महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ : महाराष्ट्र राज्यामध्ये मोटारींद्वारा प्रवाशांची व्यापारी तत्त्वावर वाहतूक करण्याकरिता १९६१ साली स्थापन करण्यात आलेले महामंडळ. पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९२० मध्ये भारतात शिल्लक सैनिकी वाहनांच्या विक्रीमुळे मोटारींद्वारा व्यापारी वाहतुकीला संधी मिळाली. १९३० पर्यंत हा व्यवसाय चांगला वाढला आणि आगगाड्या व खासगी बसचालक यांच्यात वाहतूक दरांबद्दल स्पर्धा सुरु झाली व आगगाड्यांना तोटा सोसावा लागला. हा प्रश्न सोडविण्यासाठी मोटार वाहने कायदा १९३९ मध्ये अंमलात आल्यावर रस्ता वाहतूक विकासाचे नियंत्रण करण्याचे धोरण ठरविले गेले. पुढे १९४६ मध्ये खाजगी चालक, राज्य सरकारे व रेल्वे यांनी त्रिपक्षीय वाहतूक उपक्रम चालू करावेत असे ठरले. पण १९४८ च्या रस्ता वाहतूक निगम कायद्यानंतर राज्य शासनांनी आपल्या मालकीची सांविधिक वाहतूक महामंडळे प्रस्थापिण्यास सुरुवात केली. याचा उद्देश हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवून खाजगी चालकांना शक्य न होणारी व्यवस्थापन आणि व्यवहारातील अधिक कार्यक्षमता व काटकसरी साध्य करावयाच्या व त्यांचा फायदा या सेवेचे उपभोक्ते व कामगार यांना करून द्यावयाचा, हा होता. या दृष्टीने राज्य शासनांनी टप्प्याटप्प्यांनी या व्यवहाराचे राष्ट्रीयीकरण करण्यास सुरुवात केली. मुंबई राज्यात अशा तऱ्हेचा निगम १ एप्रिल १९४८ मध्ये स्थापिला गेला. कालांतराने महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर (१९६०) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ( निगमाची ) स्थापना रस्ता वाहतूक निगम कायदा, १९५० च्या अन्वये १ जुलै १९६१ रोजी झाली. यावेळेस महामंडळाकडे १,९८२ गाड्या होत्या ज्या मार्गांवरून त्या धावत होत्या त्यांची एकंदर लांबी ७४,४४० किमी. होती व दैनिक सरासरी प्रवासी ४·७२ लाख होते. १ एप्रिल १९८२ रोजी गाड्यांची संख्या १०,६७५ म्हणजे जवळजवळ पाचपट झाली, तर मार्गांची एकूण लांबी ७·१२ लक्ष किमी. म्हणजे साधारणपणे साडेनऊ पट होती दैनिक सरासरी प्रवासी ३४·९४ लाख म्हणजे जवळजवळ साडेसात पट झाले. १९८१–८२ या वर्षात महामंडळाच्या सर्व प्रवासी गाड्यांनी धावलेल्या अंतरांची बेरीज ७९·९४ कोटी किमी. होती. महामंडळाच्या गाड्यांचा सरासरी भारांक (लोड फॅक्टर) ८५ च्या जवळपास असतो. खालील तक्त्यावरून महामंडळाच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट होईल.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची महत्वाची आकडेवारी (30 जून १९८४)

विभाग 

मार्गांची संख्या 

मार्गांची एकूण लांबी (किमी.) 

मार्गांवर वाहतूक करणाऱ्या वाहनांची सरासरी दैनिक संख्या 

चालू स्थितीतील मोटारगाड्या 

सरासरी दैनिक उत्पन्न ( लाख रुपयांत ) 

भारगुणकांची टक्केवारी 

प्रवाशांची दैनिक सरासरी (लाखांत) 

