महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ (लिडकॉम) : चर्मोद्योग हा महाराष्ट्र राज्यातील एक महतत्त्वाचा उद्योग असून त्यामध्ये दुर्बल वर्गांमधील व्यक्ती मोठ्या संख्येने काम करतात. या उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळाची स्थापना केली. एप्रिल १९७७–१३ डिसेंबर १९७८ या काळात हे महामंडळ महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची दुय्यम संस्था म्हणून काम करीत होते. त्यानंतर ते पूर्ववत् स्वतंत्र करण्यात आले. दर्यापूर, हिंगोली, कोल्हापूर व सातारा येथे महामंडळाचे चार कारखाने आहेत. त्यांपैकी पहिल्या तीन ठिकाणी निरनिराळ्या प्रकारची पादत्राणे बनविली जातात, तर साताऱ्याच्या कारखान्यात केवळ तळव्याचे चामडे बनविले जाते. औरंगाबाद जिल्ह्यात गेवराई येथे २,७८,७०९ चौ. मी. तयार चामडे निर्यात व्यापारासाठी बनविण्याचा संयुक्त क्षेत्रीय प्रकल्प महामंडळाद्वारे उभारला जात आहे. तसेच धारावी येथील चर्मवस्तू उत्पादकांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने देवनार येथे चर्मनगरी बनविण्याची योजनाही महामंडळाने हाती घेतली आहे. चर्मोद्योगामधील लघुउद्योजकांच्या मालाची विक्री व्हावी, या दृष्टीने महामंडळाने भुसावळ व वांद्रे येथे दोन विक्री केंद्रे सुरु केली आहेत. लघुउद्योजकांचा माल लोकप्रिय व्हावा या हेतूने हे महामंडळ देशात निरनिराळ्या ठिकाणी भरणाऱ्या व्यापार-जत्रांमध्ये भाग घेते. १९७९–८० या वर्षी महामंळाने ३७·१४ लाख रु. किंमतीच्या मालाची उलाढाल केली.

पेंढारकर, वि. गो.