मायावरण : शत्रूपासून बचाव करण्याच्या दृष्टीने त्याला फसविण्याकरिता जे विविध प्रकारचे परिस्थितिसापेक्ष आभास उत्पन्न करावयाचे त्याला मायावरण म्हणतात.
पृथ्वीवरील यच्चयावत प्राणिमात्रांत जगण्याकरिता अहर्निश धडपड चालू असते. जिवंत राहण्याकरिता अन्नाची ज्याप्रमाणे जरूरी असते त्याप्रमाणेच शत्रूपासून संरक्षण होणेदेखील आवश्यक असते. सगळ्या प्राण्यांच्या जीवनक्रमाकडे जर नजर टाकली, तर प्रत्येकाला एखादा तरी शत्रू असतोच, असे दिसून येईल. अर्थात मनुष्यप्राणीदेखील याला अपवाद नाही. शत्रूपासून रक्षण झाले तरच जगणे शक्य. चार्ल्स डार्विन यांच्या ⇨ नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाप्रमाणे शत्रूपासून बचाव होण्याकरिता अनेक तऱ्हेचे गुण प्राण्यांमध्ये उत्पन्न झाले पाहिजेत. या विविध गुणांपैकी एक म्हणजे प्राणी ज्या जागी राहतो त्या ठिकाणाच्या रंगाशी योग्य रीतीने जुळेल असा त्याच्या शरीराचा रंग असणे, हा होय. पर्यावरणाशी (बाह्य परिस्थितीशी) जुळेल असाच जर त्याच्या शरीराचा रंग असला, तर प्राणी सहसा शत्रूच्या नजरेस पडणार नाही. प्राण्यांचे पर्यावरणाशी एकरूप होऊन गुप्त राहणे जीवनार्थ कलहात त्याला फारच उपयोगी पडते कारण शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्याकरिता किंवा अन्न मिळविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. पर्यावरण जसे बदलते त्याप्रमाणे आपल्या शरीराचे रंगदेखील बदलण्याचे सामर्थ पुष्कळ प्राण्यांच्या अंगी असते.
निसर्गात आढळणाऱ्या अनेक गोष्टींचे मनुष्याने अनुकरण केले आहे. पर्यावरणाच्या रंगाला अनुरूप असा आपल्या शरीराचा रंग बदलून गुप्त व्हावयाचे व स्वतःचे संरक्षण करावयाचे किंवा शत्रूवर हल्ला चढवावयाचा या प्राण्यांच्या अंगी असलेल्या मायावरण निर्माण करण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करून मनुष्याने ती कला साध्य करून घेतली आहे विशेषतः लढाईच्या कामी त्याने ही कला उपयोगात आणली. [→ मायावरण, सैनिकी].
प्रकार : मायावरण दोन तऱ्हेने उपयोगात आणता येते. शत्रूवर चढाई करण्याकरिता उत्पन्न केलेले एक (आक्रमण) आणि दुसरे स्वसंरक्षणाकरिता. निसर्गात मायावरणाचे हे दोन्ही प्रकार आढळून येतात. हल्ला करण्याचे किंवा संरक्षणाचे साधन या दृष्टीने रंगांच्या किती महत्त्व आहे हे कळण्याकरिता वन्य प्राण्यांचे त्याच्या नैसर्गिक वसतिस्थानातच निरीक्षण करायला पाहिजे. त्याशिवाय त्याची नीट कल्पना येणार नाही.
एखाद्या प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्यात ठेवलेला बिबळ्या पाहिला, तर त्याच्या अंगावर असलेल्या मोठ्या ठिपक्यामुळे तो फार सुंदर दिसतो एवढीच आपल्याला कल्पना येईल परंतु तेच जर आपण त्याला त्याच्या नैसर्गिक निवासस्थानात पाहिले, तर अंगावरील ठिपक्यांचे खरे महत्त्व काय आहे, ते आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. जंगलात चित्रविचित्र रंगांच्या झुडपांच्या डाट जाळीत राहणाऱ्या या श्वापदाच्या कातडीवरील टिपक्यांचे जाळीतील अंधुक प्रकाशात पडलेले कवडसे व सावलीचे लहानमोठे ठिपके यांच्याशी किती साम्य असते ते शिकारी चांगले सांगू शकतील. बिबळ्याच्या अंगाचा रंग व त्यावरील ठिपके यांची रचनाच असते की, तो आपल्या जाळीत असताना सहसा बाहेरून दिसूच नये. मार्जार कुलातील वाघ, चित्ता वगैरे प्राण्यांचीही अशीच गोष्ट आहे. वाघ जंगलात हिंडत असताना चटकन दिसतो परंतु दबा धरून बसल्याबरोबर तो एकदम गुप्त झाल्यासारखा होतो, याचे कारण त्याच्या शरीराच्या रंग व्यवस्थेतच आहे. आक्रमक मायावरणाचे हे एक उदाहरण आहे.
