मानचित्रकला : (कार्टाग्रफी). प्रत्यक्ष भूमापनापासून ⇨ नकाशाच्या छपाईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अथवा संक्षेपाने नकाशाचे आरेखन म्हणजे मानचित्रकला किंवा नकाशाशास्त्र. नकाशा तयार करणे ही एक कला असून तिच्याद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध भौगोलिक व सांस्कृतिक दृश्ये (उदा., पर्वत, नद्या, सागरकिनारे, रस्ते, कालवे, खेडी इ.) सपाट पृष्ठभागावर लहान प्रमाणात, शक्य तितक्या अचूकपणे वेगवेगळ्या पद्धतींनी दाखविता येतात. या पद्धतींचे सुसंगत विवरण मानचित्रकलेमध्ये विशद केले जाते. याशिवाय नकाशाच्या वापराचे कौशल्य, मानचित्रकलेच्या इतिहासाचा अभ्यास, नकाशासंग्रहांचे संधारण व त्यांचे सूचिलेखन, संदर्भग्रंथांचे संकलन व त्यांच्या सूचीचे कार्य, नकाशांत सांख्यिकीय माहिती दर्शविण्याच्या पद्धती, नकाशाचे प्रमाण, तसेच चार्ट, ॲटलास वगैरे उपविषयांच्या अभ्यासाचाही यात समावेश होतो.

मानचित्रकलेचा इतिहास प्राचीन असून त्या काळी दैनंदिन गरजांतून नकाशे तयार करण्याची जरूरी निर्माण झाली असावी (उदा., युद्धाच्या किंवा शिकारीच्या जागा, वसतिस्थाने, प्रवाशांना मार्गदर्शक वाटा इ. मर्यादित प्रदेश). त्यामुळे एस्किमो, बेदूईन यांसारख्या अप्रगत जमातींतील लोकांतही मानचित्रकलेचे कौशल्य जात्याच असल्याचे, त्यांच्या काही नकाशांवरून दिसून येते. चिनी, भारतीय, इराणी इ. संस्कृतींमध्येही नकाशे काढले जात असत, परंतु ग्रीक संस्कृतीत या शास्त्राची खरी भरभराट झाल्याचे आढळते. नकाशे काढण्याची वेगवेगळी तंत्रे, प्रक्षेपणांसंबंधीच्या संकल्पना आणि प्रत्यक्ष नकाशात अंतर्भूत करावयाची माहिती या नकाशाशास्त्रातील तिन्ही मुख्य बाबींचा पाया ग्रीकांनी घातला, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. भूमितीतील प्रगती, चिकित्सक दृष्टी यांमुळे ग्रीक नकाशाशास्त्राची खूप प्रगती झाली. अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते या काल्पनिक रेषांचा उपयोग नकाशे तयार करण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी केला असे दिसून येते. मानचित्रकलेच्या प्रगतीत इ. स. पू. दुसऱ्या-तिसऱ्या शतकांतील एराटॉस्थीनीझ, पॉसिडोनिअस या व्यक्ती महत्त्वाच्या मानल्या जातात. ईजिप्तमधील क्लॉडियस टॉलेमी या भूगोलशास्त्रवेत्याने आपल्या काही हस्तलिखितांत नकाशा काढण्याच्या तांत्रिक अंगांची विस्तृत चर्चा-तत्कालीन नकाशाशास्त्राचे वर्णन-केलेली आहे. त्याच्या वर्णनात त्याने अनेक स्थानांचे अक्षांश व रेखांश दिलेले असून त्यांच्या साहाय्याने नकाशे काढावेत, याचे वर्णन केलेले आहे. भूमध्य समुद्राचे वाढविलेले क्षेत्रफळ, सहारा प्रदेशात दाखविलेली नदी या ढोबळ चुका जरी त्यात असल्या, तरी त्या वर्णनांच्या आधारानेच पुढे अनेक वर्षांपर्यंत नकाशे तयार करण्यात आले त्यामुळे टॉलेमी हा आद्य नकाशाशास्त्रज्ञ मानला जातो. त्याने प्रत्यक्ष भूसर्वेक्षण केले नसले, तरी नकाशा तयार करण्यास आवश्यक ती माहिती ठिकठिकाणांहून गोळा केली. टॉलेमीनंतर सु. १००० वर्षांपर्यंत त्याची हस्तलिखिते पाश्चात्यांना अज्ञात होती पण अरबांनी मात्र त्यांचा उपयोग करून घेतला होता. यांदरम्यानच्या काळात रोमनांनी लष्करी मोहिमा, शेतजमिनीचे क्षेत्र दर्शविणे व शेतसाऱ्यांची आकारणी करणे यांसाठी काही नकाशे तयार केले होते परंतु त्यांच्या नकाशांस शास्त्रीय बैठक नव्हती. जगाचेही काही नकाशे तयार करण्यात आले, पण ते फक्त बायबलसारख्या धर्मग्रंथाच्या स्पष्टीकरणापुरतेच मर्यादित होते. त्यामुळे या काळात मानचित्रकलेची फारशी प्रगती झालेली दिसत नाही. अपवाद म्हणून इटालियन व कॅटॅलन (पूर्व स्पेनमधील दर्यावर्दी लोक) यांनी तेराव्या शतकानंतर नौकानयनाकरिता काही चांगल्या समुद्रपटांची निर्मीती केली होती. इ. स. १००० नंतरच्या पहिल्या काही शतकांत यूरोपमध्ये अनेक परिवर्तने घडून आली. याच काळात धर्मयुद्धे गाजली. मार्को पोलो, क्रिस्तोफर कोलंबस, फर्डिनंड मॅगेलन यांसारख्यांनी दूरवरचे प्रवास केले व त्यांतूनच लांबच्या ठिकाणी दळणवळणासाठी मार्ग शोधले गेले. पंधराव्या शतकात टॉलेमीची हस्तलिखिते पाश्चात्त्यांना ज्ञात झाली. या सर्व घटनांमुळे नकाशाशास्त्राला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. सोळाव्या शतकाच्या सुमारास नकाशाशास्त्राला फार मोठी शास्त्राय बैठक नव्हती, तरी यूरोपमध्ये खोदकामाचा व मुद्रणकलेचा शोध लागल्याने नकाशांच्या अनेक प्रती काढणे शक्य होऊ लागले. त्यापूर्वी प्रत्येक नकाशा अतिशय कष्टाने व हाताने काढावा लागत असे. गेर्‍हार्ट मर्केटर (१५१२–९४), व्हिलेम यानसन ब्लाऊ (१५७१–१६३८), योडोकुस हाँडिअस (१५६३–१६११) यांनी या काळात केलेले कलात्मक नकाशे हे नकाशाशास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. त्यांनी त्यांच्या नकाशांत नद्या, समुद्रकाठ, शहरे, पर्वतश्रेणी इत्यादींबरोबर प्राणी, जहाजे, माणसे यांची सुरेख चित्रे काढलेली दिसून येतात. मात्र धार्मीक स्थळांची आणि जलपर्यटनासाठी आवश्यक ती माहिती सोडल्यास या नकाशांत इतर भौगोलिक माहिती फारशी नसे. त्या काळी निरनिराळ्या ठिकाणांचे निश्चित भौगोलिक स्थान आणि इतर गोष्टींची भौगोलिक मांडणी यांसाठी आवश्यक तेवढे भूसर्वेक्षणही झालेले नव्हते.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस नकाशे तयार करण्यात शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण झालेला दिसून येतो. या शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंच अकादमीची स्थापना झाली. विविध रेखावृत्तांवरील एका अंशात आढळणारी लांबी या अकादमीने प्रयोगाद्वारे ठरविली. अकादमीच्या या कार्यामुळे पृथ्वीची विषुववृत्तीय त्रिज्या तिच्या धृवीय त्रिज्येपेक्षा मोठी असल्याचे सिद्ध झाले. फ्रेंचांनी नकाशाचे प्रमाण ठरवून (१ इंचास १ पूर्णाक १/४) त्यांच्या प्रदेशाचे शास्त्रीय पद्धतीने तपशीलवार भूसर्वेक्षण करण्यास प्रारंभ केला आणि हे काम अठराव्या शतकाअखेरीस पूर्ण केले. १७३५ मध्ये जॉन हॅरिसनने (१६९३–१७७६) विकसित केलेल्या विकसित केलेल्या ⇨ कालमापकामध्ये सुधारणा करून फ्रेंच घड्याळतज्ञ प्येअर ल रॉय (१७१७–८५) याने आधुनिक कालमापक बनविला (१७६५). रेखांश अधिक अचूक मोजण्यात कालमापकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला त्यामुळे पूर्वीचे बरेचसे भौगोलिक अज्ञात उजेडात आले. मानचित्रकलेतील प्रगतीमुळे जगातील इतर प्रदेशांची माहितीही नकाशांद्वारे दाखविण्यास चालना मिळाली. इंग्लंडमध्ये १७९१ मध्ये भूसर्वेक्षणास प्रांरभ झाला आणि त्यामागोमाग यूरोपातील तर देशांतही स्थलवर्णन नकाशे तयार होऊ लागले. जमिनीचा उंचसखलपणा नकाशात स्पष्टपणे दाखविण्यात येणाऱ्या अडचणींतूनच हॅच्युअर व ⇨ सम्मोच्य रेषा पद्धतींची निर्मिती होऊन त्याचा वापर नकाशांत करण्यात येऊ लागला. याबरोबरच सरकारी पातळीवर चार्टची निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. विशेषतः नौकानयनाच्या चार्टमध्ये (गंभीरता नकाशांसह) खूपच सुधारणा झाली. या मानचित्रकलेतील प्रगतीमुळे साधारण एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत यूरोप खंडाचा बराच मोठा भाग स्थलवर्णन नकाशांत दाखविला गेला.