औरंगाबाद

मुंबई

नागपूर

पुणे

१,५००

३,९१८

२,२३०

३,६३६

१,३१,८४५

२,०८,३२९

१,३७,२१६

२,४२,२०७

१,४९५

३,१२२

१,९२२

२,७८५

१,५७९

३,३२३

२,०१७

२,८८८

१९·४६

३३·९३

२२·२५

३६·३४

७७·०५

७२·६०

८०·४०

८४·१८

६·९३

१५·६५

७·१३

१२·२६

एकूण

११,२८४

७,१९,५९७

९,३२४

९,८०७

१११·९८

७८·५५

४१·९७

प्रवासी मार्ग परिवहनाच्या राष्ट्रीयीकरणाचे उद्दिष्ट १९७४–७५ मध्ये पूर्ण झाले आहे. १९८१–८२ मध्ये ७५ टक्के जनतेला परिवहनसेवा थेट मिळत होती. १४% जनतेला या सेवेसाठी ३ किमी. अंतर चालावे लागे, ९ टक्क्यांना ३ ते ८ किमी. व उरलेल्या २ टक्के जनतेला मात्र ८ किमी. पेक्षा अधिक अंतर चालावे लागत होते. महामंडळाला रस्ता-वाहतूक-निगम कायदा, १९५० च्या २३ (१) कलमाप्रमाणे राज्य व केंद्र शासनांनी मार्च १९८२ अखेर ४६·९६ कोटी रु. भांडवल पुरविले होते. हे भांडवल २ : १ या प्रमाणात असावे, असे जरी ठरले होते, तरी वरील रकमेपैकी केंद्राकडून फक्त १२·६९ कोटी रु. मिळाले होते. याशिवाय घसारा व इतर राखीव निधी मिळून १६६·१२ कोटी रु. कर्जे व ठेवी ५०·७० कोटी रु. व इतर दायित्वे ५७.८३ कोटी रु. असे एकूण ३२१.६१ कोटी रु. भांडवल होते. यामध्ये घसारा १५३.३२ कोटी रु. म्हणजे जवळजवळ ४८% होता. या भांडवलापैकी १८७·०९ कोटी रु. (५८%) वाहने व त्यांना लागणारे सुटे भाग या स्वरूपात होते.

महामंडळाला १९८१–८२ या वर्षात व्यवसायापासून उत्पन्न २८० कोटी रु. मिळाले व एकूण उत्पन्न २८८·१४ कोटी रु. झाले. परंतु खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असल्याने ३१·१८ कोटी रु. तोटा झाला. १९७७–८२ या पाच वर्षांपैकी शेवटची तीन वर्षे महामंडळ तोट्यात होते. मागील बाकी धरून मार्च १९८२ अखेर एकूण तोटा ७१·४० कोटी रु. होता. यापैकी ६५·३१ कोटी रु. तोटा १९८०–८२ या दोन वर्षांत झाला. इंधन व सुट्या भागांच्या किंमतींत झालेली भरमसाट वाढ, वाढत्या महागाईमुळे करावी लागलेली वेतनवाढ, प्रवासी भाड्याच्या करांमध्ये वाढ व पूर्वी घसारा वाजवीपेक्षा कमी दाखविला होता, ती तूट भरून काढण्यासाठी अधिक घसारा घालावा लागला, इ. महामंडळाच्या असमाधानकारक परिस्थितीची मुख्य कारणे आहेत.

महामंडळाच्या अखत्यारीत १९८४ च्या अखेरीस सु. १२,००० गाड्यांचा ताफा असून, त्यायोगे हे महामंडळ सबंध जगामधील बसगाड्यांची वाहतूक करणाऱ्या संस्थांमध्ये सर्वात मोठे समजले जाते. महामंडळाची दापोडी येथील कार्यशाळा ही सबंध देशातील सर्वांत मोठी कार्यशाळा समजली जात असून संशोधन व विकास विभागात नवनवीन प्रयोग हाती घेण्यात येतात. कमी खर्चात बसगाड्यांची निर्मिती कशी करता येईल इकडे या विभागाचे लक्ष असते. या कार्यशाळेत वर्षभरात सु. १,५०० अत्याधुनिक बसगाड्या बांधण्यात येतात. गाड्यांचे नूतनीकरण, नवीन चॅसीवर गाड्या बांधणे, टायरांचे पुनर्स्तरीकरण, यंत्रसामग्रीचे तेलपाणी ही येथील प्रमुख कामे होत. येथे सु. २,०४१ कर्मचारी व कुशल कारागीर आहेत. नवी दिल्ली येथे १९८२ साली भरलेल्या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धेसाठी या कार्यशाळेने अवघ्या सहा महिन्यात कोणत्याही परदेशी सामग्रीशिवाय २०० बसगाड्या बांधून दिल्या त्यांपैकी २० बसगाड्या औरंगाबाद कार्यशाळेतून तयार करण्यात आल्या. याशिवाय या कार्यशाळेने देशातील प्रत्येक राज्यास प्रवासी वाहतूक बसगाड्या, तसेच शासकीय खाती व संरक्षण खाते यांना काही वाहने बांधून दिली आहेत. महामंडळाचे पुण्याजवळील भोसरी येथे एक प्रशिक्षण केंद्र असून तेथून फेब्रुवारी १९८४ पर्यंत ८,८५४ प्रशिक्षार्थ्याना प्रशिक्षण दिले गेले. महामंडळाचे तळेगाव येथे आणखी एक चालक प्रशिक्षण केंद्र असून तेथे मागासवर्गीयांना जड वाहनांच्या वाहतुकीचे प्रशिक्षण देण्यात येते.

पेंढारकर, वि. गो.