मानसोपचारपद्धती: (सायकोथेरपी).मानसोपचाराच्या वेगवेगळ्या प्रणाली असून पद्धतीही अनेक आहेत. किंबहुना प्रत्येक ज्येष्ठ व अनुभवी उपचारज्ञाची मानसोपचारपद्धत वैशिष्ट्यपूर्ण असते. मानसोपचारांचे पद्धतींनुसार केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे : मुख्य वर्ग दोन आहेत : (एक) वैयक्तिक व (दोन) सामूहिक.

 (एक) वैयक्तिक : या मानसोपचाराचे उपवर्ग असे आहेत : (अ) मनोगतिकी (सायकोडायनॅमिक) किंवा मनाच्या खोल पातळीवरचे मानसोपचार (डीप सायकोथेरपी). (आ) मनाच्या पृष्ठभागापुरते (बोध मनापुरते) मर्यादित मानसोपचार (सुपर्फिशियल सायकोथेरपी).

 (अ) मनोगतिकी मानसोपचाराचे तीन प्रकार आहेत : (१) मनोविश्लेषणी मानसोपचार (फ्रॉइड प्रणाली). (२) नवफ्रॉइडी मनोविश्लेषणी मानसोपचार (फ्रॉइडेतर प्रणाली). (३) अल्पकालीन (ब्रीफ) मनोगतिकी मानसोपचार.

 वरील तीन वर्गांत पुढील महत्त्वाच्या मानसोपचारपद्धती आहेत : (१) फ्रॉइड यांची अभिजात मनोविश्लेषित तसेच युंग व ॲड्लर यांच्यासुधारित मनोविश्लेषणी पद्धती. (२) होर्नाय, सलिव्हन, रॅडो, रांक आणि फ्रॉम यांच्या नवफ्रॉइडी मानसोपचारपद्धती तसेच फ्रँक्‌ल यांची अस्तित्ववादी मनोविश्लेषणी पद्धत. (३) अलेक्झांडर, मान आणि सिफनिऑस यांच्या अल्पकालीन मानसोपचारपद्धती.

 (आ) मनोपृष्ठभागीय मानसोपचाराचे मुख्य प्रकार असे आहेत : (१) मुक्तीभिव्यक्ती मानसोपचार (व्हेंटिलेशन किंवा एक्स्प्रेसिव्ह सायकोथेरपी). (२) ग्लानीविश्लेषण (नार्कोॲनॅलिसिस). (३) आधारदायी मानसोपचार (सपोर्टिव्ह सायकोथेरपी). (४) रुग्णकेंद्रित मानसोपचार (कार्ल रॉजर्झ).

 (दोन) सामूहिक : या मानसोपचाराचे मुख्य प्रकार असे आहेत (अ) समूह मानसोपचार. (आ) कुटुंबोपचार. (इ) उपचारपोषक समाज (थेरॅप्युटिक कम्युनिटी) किंवा आसमन्तोपचार (मिलू थेरपी). (ई) मनोनाट्य (सायकोड्रामा).

 वर्तनोपचार हासुद्धा वरील व्याख्येनुसार मानसोपचाराचा एक प्रकार असून तो अध्ययन सिद्धांतावर आधारलेला आहे. मानसोपचारात लक्षणांची कारणे शोधण्यासाठी मागील अनुभवांची मीमांसा केली जाते परंतु वर्तनोपचारात कारणमीमांसा न करता, लक्षणाच्या अपसामान्य वर्तनाला जोपासणारे मानसिक यंत्रणेतले कारक शोधले जातात आणि त्यांचा वर्तनावरचा प्रभाव खंडित करण्यासाठी एक मानसशास्त्रीय सरावांची योजना आखली जाते. नंतर ती रुग्णाकरवी राबवली जाऊन त्याच्या वर्तनात योग्य तो बदल घडवून आणला जातो (बिहेवियर मॉडिफिकेशन). ही पद्धत इतर मानसोपचारांपेक्षा वेगळी असल्यामुळे तिचे पुरस्कर्ते मात्र तिला मानसोपचारापासून स्वतंत्र मानतात.

पहा : मानसचिकित्सा मानसिक आरोग्य.

शिरवैकर, र. वै.