या काळापर्यंतचे नकाशे शब्द प्रमाणावर (लांबीच्या परिणामात) आधारित होते व परिणामभिन्नतेमुळे एका देशातील नकाशा दुसऱ्या देशात समजणे कठीण जात असे. त्यामुळे दोन देशांतील नकाशांची तुलना करणे अथवा नकाशांचे प्रमाण सारखे करणे अवघड जात होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस बऱ्याच देशांत मेट्रिक परिणाम पद्धती रूढ झाली व नकाशांत शब्द प्रमाणाबरोबर संख्यात्मक प्रमाण किंवा प्रतिनिधिक अपूर्णांक पद्धती रूढ झाली. मानचित्रकलेतील या प्रगतीमुळे नकाशांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले.

स्थलवर्णन नकाशांबरोबर लहान प्रमाण असलेले काही नकाशे तयार होऊ लागले. याच सुमारास शिलामुद्रणकला वाढीस लागली. नकाशांच्या अनेक प्रती तयार करणे शक्य झाले. शास्त्रीय ज्ञानात वाढ होऊन त्यात अनेक शाखा निर्माण झाल्या आणि प्रत्येक शाखेसाठी लहानमोठ्या प्रमाणाच्या नकाशांची गरज भासू लागली. अनेक नवीन प्रक्षेपणे उपयोगात आणली जाऊ लागली. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस रंगीत नकाशे शिलामुद्रण पद्धतीने छापले जाऊ लागले. या संदर्भात ग्रेट ब्रिटनमधील बार्थालोम्यू आणि जर्मनीमधील पेंर्टस ही दोन घराणी उल्लेखनीय आहेत. बर्लिन येथे भरलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय भूगोलज्ञांच्या परिषदेमध्ये आल्‌ब्रेख्त पेंग्‌क (१८५८–१९४५) या भूगोलज्ञाने जगाचे आंतरराष्ट्रीय नकाशे काढण्याची सूचना केली व १ : दक्षलक्ष या प्रमाणावर जगाचे नकाशे काढावयास सुरूवात केली (१८९१).


