मँगल्स्‌डॉर्फ, पॉल ख्रिस्तॉफ : (२० जुलै १८९९ –  ). अमेरिकन वनस्पतिवैज्ञानिक. त्यांनी मका या वनस्पतीचा उगम, क्रमविकास (उत्क्रांती) व तिच्यात झालेल्या सुधारणा यांविषयी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म ॲचिसन (कॅनझस, अमेरिका) येथे झाला व तेथील कॅनझस स्टेट कॉलेजातून त्यांनी बी. एस्. पदवी मिळविली (१९२१). १९२१–२६ या काळात कनेक्टिकट ॲग्रिकल्चरल एक्स्पेरिमेंटल स्टेशनमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम करीत असताना त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठाची एस्सी.डी. ही पदवी संपादन केली. १९२७–४० या काळात त्यांनी टेक्सस ॲग्रिकल्चरल एक्स्पेरिमेंटल स्टेशनमध्ये संशोधन करून टेक्सस राज्यासाठी मक्याचा संकरित प्रकार विकसित केला तसेच गहू, ओट व सातू यांच्या नवीन प्रकारांच्या निर्मितीस मदत केली. १९४० मध्ये ते हार्व्हर्ड विद्यापीठात आर्थिक वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक व १९६२ मध्ये फिशर प्राध्यापक झाले. १९६८ मध्ये तेथून सेवानिवृत्त झाल्यावर ते उत्तर कॅरोलायना विद्यापीठात वनस्पतिविज्ञानाचे अधिव्याख्याता झाले. १९४१–६२ या काळात अधून मधून त्यांनी रॉकफेलर फाउंडेशनच्या मेक्सिको, कोलंबिया, चिली व भारत या देशांतील कृषिविषयक कार्यक्रमांचे सल्लागार म्हणूनही काम केले.

इ. स. पू. सु. ५००० वर्षांपूर्वीचा मेक्सिकोतील जंगली मका व त्यांनी निर्मिलेला संकरित मका यांमध्ये त्यांना बरेच साम्य आढळले. यावरून फार पूर्वी जंगली मक्याचे दोन प्रकार होते अमेरिकन इंडियन लोकांनी या दोन प्रकारांचे संकरण केले आणि त्यातून आधुनिक मका अवतरल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. मक्याच्या दाण्यांचा (बियांचा) फैलाव होण्यास कोणतेच नैसर्गिक साधन नसल्याने माणसाने जोपासना केल्याने ही वनस्पती टिकून राहिली आहे. सुमारे तेरा वर्षे संशोधन करून त्यांनी मक्याविषयी पुढील तीन मते मांडली : (१) लागवडीतील मक्याची पूर्वज वनस्पती पॉडकॉर्न प्रकारची म्हणजे जिच्या बिया (उदा., जंगली गवत) शुष्क, पातळ खवल्यांनी आच्छादिलेल्या असतात अशी होती (२) ⇨ मक्चारी (टेओसिंटे) हा मक्याचा जवळचा नातेवाईक असलेला प्रकार त्याचा पूर्वज नसून मक्याचा दूरचा नातेवाईक असलेल्या ट्रिप्सॅकम या प्रकाराशी संकर होऊन बनलेला प्रकार आहे आणि (३) मक्याचे बहुसंख्य आधुनिक प्रकार मक्चारी व ट्रिप्सॅकम यांपैकी एकाशी किंवा दोन्हींशी झालेल्या संकरातून निर्माण झाले आहेत. १९३९ सालानंतर त्यांनी ही मते पडताळून पाहण्यासाठी संशोधन केले व त्यात त्यांना यशही आले. मक्याचे सुधारित प्राकर निर्मिण्यात त्यांच्या या कार्याचा उपयोग होऊ शकेल.

अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९४०) व नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९४५) या संस्थांवर त्यांची निवड झाली होती. द ओरिजन ऑफ इंडियन कॉर्न अँड इट्स रिलेटिव्हज (आर्‍. जी. रिव्ह्‌झ यांच्या समवेत, १९३९) कॅंपेन अगेन्स्ट हंगर (१९६७) आणि कॉर्न, इट्स ओरिजिन, हव्होल्यूशन अँड इंप्रुव्हमेंट (१९७४) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.

पहा :  मका. 

परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतीश वि.