भक्ष मिळविण्याकरिता रंगांच्या साहाय्याने भ्रम उत्पन्न करण्याचे काम पुष्कळ प्राणी करतात. सर्पटोळी नावाचा साप फारसा जाड नसतो पण त्याची लांबी बरीच असते. त्याचा रंग झाडाच्या पानासारखा हिरवा असतो, फांदीला विळखा घालून फांदीवरून तो खाली लोंबकळत राहतो. अशा स्थितीत तो एखाद्या वेलासारखा भासतो. त्यामुळे साहजिकच लहानसहान पक्षी व इतर छोटे प्राणी फसून याच्या तडाख्यात सापडतात. फुरसे फारच विषारी असते. खडसाळ जमिनीत आढळणाऱ्या फुरशाचा रंग मातकट असतो, तर रेताड जागी आढळणाऱ्याचा रंग वाळूसारखा असतो. यामुळेच पुष्कळदा प्रत्यक्ष त्याच्या अंगावर पाय पडेपर्यंत फुरसे आपल्याला दिसून येत नाही. भक्ष्य मिळण्याच्या कामी त्याला या रंगसादृश्याचा उपयोग होतो.
समुद्रात शार्क गटाचे फार खादाड व अत्यंत क्रूर मासे आढळतात. याचीच एक जात भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ सापडते. तिला मुशी म्हणतात. वाघबीर किंवा व्याघ्र मुशी (टायगर शार्क) नावाची या माशाची एक जात आहे. पुष्कळदा मेल्याचे सोंग करू वाघबीर समुद्राच्या पाण्यावर तरंगत पडतो. तो मेला आहे असे समजून त्याच्या शरीराचे लचके तोडण्याकरिता पुष्कळ मासे त्याच्या भोवती गोळा होतात. ते जमल्याबरोबर हा मासा त्यांचा फडशा पाडतो.
काही कीटक मारून खाल्लेल्या किड्यांच्या कवचांनी आपली शरीरे झाकून घेतात. हेतू हा की, आपल्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या किड्यांना आपले खरे स्वरूप काय आहे ते कळू नये व सहजासहजी ते आपल्या पकडीत यावेत.
वर दिलेली सर्व उदाहरणे आक्रमक मायावरणाची आहेत. निसर्गात संरक्षक मायावरणाचे देखील अनेक प्रकारचे नमुने आढळून येतात.
घरातून आढळणाऱ्या पालींचे आपण निरीक्षण केले, तर असे दिसते की, ज्या खोल्यांना पांढरा किंवा दुसरा एखादा अगदी फिकट रंग दिलेला असतो अशा खोल्यांत राहणाऱ्या पाली रंगाने उजळ असतात परंतु ज्या खोल्यांत अंधार असतो व ज्यांच्या भिंतीचा रंगगडद असतो अशा ठिकाणी आढळणाऱ्या पाली जास्त काळ्या रंगाच्या असतात. स्वयंपाक घरातील छत व भिंती धुराने काळ्या झालेल्या असतात. या ठिकाणी राहणाऱ्या पाली अगदी काळ्या असतात. त्यांचा रंग जर पांढुरका किंवा फिका असता, तर काळ्या पार्श्वभूमीवर त्याफारच उठून दिसल्या असत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचा रंग काळा असणेच इष्ट होय. झाडांच्या खोडांवरुन आढळणाऱ्या पालींचा रंग थेट सालीसारखा असलेला दिसून येतो.