विसाव्या शतकातील नकाशाशास्त्र : या शतकात नकाशाशास्त्रात क्रांतिकारक बदल झाले आहेत. जवळजवळ संपूर्ण जगाची इत्यंभूत माहिती आता नकाशावर दाखविता येते. ही माहिती मिळविण्याची तंत्रेही बदलली आहेत. आता प्रत्यक्ष भूसर्वेक्षण न करता विमानातून काढलेल्या छायाचित्रांवरून नकाशे काढता येऊ लागले असून त्यांतून छायाचित्रण-भूमापिकीसारख्या नव्या शाखांचा जन्म झाला आहे. कृत्रिम उपग्रहांद्वारे ⇨ दूरवर्ती संवेदनाग्रहण तंत्राने मोठ्या प्रमाणावर भूपृष्टाची माहिती घेऊन तिच्या आधारे जलदगतीने विविध नकाशे तयार करण्यात येत आहेत. संगणकाचा उपयोग नकाशाशास्त्रात होऊ लागला असून त्यासाठी प्रथम उपलब्ध माहितीचे अंकीय रूपांतर करण्यात येते. ती माहिती सूचनांसह संगणकाला पुरवून नकाशे तयार करतात. माहिती चुंबकीय फितीवर नोंदवून जरूरीप्रमाणे तीत बदल करता येतात. संगणकात व्हिडिओ कॅसेटद्वारे नकाशे साठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुद्रणकलेतील छायाक्षरजुळणी तंत्राने नकाशावर नावे चिकटविण्याकरिता एकसारखी छपाई असणारी ब्रोमाइडे उपलब्ध झाल्यामुळे कोरीव फर्मा वापरून नावे लिहिण्याची कष्टप्राय पद्धत टाळता येऊ  लागली. प्रतिरूप मुद्रणपद्धतीने नकाशे छापणेही सोईस्कर झाले.

मानचित्रकलेच्या अनुषंगाने प्रामुख्याने दोन गोष्टी पुढे येतात : एक म्हणजे मोठ्या प्रमाणाचे स्थलवर्णन नकाशे आणि दुसरे लहान प्रमाणाचे नकाशे तयार करणे. या दोहोंसाठी सर्वेक्षण, आलेखन आणि सुंदर मुद्रण हे तिन्ही टप्पे महत्त्वाचे आहेत. मोठ्या प्रमाणाचे नकाशे तयार करणारे लोक भूसर्वेक्षण करून अथवा आकाशातून छायाचित्रे घेऊन नकाशे तयार करतात. पृथ्वीचा आकार, समुद्रसपाटीवरील उंची, जमिनीचा उंचसखलपणा इ. गोष्टींशी या लोकांचा संबंध येतो. निरनिराळ्या देशांत ज्या राष्ट्रीय सर्वेक्षण संस्था, राष्ट्रीय भूमिकार्यालये किंवा लष्करी सर्वेषण संस्था आहेत, त्या संस्थांतील लोक या गटात मोडतात.

लहान प्रमाणाचे नकाशे करणारे प्रत्यक्षात सर्वेक्षण करून नकाशे तयार करत नसले, तरी अगोदर उपलब्ध असणाऱ्या नकाशांतील आवश्यक ती माहिती निवडून त्यांच्याद्वारे निरनिराळ्या घटकांचे परस्परसंबंध दाखविणारे (जसे पर्जन्यमान आणि शेती यांचे वितरण) काही ठोकळ नियम ते दर्शवितात. या गटातील लोकांत इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, भूगोलज्ञ हे लोक येतात. ते हवामानाचे, शेतीविषयक, राजकीय किंवा दळणवळणाचे नकाशे तयार करतात.

नकाशा काढताना त्रिमिती पृथ्वीवरची माहिती दोन भिंतींच्या सपाट कागदावर दाखवायची असल्याने काही जुळवाजुळव करावी लागते. त्यासाठी भूमितीचा उपयोग करून वृत्तांची जाळी तयार करण्यात आली आहे, तिला प्रक्षेपण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्टभागावरील अंतरे, सापेक्ष दिशा, प्रदेशांचे क्षेत्रफळ आणि आकार इ. जसे दिसतात तसेच नकाशांत दाखविणे शक्य होत नाही पण योग्य ते प्रक्षेपण वापरल्यास यातील दोषांचे प्रमाण बरेच कमी करता येते. म्हणून नकाशा तयार करण्यास प्रक्षेपणाचे ज्ञान व त्यासाठी गणिताचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नकाशा काढण्यापूर्वी त्याचा उद्देश ठरविणे महत्त्वाचे असते (उदा., दळणवळणाचे मार्ग, खनिज उत्पादने इत्यादी).

मानचित्रकाराला त्या देशाची प्राथमिक माहिती (नद्या, समुद्रकिनारा, सरहद्दी इ. महत्त्वाच्या गोष्टी) असणे आवश्यक असते. तिच्या साहाय्याने तो अगोदर आधार नकाशा तयार करतो आणि मग त्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याला जी माहिती दाखवावयाची असते ती दाखवितो. नकाशा संग्रहातील नकाशा याच पद्धतीने तयार केलेले असतात.

ज्या विषयाचा नकाशा काढावयाचा असतो, त्या विषयाला धरून ठराविक महत्त्वाच्या गोष्टींची निवड करणे व छाननी करणे, हेही तितकेच महत्त्वाचे काम असते. त्यामुळे त्या गोष्टी नकाशात दाखविल्यावर नकाशाचा हेतू स्पष्ट होतो.

नकाशाशास्त्राचे तंत्र : पूर्वीच्या काळी नकाशा काढण्याचे शास्त्र अप्रगत असल्याकारणाने एका ठराविक पद्धतीनेच नकाशे तयार केले जात असत. वेळोवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आधुनिक काळात नकाशा काढण्याच्या अनेक पद्धती निघाल्या असून त्या प्रत्येकीची तांत्रिक बाजू प्रगत झाली आहे. नकाशा काढणारा प्रथम नकाशा काढावयाची योजना तयार करतो. कागदावर काय दाखवायचे आहे, याचा प्रथम विचार करून नंतर तो नकाशा उपयुक्त आणि त्यात दाखविणे शक्य होईल अशी माहिती गोळा करतो. ही माहिती गोळा केल्यावर नकाशाची जी तांत्रिक अंगे आहेत (उदा., प्रमाण, प्रक्षेपणे इ. गोष्टी की ज्यामुळे नकाशातील विषय अधिक प्रभावीपणे दाखविला जाऊ शकतो), त्यांचा साकल्याने विचार करतो. त्याच्या संकल्पना करणे आणि त्यांना मूर्त स्वरूप देणे (प्रत्यक्ष नकाशा काढणे) या भिन्न गोष्टी आहेत. नकाशाशास्त्र हे रसायनशास्त्रासारखे प्रयोगशास्त्र नाही, तसेच ते समाजशास्त्राप्रमाणे सत्य शोधण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण झाले नाही. तरीपण तर्कशुद्धता आणि कारणीमीमांसा यांचा उपयोग करून या शास्त्राचे तंत्र उभारले गेले आहे. शास्त्रशुद्ध माहितीचे विश्लेषण करून त्यावरच या शास्त्राची तत्त्वे आधारलेली आहेत. भूमापनशास्त्र, भूगोल आणि मानवशास्त्र या तिन्ही शास्त्रांच्या पायावर हे शास्त्र उभे आहे.

