एअरीझच्या दक्षिणेस सु. ३८६ किमी. अंतरावर वसलेले आहे. महामार्ग, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी तसेच सागरी मार्गाने ते इतर महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.

स्पॅनिश सैनिक व्हान दे गाराई याने १५८१ मध्ये मार देल प्लाताच्या किनारी प्रदेशाचे समन्वेषण केले होते. १७४६ साली इंग्रज मिशनरी फॉक्‌नर व कार्डिनल यांनी या भागात अमेरिकन इंडियनांसाठी सेवाकेंद्र उभारले परंतु इंडियनांच्या हल्ल्याच्या भीतीने त्यांनी १७५१ मध्ये हा प्रदेश सोडून दिला. १८५६ मध्ये पोर्तुगीज समन्वेषक झूझे कुबेल्यु दे मिएरेल्स याने या भागात ‘ला पेरेग्रिना’ या नावाने एका मच्छिमारी खेड्याची  स्थापना केली. त्याने १८५७ मध्ये या भागात मांस खारवण संयंत्र उभारल्यामुळे या भागाला खूपच महत्त्व प्राप्त झाले. १८६० मध्ये पॅट्रिको पेराल्टा रामोस याने मिएरेल्सकडून हा भाग घेतला व एक हवेशीर ठिकाण म्हणून याचा विकास केला. पुढे १८७४ मध्ये ते ‘मार देल प्लाता’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतरच्या काळात याची झपाट्याने भरभराट होऊन यास १९०७ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. महासागर किनाऱ्यावरील स्थान, विस्तृत पुळणी व आल्हाददायक हवामान यांमुळे देशातील तसेच दक्षिण अमेरिकेतील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून हे प्रसिद्धीस आले.

नोव्हेंबर ते एप्रिल या काळात अनेक पर्यटक या शहराला भेट देतात. पर्यटन व्यवसाय हा येथील प्रमुख उद्योग असून बहुतेक व्यापारी उलाढाली त्याच्याशी निगडित आहेत. येथील जुगारगृहे जगातील मोठ्या जुगारगृहांपैकी समजली जातात. यांशिवाय शहरातील नृत्यगृहे, हॉटेले उल्लेखनीय असून येथे वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा केला जातो.

शहरात कला व निसर्गविज्ञानविषयक संग्रहालये असून १९६२ मध्ये स्थापन झालेले राष्ट्रीय विद्यापीठ आहे. पर्यटनव्यवसाशिवाय येथे बांधकाम, मासेमारी, मत्स्यप्रक्रिया, मांस डबाबंदीकरण, कापड, कागद, सिगारेटी तयार करणे इ. महत्त्वाच्या व्यवसायांचा विकास झाला आहे. शहरातील १८९३ मधील सॅन पेद्रो गॉथिक चर्च, नगरभवन, नाविकतळ इ. उल्लेखनीय आहेत.

चौंडे, मा. ल.