माधवदेव : (सु. १४८९-१५९६). आसामच्या वैष्णव संतकविमालिकेत माधवदेवांचा क्रमांक ⇨ शंकरदेवांनंतर म्हणजे दुसरा लागतो. श्रेष्ठ वैष्णव संत व कवी शंकरदेवांचे ते शिष्योत्तम. शंकरदेवांच्या निर्वाणानंतर आसाममधील वैष्णवांचे माधवदेव प्रमुख झाले. लखीमपूर जिल्ह्यातील लेटेकुफखुरी गावी माधवदेवांचा जन्म झाला. माधवदेवांचे वडील गोविंदगिरी हे नशिबाच्या शोधात पश्चिम आसाममधून पूर्व आसामात आले तेथे शंकरदेवांच्या घराण्यातील एका मुलीशी त्यांनी विवाह केला व शेवटी नारायणपूर येथे ते स्थायिक झाले. माधवदेव ऐन विशीत असतानाच गोविंदगिरी वारले. दारिद्र्य व कष्टातच माधवदेवांनी पारंपारिक पद्धतीने अध्ययन व ज्ञानार्जन केले. संस्कृतचे ते गाढे पंडित होते. आरंभी ते शक्तिमार्गी व दुर्गादेवतेचे निस्सीम भक्त होते परंतु शंकरदेवांची भेट झाल्यानंतर त्यांचा धार्मिक दृष्टिकोन व श्रध्दा पूर्णपणे बदलली. शंकरदेवांचे शिष्य बनून ते पूर्णपणे वैष्णव भक्त बनले आणि त्यांनी गुरुंनी उपदेशिलेल्या एकशरण धर्माच्या प्रसाराला स्वतःस वाहून घेतले. ते आजन्म ब्रम्हचारी होते. ते निस्सीम गुरुभक्तही होते.‘गुरुसेवा करावी तर माधवदेवांसारखी’असे लोक म्हणू लागले. माधवदेवांची विद्वत्ता, प्रतिभा, संघटनाचातुर्य व निस्सीम भक्ती पाहून शंकरदेव एवढे प्रभावित झाले, की त्यांनी माधवदेवांना आपले उत्तराधिकारी नेमले. शंकरदेवांच्या निर्वाणानंतर माधवदेवांनी २० वर्षे यशस्वीपणे वैष्णव धर्माचा प्रसार करुन त्याला भक्कम अधिष्ठान प्राप्त करुन दिले. आसामातील वैष्णव पंथाचे प्रमुख म्हणून माधवदेवांनी केलेल्या भरीव कामगिरीशिवाय कवी व नाटककार म्हणून त्यांनी असमिया साहित्यावर आपला कायम ठसा उमटविला आहे. त्यांची पहिली रचना जन्मरहस्य हे छोटे काव्य असून त्यात पुराणांवर आधारित सृष्टीची उत्पत्ती व लय हा विषय आला आहे. माधवदेवांनी वाल्मीकी रामायणाच्या आदिकांडाचा व शंकरदेवानी उत्तरकांडाचा असमियात अनुवाद करुन, ⇨ माधव कंदलींच्या असमिया रामायणातील दोन कांडे नष्ट झाल्यामुळे अपूर्ण असलेले असमिया रामायण पूर्ण केले. गुरुंच्या आज्ञेवरून माधवदेवांनी विष्णुपुरी संन्यासी यांच्या भक्तिरत्नावलीचा छंदोबद्ध असमिया अनुवाद केला. हा अनुवाद करताना त्यांनी भक्तिरत्नावलि ग्रंथावरील कांतिमाला नावाच्या भाष्यग्रंथाची मदत घेतली. आसाममधील महापुरुषीया पंथाच्या चार पवित्र ग्रंथांत भक्तिरत्नावलीचा समावेश होतो. माधवदेवांचा राजसूय यज्ञ हा आणखी एक लोकप्रिय ग्रंथ होय. याचे कथानक महाभारतावर आधारलेले असून त्यात पांडवांनी केलेल्या राजसूय यज्ञाचा कथाभाग आला आहे. अभिजात संस्कृतमधील माघादी कवींचा त्यावर प्रभाव असून तो लोकप्रिय शैलीत लिहिली आहे. यातील गेयता, चारुता व प्रगल्भता यांमुळे ग्रंथाला अद्भुत काव्यात्मता लाभली आहे. ग्रंथाचा उद्देश भक्ती व कृष्णाचे परमात्मापद सिद्ध करणे हा आहे. यानंतर माधवदेवांनी आपला सर्वश्रेष्ठ असा आध्यात्मिक ग्रंथ नाम-घोषा वा हजारी-घोषा हा रचला. यात त्यांच्या परिपक्व प्रज्ञेचा, प्रतिभेचा व आध्यात्मिक विचारांचा परमोत्कर्ष आढळतो. असमिया वैष्णवांच्या स्त्रोत्रवाङ्मयाचा तो अमोल ठेवा मानला जातो. यात एक हजार कडवी (पद्ये) रचलेली असल्याने तो हजारी-घोषा नावानेही प्रसिद्ध आहे. केवळ आसामच्याच नव्हे, तर सबंध भारताच्याही आध्यात्मिक साहित्यात याचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे. आसाममध्ये तो सर्वत्र वाचला तर जातोच पण अनेकांच्या पाठांतरातही आहे. त्यातील ओळी वारंवार