नकाशा तयार करताना दोन प्रमुख टप्प्यांचा विचार करावा लागतो : पहिल्या टप्प्यात सगळे संकल्पनारूपात असते. नकाशाचा उद्देश कोणता, त्याला सोईस्कर प्रमाण आणि प्रक्षेपण कोणती, त्यात कोणती माहिती आवश्यक आहे वगैरे बाबींचा विचार पहिल्या टप्प्यात येतो. साहजिकच मानचित्रकाराला भौगोलिक ज्ञान असावे लागते. उदा., नकाशात जर समुद्रकिनारा दाखवायचा असेल, तर किनाऱ्याचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये या सर्व गोष्टी त्याला माहित असायला पाहिजेत.

या संकल्पनांचा विचार करीत असताना मानचित्रकारास नकाशात माहिती प्रभावीपणे दाखविण्याची तंत्रे माहित असावी लागतात. या खेरीज नकाशात दाखविण्यासाठी जी माहिती गोळा केली जात असते, तिला पूरक अशी माहिती-शिरगणतीचे आकडे, आकाशछायाचित्रे, संदर्भग्रंथ इत्यादींमधून कशी गोळा करावी हे – त्याला माहीत असणे आवश्यक आहे. मानचित्रकार व चित्रकार यांच्यात याच टप्प्यात फरक आहे.

नकाशा काढण्याचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष नकाशात माहिती भरणे, हा असतो. ही माहिती विविध प्रकारच्या खुणा, चिन्हे, अक्षरे वापरून नकाशात दाखविली जाते.

नकाशात माहिती दाखविण्याच्या पद्धती : (अ) भूस्वरूपे व उठाव : कागदावर जमिनीवरील डोंगर, पठारे यांसारखी भूस्वरूपे व त्यांमुळे दिसणारा जमिनीचा उठाव दाखविणे अशक्य आहे. त्यासाठी नकाशात समोच्य रेषा, हॅच्युअर, रंगपद्धती, प्लॅस्टिक छाया यांबरोबर स्थलउच्चांक (बेंचमार्क) इ. पद्धतींनी उठाव दर्शविले जातात.

(१) समोच्च रेषा : समुद्रसपाटीपासून समान उंचीवरील स्थानांना जोडणाऱ्या रेषेस समोच्य रेषा म्हणतात. ज्या नकाशात भूस्वरूपे समोच्च रेषांनी दाखविली जातात, त्या नकाशास ‘समोच्च रेषा नकाशा’ म्हणतात. समोच्च रेषांतर जर मोठे असेल, तर लहानलहान टेकड्यांसारखी भूस्वरूपे समोच्च रेषांनी दाखविणे शक्य होत नाही. [⟶ समोच्च रेषा].

(२) हॅच्युअर : भूस्वरूपे हॅच्युअररेषांनी दाखविण्याची पद्धत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बरीच प्रचारात होती. ह्या पद्धतीमुळे भूस्वरूप लगेच समजत असल्याने अजूनही काही नकाशांत या पद्धतीचा उपयोग केला जातो.


हॅच्युअर या लहानलहान तुटक व समांतर रेषा होत. जेथे जमिनीचा उतार तीव्र असेल तेथे या रेषा दाट व जवळजवळ काढलेल्या असतात जमिनीचा उतार सौम्य असेल, तर त्या बारीक व विरळ काढलेल्या असतात. जमिनीच्या उताराच्या दिशेने त्या काढल्या गेल्या असल्याने स्वाभाविकपणे त्या भूभागाच्या खनन-रेषा म्हणून दिसून येतात. दोन हॅच्युअरमधील अंतर उताराच्या उन्नतांशाशी व अधःकोनाशी प्रमाणबद्ध असते. साधारणपणे उताराचा ४५° पेक्षा अधिक उन्नतांशाचा किंवा अधःकोनाचा भाग संपूर्णपणे काळा दाखविलेला असतो. याउलट सपाट जमीन पांढरी दाखविली जाते.

अठराव्या शतकाच्या अखेरीस जे. जी. लेमन या ऑस्ट्रियन सेनाधिकाऱ्याने ही पद्धत सर्वप्रथम प्रचारात आणली. त्याने सुचविलेल्या पद्धतीनुसार प्रत्येक सेंटिमीटर जागेमधील  तुटक-रेषांची संख्या ठराविक असते व उताराच्या अंशाप्रमाणे त्यांची जाडी गणिताच्या साहाय्याने ठरविली जाते. या पद्धतीने लहानलहान भूस्वरूपे दाखविणे शक्य होत नाही शिवाय ही पद्धत फार अवघड असल्याने हळूहळू ती प्रचारातून नाहीशी होत आहे.

(३) रंगपद्धती : लहान प्रमाणाच्या नकाशात समोच्च रेषांचे महत्त्व तितकेसे रहात नाही. समोच्च रेषांतर वाढल्यामुळे अनेक लहानलहान भूस्वरूपे दाखविणे अशक्य होते. अशा नकाशांत केवळ उंची दाखविणारी रेषा यापलीकडे तिला महत्त्व नसते, निरनिराळ्या उंचीच्या प्रदेशांसाठी निरनिराळे रंग वापरून जमिनीचा उठाव चांगल्या रीतीने दाखविता येतो.

समुद्रसपाटीवरील निरनिराळ्या उंचीसाठी निरनिराळे सांकेतिक रंग व त्यांच्या छटा वापरतात.

पुष्कळशा नकाशांत समोच्च रेषांची उंची मेट्रिक परिणामात दिलेली असते. अशा नकाशाचा अभ्यास करताना त्यात दिलेल्या रंग-सूची लक्षपूर्वक पाहणे आवश्यक असते. ऑस्ट्रियात तयार झालेल्या नकाशात ही रंग-पद्धती प्रथम उपयोगात आणली गेली. तेथे नद्यांकाठचा प्रदेश हिरवागार आणि पर्वत ओसाड व तापकिरी रंगांचे दिसतात. गेली शंभर वर्षे ही पद्धत प्रचारात असून ॲटलासमधील नकाशांत, भिंतीनकाशांत व विमानमार्ग दाखविणाऱ्या नकाशांत या पद्धतीचा उपयोग केला जातो.

