मानवसदृश कपी : (१) गिबन (हायलोबेटीस हूलॉक), (२) ओरँगउटान (पोंगो पिरिमयस), (३) चिंपँझी (पॅन ट्रॉग्लोडायटीझ), (४) गोरिला (गोरिला गोरिला) [ही चित्रे तुलनात्मक आकारमानानुसार दाखविलेली नाहीत.]मानवसदृश कपि : गोरिला, चिंपँझी, ओरँगउटान व गिबन या प्राण्यांत आणि मानवात असलेल्या साम्यामुळे त्यांना ‘मानवसदृश कपी’असे म्हणतात . अनेक बाबतींत हे साम्य आढळून येते पण विशेषतः कवटी, दात, मेंदू व ज्ञानेंद्रिय यांत ते फार आहे. भ्रूणीय अवस्था व अपरा (वार) या सारख्याच असतात. ही लक्षणे व यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) यांचा अभ्यास केला असता गोरिला, चिंपँझी, ओरँगउटान, गिबन व मानव या सर्वांचा पूर्वज एकच असला पाहिजे, असे दिसून येते.

या मानवसदृश कपींना शेपूट नसते, चेहरा पसरट असतो आणि त्याच्या अनुषंगाने मस्तिष्क–कोश (मेंदूचा अंतर्भाव असलेला कवटीचा भाग) मोठा असतो. चेहऱ्याचे स्नायू, डोळे, ओठ यांच्या साहाय्याने हे कपी चेहऱ्यावर वेगवेगळे भाव प्रगट करतात. लहान बाह्य कर्ण, धड ताठ ठेवण्याची पद्धत, हातापायांच्या बोटांना सपाट नखे असणे ही व इतर आणखी काही लक्षणे माणसाच्या या लक्षणांप्रमाणेच आहेत. गोरिला, चिंपँझी व ओरँगउटान यांचा समावेश पाँजिडी व गिबनचा हायलोबेटिडी कुलात केलेला आहे.

 शारीर (शरीररचनाशास्त्र) व शरीरक्रियाविज्ञान यांच्या दृष्टीने विचार केला असता शेपूट असलेल्या माकडांपेक्षा ओरँगउटान, चिंपँझी व गोरिला हे माणसाला जवळचे आहेत. माणूस जमिनीवर राहणारा प्राणी आहे. ओरँगउटान वृक्षवासी आहे, गोरिला वृक्षवासी व जमिनीवर राहणारा आहे आणि चिंपँझी या बाबतीत दोहोंच्या मधे आहे. हात पायांपेक्षा लांब असतात श्रोणि−किण (ढुंगणावरील घट्टे)नसतात गालाच्या आतील बाजूवर कपोलकोष्ठ (खिशासारख्या पिशव्या) नसतात आंत्रपुच्छ(लहान आतडे व मोठे आतडे यांच्या संधिस्थानापासून खाली असणारी पिशवीसारखी वाढ ॲपेंडिक्स) असते पादांगुष्ठ (पायाचा अंगठा) संमुख असतो माणसाप्रमाणेच चिंपँझी व गोरिला यांच्या मनगटाचे मधले हाड भ्रूणीय अवस्थेत नौकास्थीशी (नौकेच्या आकाराच्या हाडाशी) संयुक्त होते ऋतुस्राव चक्र माणसातल्यासारखेच असते. चिंपँझीमध्ये तर दोन ऋतुस्रावांतील अंतर माणसांप्रमाणेच २७ ते ३० दिवस असते गोरिला, ओरँगउटान व चिंपँझी यांचा गर्भावधी ९ महिन्यांचा असतो अपरेची रचना माणसामधील अपरेच्या सारखीच असते. जुन्या जगातील (आशिया, आफ्रिका व यूरोप खंडांतील) माकडांप्रमाणेच अपरा गौण नसते मेंदू आकारमानाने माणसाच्या मेंदूच्या एकतृतीयांश असतो. या कपींच्या मेंदूंमध्येही माणसाच्या मेंदूप्रमाणे सर्व भाग असतात पण ते आकारमानाने लहान असतात. ज्या रोगांची बाधा माणसांना होते त्याच रोगांची बाधा या कपींनाही होते. यावरून हे कपी व माणूस यांत रासायनिक दृष्ट्याही साम्य आहे, हे दिसून येते. जॉर्ज नटॉल या शास्त्रज्ञांच्या प्रयोगांवरून माणूस व हे कपी यांचे रक्त समरूप आहे, हे सिद्ध झाले आहे पण जुन्या जगातील माकडांचे व माणसांचे रक्त समरूप नाही.

 प्रयोगशाळेत माकडे व कपी यांच्यावर प्रयोग केले असता असे दिसून आले की, कपींचा प्रमस्तिष्क बाह्यक (मोठ्या मेंदूच्या बाहेरच्या बाजूचा करड्या रंगाचा भाग) हा माकडांच्या त्याच भागापेक्षा शरीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे. इतर नरवानरांपेक्षा [ प्रायमेटांपेक्षा ⟶ नरवानर गण] चिंपँझी बुद्धिवान आहे. त्याला वस्तूंचे ज्ञान व शिकविलेल्या गोष्टींचे आकलन चटकन होते. कोणतीही गोष्ट शिकताना तो लक्ष देऊन व मन एकाग्र करून शिकतो.

