मॅहॉगनी : (१) संयुक्त पान व फुलोऱ्यासह फांदी, (२) कळ्या व फूल, (३) फुलाचा उभा छेद, (४) तडकलेले फळ, (५) बी.

मॅहॉगनी : (हिं. महागनी इं. वेस्ट इंडियन मॅहॉगनी, मॅहॅगोनी ट्री लॅ. स्वाएटेनिया मॅहॉगनी कुल-मेलिएसी). उत्तम लाकडाबद्दल प्रसिद्ध असल्यामुळे लागवडीत असलेला हा भव्य पानझडी वृक्ष भारतात सु. १८–२४ मी. उंच वाढतो. अत्यंत अनुकूल परिस्थितीत त्याची उंची सु. ३० मी पर्यंत वाढते व त्याचा घेर ४·५ मी. होतो. मॅहॉगनीच्या प्रजांतींतील तीन जाती भारतात आलेल्या आढळतात स्वा. मॅहॉगनी ही त्यांपैकी एक जाती आहे. हा वृक्ष मूळचा मध्य अमेरिका व वेस्ट इंडिज येथील आहे. भारतात त्याचा प्रवेश १७९५ मध्ये जमेकातून कलकत्त्यातील भारतीय शास्त्रीय उद्यानात झाला. त्यानंतर सु. ७० वर्षे त्याचा प्रसार फारसा झाला नाही. १८६५ नंतर वेस्ट इंडीजमधून बिया आणवून अनेक ठिकाणी, विशेषतः मोठ्या सार्वजनिक उद्यानांतून, त्याची लागवड झाली. इतरत्र जंगलात कोठे कोठे त्याची चांगली लागवड केली गेली मात्र सर्वच ठिकाणी लागवडीत यश मिळालेले नाही. भारतात बागेत व रस्त्यांच्या दुतर्फा शोभा व सावली यांकरिता तो सामान्यपणे लावला जातो. साधारणतः आठ वर्षांत तो सहा मी. उंच व त्याचा घेर सु. ३७·५ सेंमी. होतो. चांगल्या सुपीक व खतावलेल्या जमिनीत याची वाढ चांगली होऊन फुले व फळे लवकर येतात. त्याला तळाशी मोठी जाडजूड आधारमुळे असतात. खोडाची साल काळपट करडी व सुरकुतलेली असते. पाने मोठी (२५–५० सेंमी. लांब), संयुक्त, समदली (मध्य शिरेवर दोन्ही बाजूस सारखी दल-संख्या असलेली), पिसासारखी असून दले २–४ किंवा ३–५ जोड्यांनी असतात. प्रत्येक दल ३–५ सेंमी. लांब तळाशी तिरपे, अंडाकृती व टोकदार असते. फुले द्विलिंगी, नियमित, पंचभागी, फार लहान व हिरवट पिवळी असून ती पानांच्या बगलेत शाखायुक्त मंजरीवर [परमंजरीवर⟶ पुष्पबंध] येतात. फुलात संदले व प्रदले प्रत्येकी पाच व सुटी केसरदले दहा, जुळलेली व तळाशी कुंभाकृती असतात किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्याभोवती तळाशी शेंदरी रंगाचे मधुयुक्त बिंब असते [⟶ फूल]. फळ (बोंड) मोठे, कठीण, तळाशी फुगीर व टोकाकडे निमुळते सु. ७·५–१५ सेंमी. लांब, ७·५ सेंमी. व्यासाचे व पिंगट असते. बिया अनेक, सपाट व पंखधारी असून त्या वाऱ्याने पसरविल्या जातात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मेलिएसी किंवा निंब कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

पाने साधारणपणे फेब्रुवारी गळतात व नवीन पालवी मार्च-एप्रिल मध्ये येते त्यानंतर फुले येतात. ऑक्टोबर ते डिसेंबरात फळे पिकतात. झाड लावल्यापासून सु. ३०–४० वर्षांनी (कधी लवकरही) बिया येऊ लागतात. पूर्ण वाढ होऊन तडकलेल्या फळातील चांगल्या सुकलेल्या बियांपासूनच आलेली झाडे चांगली वाढतात तथापि फांद्यांचे तुकडे लावूनही अभिवृद्धी (लागवड) करतात. उबदार हवामान, सु. १००–१५० सेंमी. पाऊस आणि निचऱ्याची व काहीशी गाळाची रेतीयुक्त सकस जमीन या झाडांना आवश्यक असते. रोपांना व अधिक वाढलेल्या लहान झाडांना अनेक शत्रू आहेत. हरणे, डुकरे, वानरे, कित्येक कीटक आणि कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) इत्यादींपासून त्यांचे रक्षण करावे लागते. बंद डब्यांत ठेविल्यास बिया सु. वर्षभर टिकतात त्यानंतर यांची अंकुरणक्षमता (रुजण्याची पात्रता) कमी होते. प्रत्यक्ष बिया इच्छित स्थळी लावण्यापेक्षा प्रथम लहान कुड्यांत किंवा पॉलिथीन पिशव्यांत रोपे तयार करून नंतर ती सु. ३० सेंमी. उंचीची झाल्यावर आधी तयार ठेवलेल्या खड्ड्यांत लावणे अधिक फायद्याचे असते.

मॅहॉगनीचे लाकूड व्यापारी दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. ते गर्द लालसर तपकिरी, कठीण, जड, मजबूत व टिकाऊ असते. त्याचा उपयोग सोळाव्या शतकापासून सुरू झाला. स्पॅनिश लोकांनी प्रथम जहाजबांधणीस ते वापरले. नंतर इंग्लंडमध्ये १६८० पासून इमारतींच्या बांधकामाकरिता आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून सजावटी सामानांकरिता ते उपयोगात येऊ लागले. हल्ली त्याचे पुढील प्रकारचे विविध उपयोग करतात : कापीव व कोरीव काम, नवलपूर्ण वस्तू, दूरचित्रवाणीचे संच, ग्रामोफोन इत्यादींच्या पेट्या वाद्ये, विमानबांधणी, आखण्या, पेन्सिली, कपाटे, तक्ते, प्लायवुड इत्यादी. ह्या लाकडाचा स्थानिक पुरवठा तमिळनाडू, पं. बंगाल, केरळ इ. राज्यांतून होतो. ह्या वृक्षाच्या सालीत १५% टॅनीन असल्याने तिचा उपयोग ज्वरनाशक, स्तंभक (आकुंचन करणारी) व पौष्टिक औषधी पदार्थ म्हणून करतात सिंकोनाच्या (कोयनेलाच्या) सालीऐवजी ही साल वापरतात तिच्यातून पाझरणारा डिंक इतर डिंकांत मिसळतात. जमेकाता ही साल कातडी कमाविण्यास वापरतात.

पेरूव्हियन (होंडुरस) मॅहॉगनी : (स्वा. मॅक्रोफिला). ह्या दुसऱ्या जातीचे वृक्षही भारतात अनेक ठिकाणी लावलेले आहेत व त्यांचा अनेक दृष्टिकोनांतून अभ्यासही केला गेला आहे. तथापि त्यांचे लाकूड वर वर्णिलेल्या मॅहॉगनीच्या लाकडापेक्षा कमी प्रतीचे असल्याने ते फक्त सजावटी सामान, तक्ते व बंदराच्या धक्क्याकरिता वापरतात. याच्या बियांचे तेल साबणाकरिता उपयुक्त असते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. X, New Delhi, 1976.

परांडेकर, शं. आ.