या पद्धतीचे काही गुण तसेच काही दोषही आहेत. या नकाशात भूस्वरूपांसाठी योजलेली रंगसंगती अशा प्रकारची असते की, विमानातून प्रवास करणाऱ्याला, मानसशास्त्रीय दृष्ट्या, डोंगर प्रदेश त्याच्या जवळ आहेत व मैदानी प्रदेश त्याच्यापासून फार दूर आहेत असे वाटावे. या नकाशात मैदानी प्रदेश हिरव्या दाखविलेला असतो. याच प्रदेशात गावे, शेते इ. सांस्कृतिक स्वरूपे मोठ्या प्रमाणात असल्याने त्यासंबंधीची माहिती काळ्या शाईने हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर चांगल्या रीतीने छापता येते. नकाशाचे हे दोन गुण सोडल्यास अशा नकाशात या पद्धतीमुळे काही दोषही निर्माण होतात. हिरवा रंग जसा मैदानी प्रदेश दाखवितो, तसाच तो नैसर्गिक वनस्पतीही दाखवितो. त्यामुळे वाळवंटी प्रदेशांतील सपाट जमीन हिरव्या रंगाने दाखविल्यास नकाशांतून अनर्थही निघण्याचा संभव असतो. या दृष्टीने या पद्धतीत योग्य तो बदल करण्याचा विचार चालू आहे.

(४) प्लॅस्टिक छायापद्धती : एखाद्या प्रदेशाच्या उठावांचा नमुना तयार करून व त्यावर एका बाजूने प्रकाश टाकून त्याचे छायाचित्रण घेणे, हा त्या प्रदेशातील भूस्वरूपे दाखविण्याचा एक चांगला मार्ग आहे. उठावाच्या नमुन्याचा प्रकाशित भाग व काळा भाग (जो अंधारात येतो तो) रंगाच्या सहाय्याने नकाशात रेखांकित करता येतो. मात्र अशा नकाशाचा ठसा करण्यासाठी बिंदूचित्र जालपटलाचा (हाफटोन स्क्रिन)उपयोग करावा लागतो. त्याच्यामुळे ठशामधील नकाशाच्या कोऱ्या (प्रकाशित भाग) भागात जे अवांछनीय परिणाम निर्माण होतात, ते रॉस बोर्ड कागदाचा उपयोग नकाशात केल्यास टाळता येतात. नकाशातील सपाट जमीन दाखविण्यासाठी त्या ठिकाणी करड्या रंगाचा कागद किंवा प्लॅस्टिक कागद वापरल्यास नकाशाचा ठसा अधिक परिणामकारक होतो. उठावाच्या नमुन्यावर प्रकाशाचा झोत वायव्येकडून येत आहे, अशी कल्पना असल्याने अशा नकाशातील भूस्वरूपांचा वायव्याभिमुखी भाग नेहमी प्रकाशित असतो व आग्नेयाभिमुखी भाग छायांकित असतो. ज्या दिशेने प्रकाश येतो, त्या दिशेला हे दोन्ही भाग समांतर गेलेले दाखवावे लागतात.

(५) वर सांगितलेल्या पद्धतींशिवाय इतर काही पद्धतींचा उपयोग जमिनीचा उठाव दाखविण्यासाठी कधीकधी करतात. नकाशात स्थलउच्चांक योग्य त्या ठिकाणी दाखवून प्रदेशाची समुद्रसपाटीपासून ठिकठिकाणची उंची किती आहे, ते दाखविता येते किंवा आकार-रेषा काढून नकाशात भूस्वरूपांचे यथादर्शन दाखविता येते. पण या दोन्ही पद्धती परिपूर्ण नाहीत. भूस्वरूपांच्या चढउतारांची कल्पना त्यामुळे स्पष्ट होत नाही, म्हणून या पद्धतींचा उपयोग भूस्वरूपे दाखविण्यासाठी स्वतंत्रपणे क्वचितच केला जातो.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या काही भूगर्भशास्त्रज्ञांनी जमिनीचा उठाव नकाशांत दाखविण्यासाठी काही रेखाचित्रांचा तसेच भरीव चित्रांचा उपयोग केला. भरीव चित्रांच्या समोरच्या बाजूस जमिनीची घडण व मांडणी दाखविलेली असते व त्यांच्या वरच्या (पृष्टभागावर) भूस्वरूपे दाखविली जातात. भूप्रदेशाकडे वरून न बघता तिरक्या बाजूने (४५° कोनातून) बघितल्यास ती जशी दिसतील, तशी अशा प्रकारच्या प्राकृतिक नकाशांत दाखविलेली असतात. मानसशास्त्रीय दृष्ट्या भूस्वरूपाचे हे नकाशे अधिक बोलके असतात. भूस्वरूपांसाठी निरनिराळी चिन्हे वापरली जातात. त्यांचा आकार नकाशाच्या प्रमाणानुसार बदलतो. भूस्वरूपासाठी चिन्हांचा उपयोग केवळ लहान प्रमाणाच्या नकाशांसाठीच करतात.

(आ) सांख्यिकीय आकृती : एखाद्या प्रदेशाची एका ठराविक विषयावर मिळालेली आकडेवारी माहिती निरनिराळ्या पद्धतींनी नकाशात अधिक परिणामकारकरित्या दाखविता येते. कधीकधी ही माहिती आकृतीच्या साहाय्यानेही चांगली व्यक्त करता येते. जेव्हा एखादी आकडेवारी माहिती एकाद्या घटकाच्या भौगोलिक वितरणाशी संबंधित नसते, तेव्हा ती आकृतीद्वारे नीट मांडता येते. अशा आकृतीस ‘सांख्यिकीय आकृती’ असे म्हणतात. जेव्हा त्या माहितीचा एखाद्या घटकाच्या भौगोलिक वितरणाशी संबंध असतो, तेव्हा ती दाखविण्यासाठी नकाशा तयार करतात. अशा प्रकारच्या नकाशास ‘सांख्यिकीय नकाशा’ असे म्हणतात.


