मांडवी : गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि कच्छच्या आखातावरील बंदर. लोकसंख्या ३२,१०४ (१९८१). भूजच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. अंतरावर रुक्मावती नदीच्या काठावर हे वसले असून ते जवळच्या ‘मस्क’ या खेडेगावावरून ‘मस्क मांडवी’ या नावानेही ओळखले जाते. पूर्वीच्या काळी ते रायपूर किंवा रियान म्हणून प्रचलित होते. वारा, सागरी लाटा यांमुळे शहराच्या आसमंतात अनेक ठिकाणी वाळूच्या टेकड्या, खाजणे तयार होतात परंतु शहराच्या निकटच्या भागात मात्र हिरवीगार शेते व चांगल्या जलसिंचनाच्या सोयी दिसून येतात. या बंदराच्या भोवताली २५ बुरुजांची, ४·८ मी . उंच व सु. १ मी. रुंदीची १८१९ च्या भूकंपाने मोडकळीस आलेली एक तटबंदी आहे. तटबंदीच्या बुरुजांपैकी नैर्ऋत्येकडील सगळ्यांत मोठ्या बुरुजाचा सध्या दीपगृहासाठी उपयोग करण्यात आला आहे. विहिरी, शहराच्या पश्चिमेस असलेला तलाव यांतून शहराला पाणीपुरवठा केला आहे.
जाडेजा वंशातील राव खेंगरजी या कच्छच्या अधिपतीने, सोळाव्या शतकात हे शहर वसविले. चाचेगिरी, नैसर्गिक आपत्ती इ. अडचणी येऊनही मांडवी हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. अठाराव्या शतकाच्या सुमारास व्यापाऱ्यांचा व खलाशांचा आश्रयदाता असेलल्या महाराव गोदजीने या बंदरात अनेक सुधारणा केल्या. त्याने तेथे एक राजवाडा व गोदी बांधली आणि बोटी, जहाजे तयार करण्यात तो जातीने लक्ष घालू लागला. १७८६ च्या सुमारास राव रायधनच्या अनागोंदी कारभारामुळे रामजी खावससारख्या अधिकाऱ्याकडे खंडणी देण्याच्या बोलीवर मांडवीचा कारभार आला. परंतु पुढे त्याने खंडणी देण्याचे नाकारल्यावर फतह मुहम्मद हा अधिकारी मांडवी येथे कारभार पाहू लागला. त्यानंतर १८०९ मध्ये ब्रिटिशांशी केलेल्या एका करारान्वये मांडवी हंसराज याच्या ताब्यात आले. हंसराजच्या मृत्यूनंतर हा करार फक्त कागदोपत्रीच राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापासून मांडवी सागरी व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले. येथून प्रामुख्याने सुती वस्त्रे निर्यात होत असत तसेच सुकी फळे, खजूर, कॉफी, हस्तिदंत इ. वस्तू आयात होत असत. अंतर्गत व्यापारातही मांडवी सधन होते. सिंध, जैसलमीर, मारवाड, गुजरात या प्रदेशांशी तसेच कराची, मंबई, कलकत्ता, मद्रास इ. शहरांशी त्याचे व्यापारी संबंध होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर मांडवीची भरभराट झाली. केळी, नारळ, लिंबे या फळांसाठी आणि गुजरातच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘बांधणी’ साड्यांसाठी मांडवी प्रसिद्ध आहे. तेलगिरण्या, कापूस पिंजणे, मच्छीमारी इ. उद्योगधंदे येथे चालतात. शहरात राव खेंगरजीने बांधलेल्या सुंदरवर विष्णुमंदिराशिवाय, राणेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, जुने स्वामीनारायण मंदिर इ. देवालये प्रसिद्ध आहेत. तसेच काजीवली मशीद, जामा मशीद, पीर तमासा इ. मुसलमानांची धार्मिक स्थाने आहेत. येथे एक कला व वाणिज्य महाविद्यालय, मूक-बधिर विद्यालय, दोन सार्वजनिक वाचनालये, चार सार्वजनिक उद्याने, ‘तोपानसार’ नावाचा पोहण्याचा तलाव व ‘टागोर रंगभवन’ नावाचे खुले नाट्यगृह आहे. श्रावण वद्य अष्टमी ते दशमी यांदरम्यान येथे रथयात्रा असते तसेच चैत्र वद्य त्रयोदशीला येथे शितळामातेची जत्रा भरते.
पंडित, भाग्यश्री