माचुरा : (माचुर, माचोल गु. माचा, भोलडो सं. सुभर, सुवर लॅ. आथ्रोनीमम इंडिकम कुल-चिनोपोडिएसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) लहान, मांसल ⇨ ओषधी समुद्रकिनाऱ्यावर खाऱ्या जमिनीवर वाढणारी [⟶ लवण वनस्पति] असून तिचा प्रसार श्रीलंकेत, उष्ण कटिबंधीय आफ्रिकेत व भारतात (बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इ.) बहुतेक सर्वत्र आहे. हिचे निळसर हिरवे खोड आडवे वाढून त्यापासून निघणाऱ्या अनेक फांद्यांपैकी काही आडव्या व काही उभ्या वाढतात. त्या पेरेदार, मांसल (पण आत काष्ठमय) व पर्णहीन असून पेरी फुगीर, आखूड, गदेसारखी, जाड व त्यांच्या टोकांस दोन दोन दाते असतात. द्विलिंगी २–६ फुले बोथट दांड्यांच्या कणिश प्रकारच्या फुलोऱ्यात [⟶ पुष्पबंध] डिसेंबरात येतात. परिदले ३–५, मांसल असून कठीण सालींच्या फळांभोवती आवरण बनवितात [⟶ फूल]. बिया पिवळ्या, त्रिकोणी, काहीशा चपट्या व अनेक असतात. ही वनस्पती विषबाधा कमी करणारी असल्याने तिची राख विंचूदंशावर गुणकारी असते, असा गैरसमज आहे. गरीब लोक हिची भाजी, लोणचे व रायते करतात. भाजी पित्तशामक असते. यकृताच्या रोगांत व आमवातात माचुरा उपयुक्त असते. उंटांना ही ओषधी खाण्यास आवडते. माचूल (सॅलिकॉर्निया ब्रॅकियाटा) ही लवण वनस्पती माचुऱ्यासारखीच असते मात्र तिची काही शारीरिक लक्षणे भिन्न असतात. या दोन्हींची सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ चिनोपोडिएसी वा चाकवत कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.

पहा : मरू वनस्पति लवण वनस्पति.

संदर्भ : Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. III, Delhi, 1975.

जमदाडे, ज. वि.