सांख्यिकीय आकृत्या दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारच्या आकृत्यांत दोन किंवा अधिक घटकांच्या परिमाणांतील संबंध दाखविलेला असतो. हा आंतरघटकीय संबंध आकृतीत निरनिराळ्या पद्धतींनी दाखविता येतो. योजलेल्या पद्धतीनुसार निरनिराळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होतात. या आकृत्या काढण्यासाठी आलेख-पत्राचाही उपयोग करतात. पर्जन्यमानांतील बदल प्रमाणानुसार कमी-अधिक लांबीच्या पट्ट्यांनी दाखविला जातो, तेव्हा ‘पट्टाकृती’ तयार होते. पट्टाकृतीतील पट्टे उभे किंवा आडवे काढता येतात. एकापेक्षा अधिक घटकांसाठी निरनिराळे पट्टे त्या त्या महिन्यासाठी किंवा वर्षासाठी जवळजवळ काढले असता ‘संयुक्त पट्टाकृती’ तयार होते. एकाच पट्ट्यात जेव्हा निरनिराळ्या घटकांचे प्रमाण दाखविलेले असते, तेव्हा ‘संमिश्र पट्टाकृती’ तयार होते. काही वेळा संबंध वर्षात निरनिराळ्या घटकांतील प्रमाणांत बदल कसा घडून आला आहे, ते दाखविण्यासाठी वर्तुळाकृती काढतात. ही पद्धत फारशी वापरात नाही. वर सांगितलेल्या आकृत्यांमध्ये घटकांच्या परिमाणांत सापंक्षतेने कसा बदल होतो, हे दाखविलेले असते. पण पुष्कळ वेळा दोन घटकांत कालमानानुसार झालेला बदल दाखविणाऱ्या संख्या (किंवा परिमाणे) विचारात न घेता फक्त बदलाचे प्रमाण विचारात घेऊन त्या घटकांतील बदल आकृत्यांत दाखविलेला असतो. अशा आकृतीस ‘दशमूलकघात गणनाकृती’ असे म्हणतात. आतापर्यंतच्या आकृतीत एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या दोन घटकांतील बदलांचा संबंध दाखविला गेला. पण एकाच घटकात अनेक ठिकाणी आढळून येणारा बदल दाखवायचा, तो निरनिराळ्या पद्धतींनी दाखवावा लागतो. एकाच नकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येणाऱ्या वार्षिक सरासरी तापमानाची नोंद त्या त्या ठिकाणच्या समुद्रसपाटीवरील उंचीनुसार टिंबाने केली जाते. ज्या ठिकाणी टिंबे जवळजवळ येतात, अशा स्थानांना जोडले असता एक रेषा तयार होते या रेषेस ‘प्रतिगमन रेषा’ म्हणतात. तीवरून उंचीनुसार तापमान कसे कमी होते, याची कल्पना येते. या आकृत्यांत विरळ टिंबाच्या संदर्भाने प्रतिगमन रेषा काढावी लागते, म्हणून या आकृतीस ‘विरळाकृती’ म्हणतात. पुष्कळ वेळा एखाद्या घटकाचे प्रमाण दाखविताना त्याच्या उपघटकांचे प्रमाण दाखवावे लागते. उपघटकांचे प्रमाण दशमान पद्धतीने किंवा एकूण घटकाच्या शेकडा प्रमाणात व्यक्त करता येते. ही अभिव्यक्ती जेव्हा पैशाच्या आकाराच्या आकृतीत करतात, तेव्हा ती ‘पैसाकृती’ होते. या आकृतीत एकूण संख्येच्या प्रमाणात पैशाचे (वर्तुळाचे) क्षेत्र असते आणि प्रत्येक उपघटकांच्या संख्येच्या प्रमाणात वर्तुळातील कोनाचे प्रमाण ठरविले जाते. याच तत्त्वावर पट्टाकृतीतील पट्ट्यांचे उपघटकांच्या प्रमाणानुसार विभाजन केले असता ‘विभाजित आयताकृती’ तयार होते. अशा रीतीने आकडेवार माहितीचे विश्लेषण व प्रगटीकरण निरनिराळ्या आकृतींच्या साहाय्याने करता येते.

विषयनिष्ठ नकाशे : या नकाशांचे दोन प्रकार पडतात : ज्या नकाशांत एक किंवा अनेक घटकांचे फक्त भौगोलिक वितरण दाखविले जाते व ज्यांत घटकांच्या वितरण-प्रमाणदर्शक संख्या व्यक्त होत नाहीत, अशा नकाशांस ‘असंख्यात्मक नकाशे’ म्हणतात. सर्वसाधारणपणे हे नकाशे वर्तमानपत्रे, मासिके यांतून दिसतात. यांत अनेक वेळा भौगोलिक वितरण ज्या चिन्हाने दाखवले जाते, ते त्या घटकाचे सूचक असते. जसे चहाच्या उत्पादनाचे वितरण दाखविण्यासाठी चहाचा कप वापरणे, विजेची उपकरणे बनविणारी केंद्रे रेडिओ दाखवून निर्देशित करणे वगैरे. असंख्यात्मक नकाशात घटकांचे भौगोलिक वितरण विशिष्ट चिन्हांद्वारे, अक्षरांद्वारे किंवा रंगपद्धतीचा उपयोग करूनदेखील दाखविता येते. नकाशाच्या दुसऱ्या प्रकारात एक किंवा अनेक घटकांचे भौगोलिक वितरण त्या घटकांचे प्रमाण (संख्या) विचारात घेऊन दाखविलेले असते. अशा नकाशांस ‘संख्यात्मक नकाशे’ म्हणतात. संख्यात्मक नकाशांचे अनेक उपप्रकार आहेत. कधीकधी नकाशांत घटकांचे भौगोलिक वितरण विशिष्ट ठिकाणीच दाखवायचे असते. त्या त्या ठिकाणी नकाशांत घटकांची संख्या विचारात घेऊन त्या प्रमाणानुसार वर वर्णन केलेल्या सांख्यिकीय आकृत्या (पट्टे, चौकोन, वर्तुळे इ.) काढल्या जातात. काही नकाशांत घटकांचे संख्यात्मक प्रमाण हे विशिष्ट स्थानापुरते मर्यादित न राहता ते ठराविक क्षेत्रात दाखवावे लागते. त्या क्षेत्रातील घटकांचे संख्यात्मक भौगोलिक प्रमाण दाखविण्यासाठी प्रमाणानुसार टिंबांचा, रंगपद्धतीचा किंवा समसांख्यिकीय रेषांचा उपयोग केला जातो. अशा रीतीने अनुक्रमे संख्यात्मक टिंबांचे नकाशे, रंगीत नकाशे आणि समसांख्यिकीय रेषांचे नकाशे तयार होतात. दोन ठिकाणे अथवा क्षेत्रे यांमधील प्रवासी किंवा मालवाहतूक दाखविण्यासाठी दोन प्रकारचे नकाशे असतात. एकात फक्त कोठपासून कोठपर्यंत एवढीच माहिती दाखविणे आवश्यक असते. उदा., मुंबईला रोज कामधंद्यानिमित्त लोक कोणकोणत्या ठिकाणांपासून येतात, हे माहीत करून घ्यावयाचे असेल, तर अशी सर्व ठिकाणे मुंबईला जोडून आवश्यक ती माहिती मिळते. या नकाशाला ‘रे डायग्रॅम’ म्हणतात. याने प्रभावक्षेत्रेसुद्धा कळू शकतात. उदा., तालुक्याची ठिकाणे, जिल्ह्याची ठिकाणे व मोठी शहरे यांमधून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्रांची प्रभावक्षेत्रे, ती वर्तमानपत्रे ज्या ठिकाणी पोहोचतात ती ठिकाणे, वर्तमानपत्रे जेथून प्रकाशित होतात त्या स्थानांना जोडल्यास कळू शकतात.

