मानारचेआखात: भारत व श्रीलंका यांदरम्यानचा हिंदी महासागराचा भाग. ८° उ. ते ९° उ. अक्षांश व ७८° पू. ते ८०° पू.रेखांशांदरम्यानच्या या आखाताची लांबी १६० किमी. व रुंदी १३० ते २७५ किमी. आहे.उत्तरेस रामाचा सेतू (ॲडम्स ब्रिज), पूर्वेस श्रीलंकेचा किनारा, पश्चिम भारताचा किनारा यांनी हे आखात वेढलेले असून दक्षिणेस खुला समुद्र आहे.सर्वसामान्यपणे कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकापर्यंत याचा विस्तार मानला जातो. या आखाताच्या उत्तर भागात शोल (उथळ भाग) आणि अनेक खडक असून दक्षिण भागात दोन्ही मॉन्सूनच्या काळात मोठी वादळे निर्माण होतात.
समुद्रातून मोती काढण्याच्या उद्योगासाठी हे आखात पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. याच्या किनारी भागात यातून मिळणाऱ्या शंख-शिंपल्यापासून बांगड्या आणि इतर दागिने बनविण्याच्या उद्योगात किनारी भागातील (श्रीलंका व भारत) अनेक लोक गुंतलेले आहेत. भारतात पूर्वीच्या काळी या उद्योगात प्रामुख्याने ‘पारावान’ हे रोमन कॅथलिक लोक असत परंतु अलीकडच्या काळात मात्र तमिळ लोक मोठ्या संख्येने दिसून येतात. मानारच्या आखाताला मिळणाऱ्या नद्यांमध्ये भारतातील ताम्रपर्णी व श्रीलंकेतील आरुव्ही आरू या नद्या महत्त्वाच्याअसून आखाताच्या किनाऱ्यावरील तुतिकोरिन (भारत) हे प्रमुख बंदर आहे. हे बंदर पूर्वी मोती व शंख यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होते.
आखाताच्या उत्तर भागात श्रीलंकेच्या किनाऱ्यावर २५·६ किमी. लांब व ६·४ किमी. रुंदीचे मानार बेट असून ते ताड, नारळ आणि भातशेती यांसाठी प्रसिद्ध आहे. मानार, तलाईमानार ही बेटावरील प्रमुख बंदरे असून मानार येथे वातावरणविज्ञानविषयक वेधशाळा आहे.
चौधरी, वसंत जोग, सुरेखा