मॅसिडोनिया : आग्नेय यूरोपातील बाल्कन द्वीपकल्पामधील इतिहासकालीन प्रसिद्ध प्रदेश. विद्यमान काळातील ग्रीस, बल्गेरिया आणि यूगोस्लाव्हिया या तीन देशांत हा विभागला गेला आहे. क्षेत्रफळ अंदाजे ६६,३९७ चौ. किमी. उत्तरेस इजीअन समुद्रापासून ईपायरसच्या पश्चिमेस आणि थ्रेसच्या पूर्वेस याचा विस्तार असून वार्दर, स्त्रूमा आणि मेस्ता या नदीखोऱ्यांनी व पिंडस व रॉडॉपी या पर्वतप्रदेशांनी तो व्यापलेला होता.

मॅसिडोन या प्राचीन नगराच्या परिसरात अगदी प्रारंभी आशिया मायनरमधील कृषक लोकांनी वस्ती केली असावी, असे दिसते. इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकाच्या सुमारास उत्तरेकडून थ्रेको-इलिरियन जमातीचे लोक या भागात आले व त्यातच मॅसिड्नी लोकांचाही अंतर्भाव होतो. इ.स.पू. सातव्या शतकात राजकीय दृष्टीने हे लोक संघटित झाले व त्यांनी आपला अंमल पूर्वेकडील सलॉनिक मैदानापर्यंत प्रस्थापित केला. प्राचीन ग्रीक व इराणी या लगतच्या राजसत्तांमुळे मात्र मॅसिडोनियन सत्तेच्या विस्ताराला आळा बसला.

इ.स. पू. ११०० मध्ये ग्रीकांनी मॅसिडोनियावर साम्राज्य प्रस्थापित केले, मॅसिडोनियाचा राजा दुसरा फिलिप याने इ.स. पू. ३३८ मध्ये प्राचीन इराणी सत्तेविरुद्ध मोहीम सुरू केली. त्याचा मुलगा म्हणजे जगज्जेता ⇨ अलेक्झांडर द ग्रेट हा होय. त्याच्यामुळे मॅसिडोनियाला प्राचीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. अलेक्झांडरने इराण्यांना पराभूत केले. त्याच्या मृत्यूनंतर (इ.स.पू. ३२३) मॅसिडोनियन साम्राज्याचे तुकडे पडले. इ.स.पू. १४८ मध्ये मॅसिडोनिया हा रोमन प्रदेश बनला. रोमन साम्राज्याचे उत्तर काळात तो पूर्वेकडील बायझंटिन प्रदेशात समाविष्ट झाला (इ.स. ३९५).