दुसऱ्या प्रकारात ‘कोठपासून कोठपर्यंत’ इतकेच ‘किती’ ही माहिती देणे आवश्यक असते. जसे, विविध खंडांदरम्यान कसा व किती व्यापार चालतो किंवा भारतात विविध शहरांदरम्यान चालणारी प्रवासी वाहतूक किती असते. याकरिता त्या दोन ठिकाणांदरम्यान जसा मार्ग असेल, तसा पट्टा काढला जातो. या पट्ट्याची रुंदी त्यामध्ये दाखविण्याच्या संख्येनुसार ठरविली जाते. या मार्गाला मिळणाऱ्या किंवा त्यातून निघणाऱ्या शाखांमुळे पट्ट्याची रुंदी कमीजास्त होते. याखेरीज प्रत्येक रेषा विशिष्ट संख्या दाखविणाऱ्या विविध प्रकारच्या रेषांनी हे नकाशे काढता येतात.

अन्य क्षेत्रांतील व शास्त्रांतील प्रगतीचा नकाशाशास्त्रावर परिणाम झाला नसता तरच नवल. भूस्वरूपवर्णन नकाशे व संगणक नकाशे हे यांपैकीच काही होत. मानवाचे अवकाशासंबंधीचे ज्ञान नकाशांद्वारे स्पष्ट होते आणि याच्या अभ्यासाचे नवे दालन भूगोलशास्त्र व नकाशाशास्त्र यांत उघडले गेले आहे.

याखेरीज नकाशा काढण्याकरिता माहिती मिळण्याची साधने व नकाशा प्रत्यक्ष काढण्याकरिता लागणारी उपकरणे, तो छापण्याची तंत्रे यांतही मोठे बदल झाले आहेत व त्यांचा अपेक्षित परिणाम नकाशाशास्त्रावर झाला आहे. दृष्टिहीनांच्या सोईसाठी ‘ब्रेल नकाशे’ काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

इतर नकाशे : आतापर्यंत राजकीय नकाशे, भूस्वरूप नकाशे व सांख्यिकीय नकाशे यांचाच प्रामुख्याने उल्लेख झाला. पण या प्रकारच्या नकाशांशिवायही इतर नकाशांचे पुष्कळ प्रकार आढळतात. त्यांत प्रामुख्याने (१) खगोलदर्शक नकाशे, (२) भूस्तरदर्शक नकाशे आणि (३) वातावरण स्थितिनिदर्शक नकाशांचा उल्लेख करावा लागेल.

खगोलदर्शक नकाशांत पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धांतून आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रांचे, ताऱ्यांचे व ग्रहांचे स्थान दाखविलेले असते.

भूस्तरदर्शक नकाशांत एखाद्या प्रदेशातील प्रस्तरांची घडण व मांडणी दाखविलेली असते. ही मांडणी दाखविण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे.

वातावरण स्थितिनिदर्शक नकाशांत देशातील विशिष्ट काळात वायुभार, वारे (दिशा आणि गती), पर्जन्यमान, अभ्राच्छादन इ. निरनिराळ्या ठिकाणी आढळणाऱ्या घटकांची त्या त्या ठिकाणी नोंद सांकेतिक चिन्हांनी व संकेताक्षरांनी करण्यात येते. त्यांत समभार रेषाही काढलेल्या असतात. हे नकाशे दररोज ठराविक वेळी प्रसिद्ध होतात. देशातील दररोज ठराविक वेळी वातावरणस्थिती कशी असते, याची कल्पना या नकाशांवरून येते.

पृथ्वीचे गोल : भूगोलशास्त्रात पृथ्वीच्या गोलाचे महत्त्व कदाचित नकाशांपेक्षाही जास्त आहे. त्याच्या साहाय्याने दिवस-रात्र, अक्षवृत्ते इ. भौगोलिक कल्पना स्पष्ट करता येतात. त्याचप्रमाणे त्याच्या त्रिमितीमुळे लांब पल्ल्यांची प्रक्षेपणास्त्रे, रेडिओ लहरी, पृथ्वीभोवती फेऱ्या घालणारी विमाने आणि कृत्रिम ग्रह यांचा अभ्यासही चांगला करता येतो.


सर्वप्रथम क्रेटीझने इ. स. पू. १५० मध्ये पृथ्वीगोल तयार केला, असे म्हणतात. पण या गोलासंबंधी फारच थोडी माहिती आहे. इ. स. १४९२ मध्ये मार्टीन बेहाइम (१४५९–१५०७) याने तयार केलेला गोल अजूनही अस्तित्वात आहे. पुनरुज्जीवनाच्या कालखंडात यूरोपमध्ये बऱ्याच प्रमाणात पृथ्वीगोल तयार करण्यात आले. त्यांत चित्रकला आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ झालेला आढळतो. त्यापुढच्या काळात मात्र साधे गोल तयार करण्याचा प्रघात पडला.

