आर्थिक इतिहास : स्थूलमानाने गतकालातील अर्थव्यवस्थांचा अभ्यास म्हणजे आर्थिक इतिहास. निरनिराळ्या अर्थव्यवस्थांचा विकास, कुंठितता किंवा र्‍हास, त्यांच्यामधील वेगवेगळ्या समूहांचे क्षेम आणि आर्थिक संघटना व कार्यसिद्धी यांमधील परस्परसंबंध इ. विषयांवर आर्थिक इतिहासकाराचे लक्ष केंद्रित झालेले असते. साहजिकच आर्थिक इतिहास लिहिताना सामाजिक व राजकीय घटनांकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. असे असले, तरी अर्थव्यवस्थेची उत्क्रांती, स्थिती व लय यांचे एकूण ऐतिहासिक रीत्या विश्लेषण, त्यांचे समाजातील विविध गटांच्या कल्याणावर होणारे परिणाम ह्यांचाच प्रामुख्याने आर्थिक इतिहासात विचार केला जातो.  आर्थिक इतिहासाचे क्षेत्र हे अर्थशास्त्राच्या क्षेत्राहून काहीसे भिन्न आहे. अर्थशास्त्र हे समाजाच्या चालू आर्थिक प्रश्नांचा ऊहापोह करते, तर आर्थिक इतिहास गतकालातील आर्थिक घटनांचे परिशीलन करतो.  आर्थिक इतिहास लिहिणाऱ्यास इतिहासलेखनाचे तंत्र जरी वापरावे लागत असले, तरी समाजशास्त्रांच्या संशोधनपद्धतींचा उपयोगही अधिकाधिक प्रमाणावर करावा लागत आहे.

सतराव्या शतकापासूनच राष्ट्रीय सत्ता व संपत्ती यांसंबंधीच्या वस्तुस्थितीबद्दलचे कुतुहल अनेक देशांतील विचारवंतांत जागृत झाले.  जर्मनीत हेरमान कोनरिंग (१६०६–१६८१) व इंग्‍लंडमध्ये विल्यम पेटी (१६२३–१६८७) यांनी आकडेवारीच्या साहाय्याने तत्कालीन वस्तुस्थितीचे वर्णन करण्याचे प्रयत्‍न केले परंतु त्या प्रयत्‍नांना आर्थिक इतिहास ही संज्ञा देता येत नाही. अठराव्या शतकात आर्थिक घटनांच्या विशिष्ट बाजूंवर प्रकाश टाकणारे काही लेखक यूरोपमध्ये पुढे आले.  त्यांनी व्यापाराचा इतिहास आणि कर-आकारणी व चलन यांतील फेरबदल यांसंबंधी काही लिखाण प्रसिद्ध केले.  त्यांतील काहींचा आधार घेऊन ॲडम स्मिथने १७७६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या वेल्थ ऑफ नेशन्समध्ये अर्थशास्त्रातील प्रमेयांचे निरूपण केले. मॅल्थसच्या १७९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लोकसंख्येवरील ग्रंथातील बरीचशी माहिती आर्थिक इतिहासाच्या स्वरूपाची आहे. १७८९ ते १८४८ या काळात झालेल्या राजकीय व आर्थिक क्रांत्यांमुळे इतिहासाकडे विचारवंतांचे विशेष लक्ष गेले व विशिष्ट आर्थिक प्रश्नांचा अथवा विषयांचा इतिहास लिहिण्याची प्रवृत्ती वाढत गेली.  कापडधंद्याचा इतिहास, कामगार चळवळीचा इतिहास, कामगार संघटनांचा विकास, किंमतींतील फेरबदलाचा इतिहास इ. विषयांवर बरीच ग्रंथरचना होऊ लागली. एकोणिसाव्या शतकात जनगणना विषयावर बरीच ग्रंथरचना झाली.  त्याच शतकात जनगणना बहुतेक राष्ट्रांतून नियमितपणे होऊ लागल्यामुळे आर्थिक इतिहासासाठी विपुल माहिती उपलब्ध होत गेली. विशिष्ट उद्योगाच्या किंवा आर्थिक प्रश्नाच्या इतिहासाला असलेल्या महत्त्वापेक्षा कितीतरी अधिक महत्त्व समग्र अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाला व तीत सतत होणाऱ्या परिवर्तनाला आहे, हे मार्क्सने केलेल्या आर्थिक इतिहासाच्या मीमांसेवरून स्पष्ट झाले. त्यामुळे निरनिराळ्या देशांच्या इतिहासाची आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश विद्यापीठांतून आर्थिक इतिहास या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.  सिडनी वेब (१८५९–१९४७) आणि त्यांची पत्‍नी बीॲट्रिस (१८५८–१९४३), श्रीमती लिलियन नोल्स, रिचर्ड हेन्‍री टॉनी (१८८०–१९६२) यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये विल्यम कनिंगहॅमने (१८४९–१९१९) केंब्रिजमध्ये व अनविनने मँचेस्टरमध्ये आर्थिक इतिहासाचे अध्यापन व लेखन केले.  इतर ब्रिटिश विद्यापीठांतूनही या विषयाच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष पुरविले गेले.

