मानवतावाद :मानवी जीवनमूल्ये ही अंतिम मूल्ये होत हे मानवतावादाचे प्रथम सूत्र आहे. मानव हा शिक्षणाने स्वतःला बदलणारा आणि विकसित होणारा असा प्राणी आहे : स्वतःचे हित साधणे अथवा न साधणे या बाबतीत त्याला स्वातंत्र्य आहे मानवाच्या हातातच त्याचे भवितव्य आहे या जगातील त्याचे जीवन म्हणजे इतिहास एतिहासिक परिस्थिती निर्माण करण्याचे अथवा बदलण्याचे त्याला स्वातंत्र्य म्हणजे शक्ती आहे. सत्यासत्य, हिताहित, नीतिअनीती, पवित्रापवित्र आणि व्यापक अर्थाने योग्य आणि अयोग्य काय याचा निर्णय होत असतो तो मानवीच असतो मानवच सर्व अस्तित्वाचा मानदंड आहे. अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित झालेले आंदोलन मानवतावादी होय आणि अशा विचारसरणीचे मूलगामी समर्थन करणारे तत्वज्ञान मानवतावाद होय.

मानवतावादी आंदोलनाचा प्रारंभ यूरोपच्या प्रबोधनकालात झाला. प्रबोधनकाल म्हणजे चौदावे, पंधरावे व सोळावे अशी ही तीन शतके होत. मध्ययुगीन धार्मिक ख्रिश्चन पुरोहितशाहीच्या बंधनातून मुक्त झालेल्या, मानवी जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभलेल्या व्यक्ती या प्रबोधन युगामध्ये वावरू लागल्या. या युगात माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि वर्तनक्रमाला नवी दिशा प्राप्त झाली मानवी महिम्याचे, त्याच्या अपरंपार सर्जनशक्तीचे दर्शन होऊ लागले. या युगातील या विशिष्ट व्यक्तींनी यूरोपच्या प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीतील मानवी कतृत्वाचे दर्शन घेतले. त्यातूनच नवनिर्मितीची स्फूर्ती झाली. त्या प्राचीन युगाचेच अनुकरण करीत असता त्याची प्रतिकृती निर्माण न होता नवा इतिहास घडू लागला. काव्य, नाटक, कला, तंत्रविज्ञान या सर्वांना नवे रूप येऊ लागले. शिक्षणाला नवी दिशा मिळाली. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या शिक्षणाच्या चौकटीत न बसणारा मानव्यविद्यांचा शिक्षणक्रम अंमलात येऊ लागला. माणसाच्या ऐहिक जीवनमूल्यांवर भर देणारा असा शिक्षणाचा कार्यक्रम अंमलात आणणे हा या आंदोलनाच्या कार्यक्रमाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग होता.

प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचे मौलिक अध्ययन सुरू झाले. ग्रीक व लॅटिन या भाषांमधील प्रमाणित ग्रंथसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागली याचे कारण मानवी शिक्षणाचे एक श्रेष्ठ साधन म्हणजे पुस्तके भराभर छापणारा छापखाना ⇨ योहान गूटेनबेर्क (१३९८?–१४६८) या जर्मन तंत्रज्ञ कारागिराने शोधून काढला. हे भराभर छापणारे छापखाने उभारले जाऊ लागले. त्यामुळे जुन्या विचारांचे अध्ययन होऊन ⇨ प्लेटो व ⇨ ॲरिस्टॉटल यांच्या विचारसरणीची मानवतावादाशी सुसंगत आणि विज्ञानविकासास पोषक अशी मांडणी होऊ लागली. ⇨ पीत्रार्क (१३०४–७४) आणि ⇨ लोरेंत्सो व्हाल्ला (१४०६–५७) यांनी धार्मिक मानवतावादाचा पुरस्कार केला आणि चर्चचे वैचारिक आधिपत्य नाकारले. चर्चच्या विचाराप्रमाणे “ऐहिक जीवन पापमय असल्यामुळे माणसाला त्याच्याबद्दल घृणा वाटली पाहिजे आणि पश्चात्ताप व्हावयास पाहिजे मृत्यूनंतरच्या पारलौकिक जीवनाबद्दल चिंता वाटून पापमुक्तीची ओढ मनाला लागली पाहिजे, या वैराग्यप्रधान विचाराची मध्ययुगीन यूरोपीय समाजावर जबरदस्त पकड बसली होती. धार्मिक मानवतावादाने ही पकड क्रमाक्रमाने ढिली केली.

