माकू : दक्षिण अमेरिकेच्या इंडियन जमातींचा एक स्वतंत्र भाषिक समूह. कोलंबियातील रिओनेग्रो आणि वौपेस (कैआरी) या नद्यांमधील विशाल भूभाग या जमातींनी व्यापला आहे. त्यांची लोकसंख्या सु. २,००० (१९७१) होती. ती हळूहळू घटत आहे. हे लोक खुजे, उजळवर्णाचे पण बेढब आहेत. ते स्वभावाने लाजाळू असून त्यांच्यात अद्यापि वन्य संस्कृती कायम आहे. कॅरिब, टूकानो व आरावाक जमातींनी त्यांचा प्रदेश आक्रसून टाकला असल्यामुळे त्यांतील बहुसंख्य लोक या जमातींमध्ये मिसळून गेले आहेत व फारच थोडे मूळचे माकू आढळतात. त्यांच्या झोपड्या निकृष्ट तऱ्हेच्या असतात कारण ते एका ठिकाणी फार काळ वास्तव्य करीत नाहीत. माकू संस्कृतीबद्दल फारच थोडी माहिती ज्ञात आहे. माकू हे मूळात भटके वन्य लोक असल्यामुळे शिकार, मच्छीमारी आणि जंगलातील कंद, फळेमुळे गोळा करणे हेच त्यांचे प्रमुख व्यवसाय होत. शिकारीसाठी ते धनुष्यबाण, दगडी कुऱ्हाडी आणि भाला यांचा वापर करतात. अगदी तुरळक प्रमाणात शेती केली जाते. माकू भाषा ही इतर भाषांशी संबंधित नसून तिचे विविध गट भिन्न बोलीभाषा बोलतात.

भागवत, दुर्गा