बहुतांश पृथ्वीगोलांत पुठ्ठा, धातू, काच, रबर किंवा प्लॅस्टिक यांपैकी कोणत्याही एका पदार्थाचा गोलाकार चेंडू करून त्याच्या पृष्ठभागावर कागदाचे त्रिकोणी तुकडे चिकटवितात. कागदाच्या तुकड्यांवर अक्षवृत्ते व रेखावृत्ते काढलेली असतात. पुष्कळसे पृथ्वीगोल मजबूत बैठकीवर बसवून पातळीशी त्यांचे आस ६६·५° चा कोन करतील अशा रीतीने ते ठेवलेले असतात.

आजकाल मुद्रणालयांत पृथ्वीगोलाचे निरनिराळे त्रिकोणी तुकडे छापून काढतात. त्यांना भिजवून व पसरवून वाटोळ्या पृष्ठभागावर चिकटवितात. प्रत्येक गोलार्धासाठी एक असे त्रिकोणी तुकड्यांचे दोन संच छापण्यात येतात व मग ते वर सांगितल्याप्रमाणे पुठ्ठ्याच्या वाटोळ्या पृष्ठभागावर चिकटवितात.

काही पृथ्वीगोलांवर इंग्रजीत 8 या आकड्याच्या आकाराचे ‘ॲनलेमा’ चित्र एका विशिष्ट रेखावृत्तावर छापलेले असते. त्या रेखावृत्तावर स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे १२ वाजले असता दररोज कोणत्या स्थानावर सूर्याची लंबकिरणे पडतील, हे ‘ॲनालेमाच्या साहाय्याने कळते.

खगोलांतील ताऱ्यांची, नक्षत्रांची किंवा ग्रहांची स्थाने दाखविणारेही गोल अलीकडच्या काळात तयार झाले आहेत. पण राजकीय क्षेत्र व भूस्वरूपे दाखविणारे पृथ्वीगोलच जास्त महत्त्वाचे आहेत.

भूस्वरूपांचे नमुने : समोच्च रेषांकित भूस्वरूप नकाशे कसे अभ्यासावे, याचे प्रत्यक्ष शिक्षण दिल्यानंतरही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुष्कळशा सैनिकांना त्या नकाशांवरून भूस्वरूपांचे नीट आकलन होईना, तेव्हा लष्कराला भूस्वरूपांचे नमुने मोठ्या प्रमाणात करावे लागले. त्यांपैकी काही नमुने रबराचे बनविले होते, तर काही प्लॅस्टिकचे.

अशा प्रकारचे नमुने आजकाल कोणत्याही पदार्थांपासून तयार केले जातात. फळ्यावर समोच्च रेषा काढलेल्या असतात व त्या रेषांवर उंचीच्या प्रमाणानुसार ठराविक उंचीचे खिळे योग्य त्या ठिकाणी बसवितात. खिळ्यांमधील जागा वाळू, सिमेंट, प्लॅस्टर, कागदाचे तुकडे किंवा प्लॅस्टिलीन इ. पदार्थांनी भरून काढतात. चुन्याची निवळी व सिमेंटच्या पाण्याचे फवारे वाळूवर मारल्याने ती घट्ट बनते. वाळूचा पृष्ठभाग खिळ्यांच्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने कोरून काढल्यावर भूस्वरूप नमुना तयार होतो.

पुठ्ठ्याची कात्रणे तयार करूनही नमुने तयार करतात. त्यासाठी प्रत्येक समोच्च रेषा स्वतंत्र पुठ्ठ्यावर काढून मग तो पुठ्ठा त्या रेषेवर कापण्यात येतो. सर्वांत खाली किमान उंचीदर्शक पुठ्ठा ठेवण्यात येतो आणि त्यावर क्रमाक्रमाने वाढत्या उंचीच्या समोच्च रेषांचे पुठ्ठे बसविण्यात येतात. त्यांवर खिळे ठोकण्यात येतात. प्लॅस्टिलीनच्या साहाय्याने पुठ्ठ्यांच्या कडांचा ओबडधोबडपणा गुळगुळीत करण्यात येतो. नमुने तयार करण्याचे एक स्वतंत्र शास्त्रच निर्माण झाले असून त्यानुसार व निरनिराळ्या उपकरणांच्या साहाय्याने अत्युत्तम नमुने तयार करण्यात येतात.

नकाशाशास्त्र हे इतके मनोरंजक असले, तरी त्यात काही मूलभूत अडचणी आहेत : नकाशा तयार करताना चांगला आधारभूत नकाशा असणे आवश्यक आहे. कागदावर किती माहिती दाखविता येईल, हिलाही काही मर्यादा असतात. मानचित्रकाराला सर्व आवश्यक माहिती दाखविणे महत्त्वाचे असले, तरी त्याची गर्दी होता कामा नये, अशी भूमिका घेऊन मार्ग काढावा लागतो. एकापेक्षा अधिक रंगांत नकाशा छापणे हा यावर तोडगा आहे पण त्यामुळे खर्च वाढतो. गावांच्या, देशांच्या नावांतील फरक ही तर मानचित्रकाराची मोठी डोकेदुखी होय. उटकमंड की उदग्‌मंडलम्, बलसोर की बालेश्वर, बरद्वान की वर्धमान यांसारखे प्रश्न नकाशा काढण्याअगोदर सोडवावे लागतात. जुनी नावे बदलून नवी ठेवणे, जसे कुलाबा-रायगड, दाहोमी-बेनिन वगैरे, हेही त्रासदायकच असते. नकाशावर, विशेषतः भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा दाखविताना, काही शासकीय नियंत्रण असते. या प्रकारच्या बंधनांमुळे मानचित्रकाराचे काम मंदावते.

वाघ, दि. मु. पंडित, अविनाश

नकाशातील लोहमार्गाचे कलाकाम.मुद्रित नकाशाचे अवलोकन करताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी-प्रमुख संपादक.

प्राकृतिक नकाशावरील समोच्चरेषा रेखाटन.रेखाछाया उपकरणाने नकाशावरील रेखांकन.नकाशाचे कलात्मक तपासताना संपादकवर्ग.हवाई छायाचित्रणानंतर स्टेरिओप्लेनिग्राफच्या साहाय्याने समोच्चरेषादर्शक नकाशाची निर्मिती.प्राकृतिक नकाशातील रंगपद्धतीचे उठाव काम.नकाशातील स्थाननिदर्शक मुद्राक्षरे चिकटविण्याचे कार्य.