मानवतावादाच्या प्रभावाखाली प्लेटोच्या व ॲरिस्टॉटलच्या विचारांना निराळा आकार प्राप्त झाला. पीको आणि फिचीनो यांनी ख्रिस्ती धर्माच्या तत्वज्ञानाची नवी मांडणी केली. ख्रिस्ती देवविद्या वा ⇨ धर्मविद्या, प्लेटोचे तत्त्वज्ञान आणि मानवी ऐहिक मूल्ये यांचा समन्वय या दोघांनी केला. प्लेटोचे बुद्धिगम्य, शाश्वत व मंगलमय सत्य आणि मनुष्याच्या मनातील आदर्शाची ओढ यांचा अतूट संबंध त्यांना दिसला. कलापूर्ण जीवनाचे समर्थन या अतूट संबंधातून मिळाले. ख्रिस्ती धर्मातील ऐहिक जीवनाची पापमूलकता आणि पापभयता यामुळे नाकारता आली. या आदर्शाच्या ओढीच्या सिद्धांताचाच उपसिद्धांत म्हणजे मानवी ⇨ स्वातंत्र्य होय.


या मानवतावाद्यांना दिसले, की मनुष्य हा आपले स्वातंत्र्य शाबित करतो ते इतिहास घडवून, राजकीय उलथापालथी, विशाल कार्यक्षम राज्यांच्या रचना, न्याय आणि कायद्याची अंमलबजावणी, शुद्ध नैतिक जीवन जगण्याकरता अंतिम त्याग करण्याची माणसांची तयारी, महाकाव्याची निर्मिती, विशाल कलाकृती, आनंदमय जीवन करणारे संगीत व नृत्य यांत मानवी स्वातंत्र्याचे आविष्कार दिसतात. माणसाला समाज बदलता येतो निसर्गही बदलता येतो. जोव्हानी पीको देल्ला मिरांदोला (१४६३–९४) याने मानवी महिम्यावर प्रवचन केले. मानवाच्या ठिकाणी असलेले स्वातंत्र्य ईश्वराची देणगी आहे, असे तो म्हणतो. त्याच्या पुस्तकातील एक गाजलेला संदर्भ असा: “आदमला देव म्हणतो, विश्वातील सर्व वस्तू आणि प्राणी यांना ठराविक, निश्चित स्वभाव प्राप्त झालेला आहे. त्यांना अगदी नियमांच्या बंधनातच जगावे लागते. तुलाच केवळ मर्यादा नाहीत. तू स्वतःला पाहिजे तर बंधन घालतोस नको तेव्हा काढून टाकतोस असे हे इच्छास्वातंत्र्य मी तुला दिले आहे. विश्वाच्या केंद्रस्थानी मी तुला स्थापिले आहे.”

निसर्गाशी मानवी जीवनाचा सुसंवाद: मनुष्य हा निसर्गाचा भागच आहे. म्हणून मानव या नात्याने निसर्गाची उपेक्षा त्याला करता येणार नाही. निसर्गात तो नांदत आहे. म्हणून निसर्गापासून आनंद घेणे आणि नैसर्गिक आपत्तींशी झगडत राहणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गावे, नगरे आणि राज्ये निर्माण करून मनुष्य जगतो याचे कारण आपत्तींना तोंड द्यावयाचे असते आणि जीवनातील सौख्ये संपादन करावयाची असतात. सद्‌गुण सद्‌गुण म्हणून म्हणतात म्हणजे काय? ऐहिक सुखांचाच हिशेब करून सद्‌गुण ठरतो. जीवनात जे उपयुक्त आहे ते सतत मिळवत राहणे व संकटे उत्पन्न होणार नाहीत आणि उत्पन्न झाली तरी त्यांतून उत्तीर्ण होणे याचे गणित करीत असतानाच ⇨ सद्‌गुण याचा अर्थ लागतो. वैद्यक, कायदा, उपयुक्त व आनंदजनक कला, साहित्य आणि वक्तृत्व या माणसाच्या गरजा आहेत. या गरजा सद्‌गुणांच्या उपासनेतच सिद्ध होतात. गृहस्थी जीवन जगणाऱ्यानीच ख्रिस्ताची विशेष भक्ती केली आहे संसारातून निवृत्त झालेल्या बैराग्यानी नव्हे आणि त्यांच्या मठांनीही नव्हे.

मानव राजकीय प्राणी : ॲरिस्टॉटलच्या नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्रविषयक ग्रंथांना प्रबोधनकालात अधिक महत्त्व आले. मनुष्य हा सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे म्हणून सामाजिक आणि राजकीय व्यवहारांना बैरागी मठवासींच्या धार्मिक व्यवहारांपेक्षा अधिक महत्त्व आहे. पैशाला जीवनात फार महत्त्व आहे. आर्थिक व्यवहाराला कमी महत्त्व देणे म्हणजे मानवी स्वभावाचे अज्ञान प्रकट करणे होय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन हा मानवी जीवनाचा गाभा आहे, या विचाराला प्रबोधनकालात महत्त्व आल्यामुळे ⇨ नीक्कोलो मॅकिआवहेली (१४६९–१५२७) याच्यासारखा नवीन राज्यशास्त्राचा वाया घालणारा तत्त्वज्ञ निर्माण झाला.