मॅसिडोनिया बल्गेरियन व सर्बीयन प्रदेशांत विभागाला गेला (इ.स. १३००). १३८९ ते १९१२ पर्यंत हा प्रदेश तुर्कांच्या आधिपत्याखाली होता. बल्गेरियन, ग्रीक व सर्बीयन लोक तुर्कांशी लढतच होते १९१२ मध्ये पहिले बाल्कन युद्ध झाले. तुर्कांचा पराभव झाला. ग्रीस, बल्गेरिया आणि यूगोस्लाव्हिया या तीन देशांत मॅसिडोनियाचा प्रदेश विभागला गेला. मॅसिडोनियाचा आणखी प्रदेश मिळविण्यासाठी बल्गेरियाने केलेल्या उठावामुळे दुसरे बाल्कन युद्ध उद्‌भवले (१९१३). त्यात बल्गेरियाचा पराभव झाला. बूकारेस्ट तहानुसार मॅसिडोनियाचा थोडाच भाग त्याच्या ताब्यात राहिला. परिणामतः हजारो मॅसिडोनियन लोक बल्गेरियात पळून गेले. पहिल्या महायुद्धकाळात मॅसिडोनियामध्ये अंतर्गत राजकीय चळवळी सुरू झाल्या. महायुद्धोत्तर काळात बल्गेरियाच्या प्रेरणेने मॅसिडोनियामध्ये दहशतवाद बोकाळला. १९२३ नंतर लोकसंख्येची अदलाबदल करण्याचे ठरले. तीनुसार ग्रीक मॅसिडोनियामध्ये बल्गेरियात ग्रीक निर्वासित स्थलांतरित करण्यात आले. ब्लगेरियन मॅसिडोनियात ग्रीक अल्पसंख्यांकांचा छळ होत आहे, असे कारण त्यामागे होते. १९२५ मध्ये ग्रीसने बल्गेरियावर हल्ला केला, तथापि राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने समेट घडवून आणण्यात आला. यूगोस्लाव्ह आणि बल्गेरिया यांचे संबंधही मॅसिडोनियन प्रश्नावर बिघडलेलेच होते. सरहद्दीवरही चकमकी झडत होत्या. अंतर्गत बंडाळीला बल्गेरिया जबाबदार आहे, असा यूगोस्लाव्हियाचा आरोप होता. या सगळ्या प्रकारची परिणती यूगोस्लाव्हियाचा राजा अलेक्झांडर याच्या खुनात झाली (१९३४). एका राष्ट्रवादी मॅसिडोनियनाने हा खून केला. दुसऱ्या महायुद्धकाळात बल्गेरियाने सर्व मॅसिडोनिया व्यापला होता (१९४१–४४). तथापि १९४७ च्या शांतता तहानुसार मॅसिडोनियाच्या संदर्भातील ग्रीस, यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया यांच्या युद्धपूर्व सीमारेषा कायम करण्यात आल्या यूगोस्लाव्ह संविधानानुसार (१९४६) यूगोस्लाव्ह मॅसिडोनिया हा एक स्वायत्त घटक झाला आणि मॅसिडोनियन लोकांची स्वतंत्र राष्ट्रीयता मान्य करण्यात आली. महायुद्धानंतरच्या ग्रीसमधील यादवी युद्धकाळात ग्रीस आणि यूगोस्लाव्हिया यांतील संघर्ष वाढत गेले. यूगोस्लाव्हि-बल्गेरिया मतभेदांमुळे १९४८ नंतर तर हा प्रश्न स्फोटक बनला तथापि ग्रीसमधील यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर आणि यूगोस्लाव्ह-बल्गेरिया संबंधांतील सुधारणेमुळे १९६२ नंतर मॅसिडोनियन प्रश्न निवळलेला आहे.

हा प्रमुख्याने कृषिप्रधान प्रदेश असून येथील जमीन सुपीक आहे. तंबाखू, गहू, राय, मका, कापूस, सूर्यफूल ही येथील महत्त्वाची पिके आहेत. अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे नैसर्गिक खनिजसंपत्तीच्या उत्पादनात वाढ झाली नाही. क्रोम, ॲस्बेस्टस, तांबे, चांदी, गंधक व लिग्नाइट ही येथील महत्त्वाची खनिजे आहेत. मेंढपाळी, कापडउद्योग, भांडी तयार करणे हे येथील महत्त्वाचे व्यवसाय आहेत.

ग्रीक मॅसिडोनियाचा (क्षेत्रफळ अंदाजे ३४,२०३ चौ. किमी.) प्रदेश सपाट व मैदानी असून नेस्तॉस, स्त्रूमा, व्वादर या येथील नद्या आहेत. कॅल्किडिसी व सलॉनिक (थेसालोनायकी) ही महत्त्वाची सागरी आणि व्यापारी केंद्रे आहेत. थेसालोनायकी ही राजधानी असून तेथे कापडगिरण्या आहेत.

पीरीन किंवा बल्गेरियन मॅसिडोनिया हा अंदाजे ६,४८० चौ. किमी. क्षेत्रफळाचा असून मॅसिडोनियन, तुर्की, बल्गेरियन इ. विविध गटांची येथे वस्ती आहे. बल्गेरियफ्‌ग्राड हे राजधानीचे ठिकाण आहे.

यूगोस्लाव्हियन मॅसिडोनिया हा यूगोस्लाव्हियाचा एक स्वायत्त घटक आहे. क्षेत्रफळ सु. २५,७१४ चौ. किमी. स्कोप्‌बी, बीटॉल, प्रीलेप ही प्रमुख शहरे आहेत. स्कोप्‌ये हे राजधानीचे ठिकाण आहे. बहुसंख्य मॅसिडोनियन लोकांचे हे वसतिस्थान असून मॅसिडोनियन ही प्रमुख बोलीभाषा आहे.

पहा : बाल्कन युद्धे बाल्कन राष्ट्रे.

संदर्भ : Brailsford H. N. Macedonia : Its Races and Their Future, New York, 1972.

ओक, द. ह. पंडित, भाग्यश्री