गेल्या पंचवीस-तीस वर्षात आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये दोन विशेष फरक झालेले आढळून येतात : (१) अर्थशास्त्रज्ञांनी या शाखेकडे अधिकाधिक लक्ष पुरविले आहे. विशेषतः  प्रगत राष्ट्रे आणि विकसनशील किंवा अप्रगत अर्थव्यवस्था यांच्या विकासातील घटक कोणते, यांचे त्यांनी संशोधन केले आहे. त्यासाठी अर्थमिती व सांख्यिकी ह्यांसारख्या विषयांचे तंत्रही अर्थशास्त्रज्ञ वापरू लागले आहेत. (२) गतकालातील आर्थिक घडामोडींची आकडेवारी वाढत्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागली आहे. राष्ट्रीय उत्पन्न लेखाशास्त्रामुळे अर्थव्यवस्थेतील विविध फेरफारांची जी आकडेवारी मिळते, तिचा उपयोग करून आर्थिक घटनांवर कसा विदारक प्रकाश पाडता येतो, याचे दिग्दर्शन सायमन कुझ्‌नेट्स (१९०१-      ) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने केल्यापासून आर्थिक इतिहासक्षेत्राचे एक नवे दालन त्याच्या अभ्यासकांना खुले झाले आहे.  आर्थिक घटनांच्या स्पष्टीकरणासाठी उपलब्ध आकडेवारीचा व शास्त्रीय संशोधनपद्धतींचा उपयोग करणे, अर्थशास्त्रातील सिद्धांतांचा पडताळा पाहणे, शक्य झाल्यास आर्थिक वस्तुस्थिती व घटना यांमधील कार्यकराणसंबंध प्रस्थापित करणे इ. मार्गांचा अवलंब आर्थिक इतिहासकारांना करावा लागतो.)  असे करताना त्यांना काही अडचणी जाणवतात. एकतर गेल्या पंचवीस-तीस वर्षात या शाखेचा व्याप जरी बराच वाढला असला, तरी अद्यापि आर्थिक इतिहासाची स्वतंत्र अशी एखादी तत्त्वप्रणाली अस्तित्वात आलेली नाही. शिवाय संशोधनासाठी आवश्यक असलेली आकडेवारी आर्थिक इतिहासाच्या अभ्यासकांस सर्वसमावेशक स्वरूपात न मिळता खंडशः मिळू शकते. जो जो मागे मागे जावे, तो तो वस्तुस्थितीदर्शक आकडेवारीची उपलब्धता अपुरी भासते व म्हणून आर्थिक इतिहास परिमाणात्मक स्वरूपात न लिहिता गुणात्मक वर्णन करून लिहावा लागतो. यासाठीसुद्धा भरपूर पुराव्याचा शोध व त्याची काळजीपूर्वक छाननी, ह्या इतिहासकाराच्या सामान्य तंत्राचा वापरदेखील आर्थिक इतिहासकारास  करावाच लागतो.  असे केल्यानेच त्याला गतकालीन आर्थिक घटनांचे सुसंबद्ध स्पष्टीकरण करता येते व त्यासाठी स्वीकारलेल्या गृहीतांची छाननी करणे पुढील अभ्यासकांना सोपे जाते. कोणत्याही राष्टाचे अर्थकारण हे कालसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष असल्यामुळे सतत बदलत जाणाऱ्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भातच त्याची छाननी करावी लागते. हे कार्य आर्थिक इतिहास करतो, म्हणूनच त्याचे महत्त्व वादातीत आहे.

धोंगडे, ए. रा.