मानव इतिहासाचा निर्माता: प्रबोधनकालातील मानवतावादी यांचे फार दूरच्या म्हणजे त्यांच्यापूर्वी सहस्त्र वर्षांच्या पलीकडच्या प्राचीन काळाकडे लक्ष वेधले त्यामुळे देशकाल, भौगोलिक परिस्थिती आणि घटनांचा कालक्रम यांच्या ज्ञानाला महत्त्व येऊ लागले. त्याकरता भाषांचा अभ्यास खोलपणाने सुरू झाला. खरा प्लेटो आणि खरा ॲरिस्टॉटल शोधण्यात त्यांना आनंद वाटू लागला. प्राचीन लॅटिन आणि ग्रीक भाषांच्या अध्ययनाने जनभाषांची शैली सुरेख बनू लागली तिचा खडबडीतपणा जाऊ लागला. जुन्या ग्रंथांच्या आणि कागदपत्रांच्या शुद्ध प्रती करण्याचा दृष्टिकोन उजळू लागला. इतिहासाची रचना करायची म्हणजे इतिहासाची खरीखुरी साधने तपासून तयार करावयाची. अशी ऐतिहासिक साधने शोधणे, तपासणे आणि नीट रीतीने प्रसिद्धीस आणणे या गोष्टीला आधुनिक संस्कृतीमध्ये जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याचा खराखुरा नेटाने प्रारंभ या प्रबोधनकालीन मानवतावादी आंदोलनात झाला आहे.

इतिहासातील व्यक्तींचे स्वभावविशेष, त्यांची जीवनपद्धती, त्यांचे गुणदोष यांच्या माहितीची उपेक्षा मध्ययुगात होत होती. प्रबोधनकालापासून याचे महत्त्व पटू लागले. मानवी व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या सर्वांगीण जीवनप्रवृत्तींना, त्याच्या पापपुण्यांना, सत्‌प्रवृत्ती आणि दुष्ट प्रवृत्ती यांना चित्रित करून वर्तमान आणि भावी जगाला त्याची कायम आठवण राहील असे करणे हा या प्रबोधनकालातील मानवतावादाचा एक कार्यक्रम ठरला. [⟶ इतिहासाचे तत्त्वज्ञान].


धार्मिक सहिष्णुता : धर्मचिंतनाला या मानवतावादाने नवी दिशा दिली. धर्म हे भ्रांतिचक्र आहे आणि सामान्य जनता त्याच्यात कायम फसून परलोकवादी बनते. म्हणून केवळ इहवादाचाच पुरस्कार केला पाहिजे ह्या आधुनिक विचाराचे महत्त्व मानणारे मानवतावादी प्रबोधनकालात फार थोडे होते. मानवी स्वातंत्र्याची जोपासना करण्याकरता ईश्वर, ईश्वरी संकेत, परलोकगामी आत्मा, अमरत्व इ. धार्मिक तत्त्वांचा आदर करून या धार्मिक तत्त्वांचे मनुष्याचा ऐहिक जीवनात माणसाच्या कर्तृत्वाला, कार्यक्षमतेला आणि स्वातंत्र्याला पोषक अशा स्वरूपात चिंतन सुरू झाले. माणसाच्या सामाजिक जीवनाला पोषक असा विचार महत्त्वास आला त्याबरोबरच धार्मिक असहिष्णुता नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला. परस्परविरोधी धर्मपंथांना सारखाच जगण्याचा अधिकार आहे, या धर्मसहिष्णुतेच्या तत्त्वाचा पुरस्कार होऊ लागला. गियानोत्सी मानेट्टी (१३९६–१४५९) याने आपल्या ग्रंथाच्या द्वारे जाहीर केले, की ⇨ बायबल हे केवळ मनुष्याच्या मृत्यूनंतरच्या पारलौकिक सुखाचीच हमी देत नाही, तर ऐहिक जीवनात योग्य ती कर्तव्ये बजावली म्हणजे या कर्तव्याचे फळ येथेच सुखी जीवनाच्या रूपाने मिळते. सामाजिक, राजकीय जीवनात आपापली कर्तव्ये बजावणे हेच खरेखुरे धार्मिक जीवन आहे, असे लोरेंत्सो व्हाल्ला हाही सांगतो.