 हायलोबेटिडी कुलातील प्राणी आग्नेय आशियात विशेषतः बोर्निओ, मलेशिया व सुमात्रा या ठिकाणी सापडतात. गिबनचे मायोसीन काळातील (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्म यूरोपमध्ये आणि प्लायोसीन काळातील (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्म उत्तर व मध्य चीनमध्ये सापडले आहेत. गिबन बराचसा माकडासारखा दिसतो. त्याला श्रोणि–किण असतात. तो चार पायांवर चालत नाही. हातांनी झाडाची फांदी पकडून झोके घेत घेत तो या फांदीवरून त्या फांदीवर जातो. गिबनलाही कपोलकोष्ठ नसतात (माकडांना हे असतात). माणसांच्या दाढांसारख्याच यांच्या दाढा असतात. आंत्रपुच्छ असते. वजन जवळजवळ १० किग्रॅ. असते. मध्य यूरोपात मायोसीन काळातील स्तरात प्लायोपिथेकस अँटिकस या गिबनच्या एका जातीचे जीवाश्म सापडले आहेत. प्रॉप्लिओपिथेकसच्या खालच्या जबड्याचे ऑलिगोसीन काळातील (सु. ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) जीवाश्म ईजिप्तमध्ये आढळले आहेत.

 ओरँगउटान हा बोर्निओ व सुमात्राच्या समुद्राकाठच्या अरण्यात आढळतो. तो वृक्षवासी आहे पण कधी कधी जमिनीवर येतो. त्याची उंची १२२ सेंमी. पेक्षा जास्त असते व वजन सु. ७५ किग्रॅ. असते. हा उभा राहिला असता हात जमिनीला टेकतात. हाताची व पायाची बोटे लांब असून ती टोकाला वाकलेली असतात. याला माणसासारख्या २४ बरगड्या असतात. कंठाजवळील हवेच्या पिशव्यांचा विकास झालेला असतो. केस राठ, लांब व लाल रंगाचे असतात. यांचे मुख्य अन्न फळे हे होय. यांच्या दाढांचे जीवाश्म उत्तर मायोसीन काळातीळ स्तरात आणि जबड्यांचे प्लायोसीन काळातील स्तरात सापडले आहेत.

 चिंपँझी व गोरिला हे मध्य आफ्रिकेच्या जंगलात आढळतात. गोरिला चिंपँझीपेक्षा मोठा असतो. नर गोरिलाचे वजन जवळजवळ२७५ किग्रॅ. असते, म्हणून तो सहसा झाडावर जात नाही पण झाडावर तो सहज चढू शकतो. झाडावर बांधलेल्या खोपटात मादी व पिल्लू रात्री झोपतात. हात पायांपेक्षा थोडे मोठे असतात. बोटे लहान असतात म्हणून फांदीला लोंबकळून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठी त्याला हातांचा उपयोग करता येत नाही. पायांचा उपयोग जमिनीवर चालण्यासाठी होतो. पावलात बदल झालेला दिसून येतो. गोरिला बेरिंगेई या जातीच्या गोरिलांचे पाय जवळजवळ माणसाच्या पायांसारखे असतात. या दोन्ही कपींचे केस काळे असतात, भुवईवर कंगोरा असतो व २६ बरगड्या असतात.

 मानवाच्या क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) प्रश्नांच्या दृष्टीने मानवसदृश कपींना महत्त्वाचे स्थान आहे. जुन्या जगातील माकडांशी त्यांचा आप्तभाव जरी उघड दिसून येत असला, तरी शरीराची रचना, शरीराच्या विविध क्रिया व मनोरचना या बाबतींत इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा माणसांशी त्यांचे निःसंशय साम्य दिसून येते. मानवसदृश कपी व माणूस यांत मूलभूत संरचनात्मक फरक फारसे नाहीत आणि जे काही थोडे आहेत त्यांचा समाधानकारक खुलासा करणे शक्य आहे. थोडक्यात सांगावयाचे तर तुलनात्मक शारीर, भ्रूणविज्ञान, रेणवीय जीवविज्ञान, जीवोपजीवनविज्ञान (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांसंबंधीचे शास्त्र) व प्राणिवर्तन यांच्या अभ्यासाने उपलब्ध झालेला पुरावा विचारात घेता मानवसदृश कपी इतर प्राण्यांपेक्षा माणसाला जवळचे आहेत, हे निर्विवाद सिद्ध होते पण याचा अर्थ, आपल्याला माहीत असलेल्या एखाद्या कपीपासून माणूस उत्पन्न झाला अथवा क्रमविकासाच्या मार्गावर असताना कोणत्या तरी कपीपासून मानवाची उत्पत्ती झाली, असा नव्हे. याचा अर्थ एवढाच की, भूवैज्ञानिक कालगणनेच्या दृष्टीने फार प्राचीन नसलेल्या कोणत्या तरी काळात माणूस व कपी यांचा पूर्वज एक असावा.

 पहा : ओरँगउटान गिबन गोरिला चिंपँझी मानवप्राणि.

संदर्भ : 1. Burton, M. and others, Larouse Encyclopedia of Animal Life, London, 1976.

             2. National Geographic Society, Book of Mammals, 2 Vols., Washington, 1981.

             3. Walker, E. P. and others, Mammals of the World, Vol I, Baltimore,1964.

जोशी, मीनाक्षी.