उद्धृत केल्या जातात. माधवदेवांचे आध्यात्मिक विचार उत्कट काव्यरुप घेऊन त्यात व्यक्त झाले आहेत. माया, सृष्टीची रचना, ब्रह्म, आत्मसाक्षात्कार, जीवाचे स्वरूप व ध्येय, मोक्ष इ. विषयांवर हा ग्रंथ विभागाला आहे, भक्ती व गुरुकृपा ह्या आत्मसाक्षात्काराच्या दोन पायऱ्या त्यात सांगितल्या आहेत. भक्तिमार्ग हा ज्ञान, कर्म, योगादी मार्गांत सर्वांना सुलभ होय, भक्तास हरिनामाने साक्षात्कार होतो. भक्तिपूर्वक केलेले हरिनामस्मरण हाच कलियुगातील श्रेष्ठ धर्म होय. साक्षात्कारासाठी गुरुकृपेलाही फार महत्त्व असून शिष्याच्या दृष्टीने गुरु व ईश्वर यांत भेद नाही. धार्मिक जिज्ञासेचे अंतिम ध्येय परमानंदप्राप्ती होय आणि ते भक्तिभावे केलेल्या हरिनामस्मरणाने प्राप्त होते. पश्चाताप, ईशकृपेची तळमळ, आत्मसंयम इ. विषयही त्यात आले आहेत. स्त्रोत्रांतील भावार्तता आणि भक्तीची धुंदी अत्यंत प्रभावी असून ग्रंथाचे आवाहन वैश्चिक स्वरुपाचे आहे. विचारांची प्रगल्भता, दृष्टीची एकात्मता, शब्दकळेतील संगीतमयता यांमुळे नाम-घोषेत माधवदेवांच्या आध्यात्मिक-तात्विक विचारांचा व उत्तुंग काव्यप्रतिभेचा सुंदर समन्वय साधला गेला आहे. त्यांनी काही ‘अंकियानाट’ ही (एक अंकी नाटके) रचली व सु. २०० बरगीते (भक्तिगीते) रचली. चोरधरा, पिंपरा गुछुवा, कोतोरा खलोवा, भूषण हेरोवा आणि भूमि लुतिवा हे त्यांचे अंकियानाट असून त्यांत कृष्णाच्या बाललीला वर्णिल्या आहेत. शंकरदेवांच्या अंकिटयानाटांपेक्षाही माधवदेवांचे अंकिटयानाट सर्वसामान्य जनतेत अधिक लोक्रप्रिय झाले. वरगीतांमुळे वैष्णव संप्रदायात माधवदेव अधिक लोकप्रिय झाले. ह्या भावोत्कट भक्तिगीतांत त्यांच्या धार्मिक वृत्तीचा उत्कट व पुरेपूर आविष्कार झाला आहे. तळमळ, इर्श्वरशरणता, समर्पणभावना, आर्तता त्यांत सुंदर काव्यरुप घेऊन व्यक्त झाली आहे. परिचित व साध्यासुध्या घटनाही माधवदेवांच्या लेखणीस्पर्शाने त्यांत चिरंतन अशा भक्तिगीतांत परिणत झाल्या आहेत. शंकरदेवांच्या निर्वाणानंतर माधवदेवांचे बहुतांश वास्तव्य बरपेटा ह्या प्रमुख वैष्णव सत्राजवळील (मठाजवळील) गणक्कुची व सुंदरीदिय मठांत होते. पूर्व आसामचे कोच राजे रघुदेव हे कामाक्षा देवतेचे उपासक होते. माधवदेव कामाक्षेच्या उपासनेऐवजी वैष्णव मताचा प्रसार करतात म्हणून त्यांना रघुदेवाने अटक केली तथापि चौकशीअंती त्यांच्यावरील आरोप निराधार ठरुन त्यांची सन्मानपूर्वक सुटकाही केली. सुटकेनंतर माधवदेव काही काळ हजो (सध्याचे हयग्रीव माधव मंदिर) येथे राहिले तथापि तेथे राजांचे ब्राम्हण पुरोहित त्यांना त्रास देऊ लागले. म्हणून पश्चिम आसामचे कोच राजे लक्ष्मीनारायण यांच्या राजधानीत (कुचबिहार) ते गेले. लक्ष्मीनारायणांनी त्यांचे स्वागत करून त्यांना व त्यांच्या शिष्यपरिवारास राजधानीजवळच्या भेलादुआर ह्या खेड्यात वास्तव्यासाठी जागा दिली. तेथे त्यांनी आपला मठ स्थापिला. राजघराण्यातील काही व्यक्तींनी माधवदेवांकडून वैष्णव धर्माची दीक्षाही घेतली. या मठात त्यांनी शांत चित्ताने तीन वर्षे व्यतीत करून आपला प्रख्यात असा नाम – घोषा ग्रंथ पूर्ण केला आणि तेथेच देह ठेवला. प्रख्यात साहित्यिक ⇨ लक्ष्मीनाथ बेझवरुआ यांनी १९१४ मध्ये श्री शंकरदेव आरु माधवदेव या नावाचा साक्षेपी व बृहद् असा चरित्रग्रंथ असमिया भाषेत लिहिला असून तो ह्या दोन संतांचे जीवन व कर्तृत्व यांबाबत महत्त्वपूर्ण मानला जातो.
सर्मा, सत्येंद्रनाथ (इं,) सुर्वे, भा. ग. (म.)
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..