विश्वशांती स्थापन करणे हे धर्माचे कार्य असले पाहिजे म्हणून भिन्नभिन्न धर्मसंप्रदायांमधील विग्रह संपले पाहिजेत त्यांच्यात सहिष्णुता आली पाहिजे. कारण सगळ्या धर्मांची व संप्रदायांची मौलिक एकता मान्य व्हावयास पाहिजे आणि तशी ती मौलिक एकता आहेच. मार्सील्या फिचीनो (१४३२–९३) या धार्मिक मानवतावाद्याने आपल्या ग्रंथात म्हटले आहे, की बायबल म्हणजे ख्रिस्ताचा शब्द हा शब्द ख्रिस्तापूर्वीच्या जगातील साधुपुरुषांचे जे तत्त्वज्ञान होते, त्यातील विवेकाचा आविष्कार होय. हा विवेकच सगळ्या धर्माच्या मुळाशी आहे. [⟶ धर्म].

विज्ञानयुगाचा प्रारंभ : धार्मिक विचारांमधला व श्रद्धांमधला आग्रहीपणा आणि हेकेखोरपणा हा मनुष्याचे विचारस्वातंत्र्य नष्ट करतो. प्रबोधनकालात मानवतावादाने हे वैचारिक स्वातंत्र्य त्या वेळच्या उच्च वैचारिक जीवनामध्ये एक श्रेष्ठ मूल्य म्हणून प्रसृत केले. त्यामुळे बायबलप्रमाणेच निसर्ग किंवा नैसर्गिक विश्व हेही देवाचे पवित्र पुस्तक आहे, असा विचार महत्त्वाचा ठरला. विश्वाबद्दलचे प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्यांचे विचार अभ्यासाचे विषय बनले. पायथॅगोरियन सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत वाचण्यात आला. त्यामुळे पृथ्वीकेंद्रित विश्व हा विचार बरोबर आहे की नाही, अशी शंका उत्पन्न झाली. आर्किमिडीज, हिपॉक्राटीस इत्यादिकांचे विश्व आणि जीवन यांबद्दलचे विचार तपासण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. निसर्ग हा देवाचे पुस्तक असून त्यातील अक्षरे म्हणजे गणिताचे धडे होत, हा विचार ⇨ लिओनार्दो दा व्हींची (सु. १४५२–१५१९), ⇨ निकोलेअस कोपर्निकस (१४७३–१५४३) आणि ⇨ गॅलिली गॅलिलीओ (१५६४–१६४२) यांनी महत्त्वाचा सिद्धांत म्हणून स्वीकारला आणि त्यामुळे मनुष्यलिखित ग्रंथांना दुय्यम महत्त्व प्राप्त झाले. निसर्गाचा साक्षात बोध करून घ्यायचा त्याकरता अवलोकन आणि प्रयोग करीत रहायचे त्यावरून गृहीतकांच्या संकल्पना मांडायच्या, अशा या वैज्ञानिक प्रवृत्तीला मुख्य स्थान शिक्षणास प्राप्त झाले विज्ञानदृष्टीचा आणि पद्धतीचा पाया घातला गेला. तेव्हापासून विज्ञानाचा अखंड विकास सुरू झाला. तंत्रज्ञान आणि शुद्ध विज्ञान या दोन्ही प्रवृत्ती अखंड चालू राहिल्यामुळे आधुनिक विज्ञाननिष्ठ संस्कृती जन्माला आली. औद्योगिक क्रांती झाली. मानवसमाजाच्या जीवनाचे आर्थिक अधिष्ठान म्हणजे नित्य विकसित होणारे, बदलत जाणारे नवे तंत्रज्ञान हे लक्षात आले. त्यातून मानवसमाजाचे या पृथ्वीवरचे आदर्श जीवनाचे चित्र निर्माण करणाऱ्या विविध प्रकारच्या समाजवादी विचारसरण्या निर्माण झाल्या. त्यात ⇨ कार्ल मार्क्स (१८१८–८३) यांचा साम्यवाद वा ⇨ मार्क्सवाद हा एक आधुनिक मानवतावादाचाच आविष्कार अधिक प्रभावी ठरला.

पहा : अस्तित्ववाद कासीरर, एर्न्स्ट काँत, ऑग्यूस्त नवमानवतावाद निसर्गवाद-१ नीत्शे, फ्रीड्रिख व्हिव्हेल्म प्रबोधनकाल फलप्रामाण्यवाद मारीतँ, झाक शिलर, फेर्डिनांट कॅनिंग स्कॉट विज्ञानाचे तत्त्वज्ञान शैक्षणिक पद्धति सार्त्र, झां पॉल हायडेमर, मार्टिन.

संदर्भ : 1. Cassirer, Ernst Trans. Individual and Cosmos in Renaissance Philosophy, New York, 1963.

           2. Jaeger, Werner, Humanism and Theology, Milwaukee, Wis., 1943.

           3. Sartre, Jean-Paul Trans. Existentialism and Humanism, London, 1948.

           4. Schiller, F. C. S. Humanism, London, 1903.

           5. Schiller, F. C. S. Studies in Humanism, London, 1907.

जोशी, लक्ष्मणशास्त्री