मॅझागॅन : सांप्रतचे नाव अलू-जादीदा. मोरोक्को देशाच्या कॅसाब्लांका विभागातील आरोग्यधाम व अटलांटिक महासागरावरील एक बंदर. लोकसंख्या ५५,५०१ (१९७१). हे कॅसाब्लांकाच्या नैर्ऋत्येस ८८ किमी. वर आहे.

इ. स. १५०२ मध्ये वसविण्यात आलेले हे बंदर १५६९ पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. १५४१ पासून मोरोक्कोच्या किनाऱ्‍यावरील पोर्तुगीजांचे हे एकमेव महत्वाचे मोक्याचे ठिकाण होते. पोर्तुगीजांनी वसविलेले हे शहर तटबंदीयुक्त असून त्याच्याभोवती नवीन शहराची वाढ १८९० पासून होत गेली.

दाऊकाला या मॅझागॅनच्या सुपीक पृष्ठप्रदेशातून पिकविला जाणारा शेतमाल (तृणधान्ये व फळे) तसेच अंडी, कोंबड्या, बदाम, लोकर, चामडी इत्यादींची या बंदरातून निर्यात केली जाते. सागरी लाटारोधक बांधकामाने संरक्षित अशा उपसागरावर मॅझागॅन बंदर वसलेले असले, तरी कॅसाब्लांका बंदराच्या १९१२ पासून होत गेलेल्या विकासामुळे मॅझागॅन बंदराचे महत्त्व कमी झाल्याचे दिसते. सांप्रत त्याचा प्रामुख्याने किनारी वाहतुकीसाठी उपयोग करण्यात येतो. बंदराच्या पूर्वेस सु. १·५ किमी. लांबीची पुळण पसरली आहे. शहरातील उद्योगांमध्ये मासे डबाबंद करणे व खारविणे, पाम धाग्यावर प्रक्रिया करणे, साबण तयार करणे इत्यादींचा समावेश होतो.

गद्रे, वि. रा.