पुष्कळ सरडे परिस्थित्यनुरूप शरीराचा रंग बदलतात. ⇨ सरडगुहिरा म्हणून जी सरड्याची जात हे तीत या रंग बदलण्याच्या क्षमतेची पूर्ण वाढ झालेली आढळून येते. झाडाच्या पानातून मंद गतीने हिंडणारा हा प्राणी पर्यावरणाच्या बदलाबरोबरच क्षणोक्षणी आपल्या शरीराचे रंग इतके बदलीत असतो की, याचा मूळ रंग तरी कोणता याचाच प्रश्न पडतो. झाडांवरून राहणाऱ्या बेडकांमध्येही रंग बदलण्याचे सामर्थ असते. खोडांवरून फिरत असताना ते करड्या रंगाचे असतात परंतु पानांमधून हिंडताना त्यांचा रंग हिरवा होतो.
अनेक मासे भक्ष्य मिळविण्याकरिता नदीच्या किंवा तलावाच्या तळाशी जातात. अशा माशांच्या पाठीचा रंग पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलासारखा किंवा वाळूसारखा असतो त्यामुळे तळाशी असताना ते चटकन दिसत नाहीत
संरक्षक मायावरणाची कला कीटकसृष्टीत पूर्णत्वाला पोहोचलेली आढळते. कीटकांच्या इतके शत्रू दुसऱ्या प्राण्यांना असतील किंवा नाही याची शंकाच वाटते. बलवानांच्यापासून स्वतःचे रक्षण करावयाचे झाल्यास लपून बसणे हा एकच उपाय दुर्बलांच्या जवळ असतो. कीटकांनी या उपायाचे पूर्णपणे अवलंबन केल्याचे दिसून येते. किड्यांचे संमिश्र रंग आणि त्यांच्यातील पुष्कळांच्या शरीराचे आकार हे शत्रूपासून बचाव करण्य्याकरिता उपयोगी पडतात. शत्रूपासून बचाव करण्याची ही साधने नाहीत असे मानले, तर पर्णकीटकाचे पानांशी असलेले आश्चर्यकारक साम्य व यष्टि-किटकाचे वाळलेल्या काटकीशी असणारे सादृश्य यांची संगती कशी लावावयाची ? संरक्षक मायावरणाची निसर्गातील ही पूर्ण व निर्दोष उदाहरणे आहेत असेच विचारांती दिसून येईल.
दक्षिण अमेरिकेत एक प्रकारचे फुलपाखरू आढळते. याच्या मागच्या दोन पंखांवर हुबेहुब घुबडाच्या डोळ्यांप्रमाणे दिसणारे आणि साधारण तेवढ्याच आकाराचे दोन मोठे ठिपके असतात. या फुलपाखरांचा हा भाग अगदी घुबडाच्या डोक्यासारखा दिसतो व म्हणूनच पक्षी याच्या वाटेला जात नाहीत. घुबडाच्या डोक्याशी
असलेले हे साम्य शत्रूला भीती दाखवून त्याला दूर ठेवण्यास पुरेसे होते.
आपला जीवनक्रम सुरळीत चालावा म्हणून पुष्कळ प्राणी दुसऱ्या प्राण्यांची हुबेहुब नक्कल करतात. नक्कल ही थोडी निराळी असली, तरी मायावरणाचाच तो एक प्रकार आहे, असे मानायला हरकत नाही. कोकिळाच्या क्युक्युलिडी कुलातील ‘पाशवा’ ही एक जात आहे. हा पक्षी शिकरा या पक्ष्याची हुबेहुब नक्कल करतो. शिकऱ्याच्या रंगाप्रमाणेच याचा रंग असतो. इतकेच नव्हे, तर शिकऱ्याच्या छातीवर, पोटावर, पंखांवर व शेपटावर ज्या तऱ्हेचे पट्टे असतात, तसेच पावशाच्याही असतात. शिकरा हा शिकारी पक्षी असल्यामुळे लहान पक्षी त्याला फार घाबरतात. पावशा हा शिकऱ्याप्रमाणेच दिसत असल्यामुळे साहजिकच सर्व लहान पक्ष्यांची फसगत होऊन ते यालाही फार घाबरतात. याचा फायदा पावशाला मिळून त्याची मादी आपली अंडी सातभाई या लहान पक्ष्याच्या घरट्यात घालते.
पहा : अनुकृति.
कर्वे, ज. नी.
“