मागूर (क्लॅरिअस बॅट्रॅकस)मागूर : यामाशाचा समावेश क्लुपिफॉर्मीस गणातील क्लॅरिडी कुलात केला जातो. हा एक खाद्य मत्स्य असून याचे शास्त्रीय नाव क्लॅरिअस बॅट्रॅकस (क्लॅ. मागूर) आहे. मांजराप्रमाणे मिशा असल्याने याला इंग्रजीत ‘कॅटफिश’ असे म्हणतात.

आफ्रिका, मॅलॅगॅसी, दक्षिण आशिया ते पूर्व आशिया, फिलिपीन्स, भारताचा पूर्व किनारा ते मलाया द्वीपकल्पापर्यंत किनाऱ्यालगत व नदीमुखात हे मासे प्रामुख्याने आढळतात. हा मासा उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारा) असल्याने बऱ्याचदा चिखलात व दलदलीत सापडतो.

मागूरचे शरीर ⇨ ईल माशाप्रमाणे लांबट असून याची लांबी सु. ४६ सेंमी असते. डोके दोन्ही बाजूंनी दबलेले, रुंद व चापट असून तोंड आडवे असते. लांब स्पृश्यांच्या (मिशांच्या) चार जोड्या असतात. दात लहान व बोथट असून ते जबडा व हलास्थी (नासा भागातील कवटीचे एक हाड) यांवर पट्टीप्रमाणे असतात. डोके खडबडीत असून त्यावर बारीक ठिपके व दोन खाचा असतात. वाताशय (आतड्यापासून बनलेली व बाहेरच्या टोकाशी बंद असलेली वायूने भरलेली पिशवी) लहान असतो. क्लोमकक्षाच्या (कल्ल्यांच्या भागाच्या) विस्तारात प्रत्येकी एकएक नलिकाकृती श्वसनेंद्रिय असते त्यामुळे हे मासे काही काळ पाण्याबाहेर राहू शकतात. भक्ष्याच्या शोधार्थ रात्री किनाऱ्यावर येतात व उन्हाळ्यात दलदलीत बरेच दिवस राहू शकतात.

मागूरच्या शरीराचा रंग लालसर तपकिरी ते काळपट हिरवा असून खालच्या बाजूला फिकट असतो. त्वचा खवलेहीन असते. पार्श्वभागावर फिकट किंवा पांढरे शुभ्र ठिपके असतात. पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे तोल सांभाळण्यास वा हालचालींसाठी उपयुक्त असणारी त्वचेची स्नायुमय घडी) शरीराच्या लांबीच्या २/३ असून त्यावर पिवळट हिरवी छटा असते. गुदपक्ष (ढुंगणावरील पर) शरीराच्या १/२ असून त्याच्या पुढे छोटे श्रोणिपक्ष (कंबरेवरील पर) असतात. पृष्ठपक्ष व वक्षीय पक्ष (छातीवरील पर) दातेरी असून त्यांवर पातळ त्वचेचे आवरण असते. अधर (खालच्या) पक्षांना तांबडी छटा असते. पुच्छपक्ष (शेपटीचा पर) स्वतंत्र असतो. नराच्या पृष्ठपक्षावर काळे ठिपके असतात व पाठीमागच्या भागावर गडद काळा डाग असतो.

मागूर अतिशय खादाड आहे. कृमी, कालव, छोटे मासे व सस्तन प्राण्याचे मांस हे त्याचे प्रमुख खाद्य असले, तरी काही जाती बटाटे व ओट खातात. नर अंडी उबवण्याचे कठीण काम करतो. पिलू बाहेर पडेपर्यंत अंडी तोंडात उबवली जातात. हा एक पौष्टिक खाद्य मत्स्य असल्यामुळे याची मच्छीमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रात याचे वार्षिक उत्पन्न ५,००० टनांपर्यंत आहे. ताजा व खारवून किंवा धुरी देऊन किनाऱ्यापासून दूरवरच्या भागांत हा पाठविला जातो. ⇨ पोष ग्रंथीच्या हॉर्मोनाविषयी (वाहिनीविहीन ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्त्रावाविषयी) संशोधन करण्यासाठी या माशाचा उपयोग करण्यात येतो. घरगुती मत्स्यालयात लहान मागूर मासे, तर सार्वजनिक मत्स्यालयात मोठे मासे विशेष शोभा आणतात. मत्स्यालयात वाळू, गढूळ पाणी, दगड. झाडांची मुळे व तुरळक झाडे ठेवावी लागतात. मत्स्यालयातील पाण्याचे तापमान २०–२५ से. असावे लागते.

पहा : मार्जारमीन.

चंदाराणा, प्रतिमा न.